आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पालकमंत्री विखे पाटील यांचे अधिकाऱ्यांना आदेश:माळशिरस, करमाळा, सांगोला तालुक्यातच लम्पी अधिक का?, तपास करा

सोलापूर11 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर जिल्ह्यात माळशिरस, करमाळा, सांगोला व माढा तालुक्यात लम्पी त्वचारोगाने जास्त प्रमाणावर जनावरे दगावली आहेत. या ठिकाणी जनावरे दगावण्याच्या कारणांची मीमांसा करावी, अशा सूचना पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय विकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी आज येथे दिल्या.

लम्पी त्वचारोगासंदर्भात सोलापूर जिल्ह्याच्या आढावा बैठकीत विखे पाटील बोलत होते. यावेळी खासदार डॉ. जयसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामी व रणजितसिंह नाईक निंबाळकर, आमदार सर्वश्री सुभाष देशमुख, राजेंद्र राऊत आणि सचिन कल्याणशेट्टी, जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी आदि उपस्थित होते.

अधिक कडक उपाययोजना कराव्यात

जनावरे दगावण्यामुळे जिल्ह्यातील पशुधनाची संख्या कमी झाली आहे, याबाबत चिंता व्यक्त करून पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले, जिल्ह्यात लम्पी त्वचारोगाचा प्रसार कमी करण्यासाठी अन्य तालुक्यांसह माळशिरस, करमाळा, सांगोला व माढा तालुक्यात अधिक कडक उपाययोजना हाती घेण्यात याव्यात. जनावरांचे लसीकरण मोठ्या प्रमाणावर करावे. त्यासाठी जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून 1 कोटी रुपयांचा निधी आधीच देण्यात आलेला आहे. लम्पी त्वचारोगाने मृत जनावरांच्या ठिकाणी पशुसंवर्धन विभागाच्या अधिकाऱ्यांनी गांभीर्याने भेटी द्याव्यात. ज्या तालुक्यात असे प्रमाण जास्त आहे, त्यामागच्या सर्व परिस्थितीचा अभ्यास करावा. कारणे शोधून काढावीत, जेणे करून आवश्यक उपाययोजनांद्वारे जनावरे मृत होण्यास अटकाव करण्यात येईल, असे ते म्हणाले.

मृत जनावरांसाठी नुकसानभरपाई

जिल्ह्यात गाय वर्गातील जनावरांची संख्या 7 लाख 45 हजार 324 असून 179 इपिसेंटर उभारण्यात आले आहेत. 14 हजार 452 एकूण बाधित जनावरे असून, 5 हजार 948 जनावरे उपचाराने बरी झाली आहेत. 900 मृत जनावरांपैकी माळशिरस तालुक्यात सर्वाधिक 315, करमाळा तालुक्यात 229, सांगोला तालुक्यात 105 आणि माढा तालुक्यात 101 जनावरांचा समावेश आहे, अशी माहिती जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. नवनाथ नरळे यांनी दिली. पैकी एकूण 432 मृत जनावरांसाठी नुकसानभरपाई देण्यात आली आहे.

बातम्या आणखी आहेत...