आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

करिअर:क्रिकेट पंचगिरीमध्येही करिअर घडवता येते! सोलापूरचे फर्स्ट क्लास अम्पायर अनिश सहस्त्रबुद्धे यांचे प्रतिपादन

सोलापूर2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

रणजी स्पर्धेत एका संघात एका राज्यातील अव्वल ११ खेळाडू असतात. त्यांना त्यातील बारकावे माहिती असतात, त्यांचे कौशल्य व क्षमता चांगली असते. त्यांचा पुढील टप्पा भारतीय संघात निवडीचा असतो. यासाठी कोणताही निर्णय देताना सतर्क राहिल्याशिवाय पर्याय नसतो.

आता आयपीएल अथवा आंतरराष्ट्रीय सामन्यात पंचगिरी करण्याचे ध्येय

प्रत्येक आईवडिलांना वाटते की आपला मुलगा डॉक्टर व्हावा, इंजिनिअर व्हावा, वकील व्हावा. परंतु क्रिकेट अंपायरमध्ये करिअर करण्यासाठी त्यांनी मला दहाव्या इयत्तेत असताना प्रोत्साहन दिले. बारावीनंतर इंजिनियर अभ्यासक्रमास प्रवेश मिळत असताना देखील त्यांनी मला हॉटेल व्यवसायाबरोबरच क्रिकेट पंच म्हणून करिअर करण्याची संधी दिली. त्या आईवडिलांमुळेच मी फर्स्ट क्लास अंपायर होऊ शकलो. क्रिकेटमध्ये १०० पेक्षा जास्त करिअर आहेत. त्यातील क्रिकेट पंच हे एक करिअर आहे. यात नक्कीच करिअर आणि मानही आहे, असे सोलापूरचे पहिले ‘फर्स्ट क्लास अंपायर’ अनिश सहस्त्रबुद्धे यांनी सांगितले.

नुकत्याच गुवाहटीमध्ये (आसाम) झारखंड विरुद्ध छत्तीसगड या रणजी सामन्याबरोबरच झारखंड विरुद्ध दिल्ली आणि झारखंड विरुद्ध तामिळनाडू या तीन रणजी सामन्यात पंच म्हणून काम करण्याची संधी अनिश याँना मिळाली. हे सामने करून आल्यानंतर ते ‘दिव्य मराठी’शी बोलत होते.

ते म्हणाले, महाराष्ट्र क्रिकेट संघटनेने क्रिकेट पंच पॅनलमध्ये घेतले तेव्हा एका सामन्यात ७०० रुपये मिळायचे परंतु खर्च मात्र दुप्पट होता. हे केवळ अव्वल दर्जाचा पंच होण्यासाठी केलेले प्रयत्न होत.

कोणताही निर्णय देताना सतर्क राहिले पाहिजे
वीस वर्षाच्या सेवेनंतर मिळालेली ‘फर्स्ट क्लास अंपायर’ची ही संधी माझ्या पंचाच्या करिअरला कलाटणी देणारी ठरली. क्रिकेटमधील सर्वात शेवटची बी.सी.सी.आय. लेव्हल २ ची परीक्षा २०१५ मध्ये उत्तीर्ण झालो. त्यानंतर मला राज्य क्रिकेट संघटनेचे विविध वयोगटातील सामने करण्याची संधी मिळाली. तेथून मागे वळून पाहिले नाही. माझ्या या पंच कामगिरीची दाखल घेत भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने रणजी सामना देत मला फर्स्ट क्लास पंचाचा दर्जा दिला. रणजी सामन्यातील झारखंड विरुद्ध दिल्ली हा सामना लाइव्ह होता. या सामन्यात पंच म्हणून जबाबदारी सांभाळणे हे वेगळेच प्रेशर असते. मैदानावरील नाही तर देशातील सर्व क्रिकेटप्रेमी सामना पाहत असतात. सुमारे ५४० चेंडू पाहावे लागतात. खेळाडूंचे भवितव्य एका निर्णयावर अवलंबून असते. हे खेळाडू एका राज्यातील अव्वल ११ खेळाडू असतात. त्यांना त्यातील बारकावे माहिती असतात, त्यांचे स्किल व क्षमता चांगली असते. त्यांचा पुढील टप्पा भारतीय संघात निवडीचा असतो. कोणताही निर्णय देताना सतर्क राहिल्याशिवाय पर्याय नसतो. आता लगेच आयपीएल अथवा आंतरराष्ट्रीय सामना मिळेल अशी अपेक्षा नाही. परंतु हे ध्येय ठेवण्यासाठी कामगिरी उंचावणार.
- अनिश सहस्त्रबुद्धे

बातम्या आणखी आहेत...