आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सोलापुरात राज्य उत्पादन शुल्क विभागाची कारवाई:कारमधून सव्वा दोन लाखांची विदेशी दारू जप्त; एकाला अटक

सोलापूर2 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

राज्य उत्पादन शुल्क विभागाने 25 नोव्हेंबर रोजी मंगळवेढ़ा तालुक्यात माचणूर गावाच्या हद्दीत एका ह्यूंडाई आय ट्वेंटी कारमधून गोवा राज्य निर्मित 30 पेट्या विदेशी दारुचा साठा जप्त केला असून कारवाईत वाहनासह पाच लाख 76 हजार किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

सविस्तर वृत्त असे की, राज्य उत्पादन शुल्क विभागाचे निरिक्षक संदिप कदम यांना गोवा दारूच्या वाहतुकीबाबत मिळालेल्या खात्रीलायक बातमी नुसार त्यांनी 25 नोव्हेंबर शुक्रवारी पहाटे 6 वाजेच्या सुमारास सांगोला-मंगळवेढा रोडवरील माचणूर गावाच्या हद्दीत सापळा रचला असता त्यांना एक ह्यूंडाई आय ट्वेंटी क्रमांक MH02 CL 0811 ही कार येत असल्याचे दिसली, सदर वाहनास जागीच थांबवून पंचांसमक्ष वाहनाची झडती घेतली असता त्यात गोवा राज्य निर्मित व गोवा राज्यात विक्रीसाठी असलेल्या विदेशी दारुचा साठा दिसून आला.

वाहनचालक लक्ष्मीप्रसाद सखाराम मांजरेकर, रा. वेंगुर्ला जि. सिंधुदुर्ग या इसमास जागीच ताब्यात घेऊन त्याचेविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायदा 1949 च्या कलमान्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे. या गुन्ह्यात राज्य उत्पादन शुल्क विभागाने इंपेरियल ब्ल्यू या विदेशी ब्रॅंडच्या 180 मिली क्षमतेच्या 1440 सीलबंद बाटल्या जप्त केल्या असून जप्त केलेल्या विदेशी दारूची किंमत दोन लाख 16 हजार इतकी असून वाहनासह एकूण पाच लाख 76 हजार किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलेला आहे. ही कारवाई अधीक्षक नितीन धार्मिक व उपअधीक्षक आदित्य पवार यांच्या मार्गदर्शनाखाली माळशिरस विभाग निरीक्षक संदिप कदम, सांगोला दुय्यम निरिक्षक कैलास छत्रे, जवान तानाजी काळे, तानाजी जाधव व वाहनचालक संजय नवले यांच्या पथकाने केली आहे.

उत्पादन शुल्क विभागाचे आवाहन

या विभागाकडून अवैध दारु निर्मिती, विक्री व वाहतुकीविरुद्ध कारवाईकरिता 6 पथके नेमण्यात आली असून कोणत्याही ठिकाणी अवैध हातभट्टी दारू/ ताडी निर्मिती /वाहतूक /विक्री /साठा, बनावट दारू, परराज्यातील दारू याबाबत माहिती मिळाल्यास या विभागाच्या टोल फ्री क्रमांक 18002339999 व व्हाट्सअप क्रमांक 8422001133 वर संपर्क साधावा, माहिती देणा-याचे नाव गुप्त ठेवण्यात येईल, असे आवाहन अधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क सोलापूर नितिन धार्मिक यांनी केले आहे.

बातम्या आणखी आहेत...