आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निदर्शने:जि.प. आवारात घुमला अंगणवाडी सेविका, मदतनिसांचा थाळीनाद; एकवटल्या दोन हजार सेविका

सोलापूर25 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • अंगणवाडी कर्मचारी संघाने प्रलंबित प्रश्नांकडे वेधले लक्ष

मानधनवाढ लागू करा, सेवानिवृत्ती वेतन द्या, महागाई भत्ता द्या, रखडलेली भरती प्रक्रिया सुरू करा, यासह विविध प्रलंबित मागण्यांसाठी अंगणवाडी सेविका व मदतनीस यांनी बुधवारी (दि. ८) जिल्हा परिषदेसमोर थाळीनाद करत राज्यातील महाविकास आघाडी सरकारच्या विरोधात निदर्शने करण्यात आली.

महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघातर्फे अंगणवाडी सेविका व मदतनीस यांच्या प्रलंबित प्रश्नांबाबत निदर्शनाचे आयोजन केले होते. जिल्हाभरातून दोन हजाराहून अधिक अंगणवाडी सेविका, मदतनीस यामध्ये सहभागी झाल्या. तळपत्या उन्हात दुपारी साडेबारा वाजल्यापासून जिल्हा परिषदेच्या पूनम गेटसमोर थाळीनाद करीत महिलांनी निदर्शने केली. अनेक सेविका, मदतनीस त्यांच्या बालकांना घेऊन निदर्शनात सहभागी होत्या. महाविकास आघाडी सरकारचे करायचं काय, खाली डोकं वर पाय, मागण्या आमच्या हक्काच्या..., हमारी युनियन हमारी ताकद.. अशा घोषणांनी जिल्हा परिषद परिसर दणाणून गेला.

हातामध्ये मागण्यांचे फलक घेऊन लाल साड्या घातलेल्या सेविका सक्रिय होत्या. अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या मूळ मागण्यांसह, प्रवासभत्ता, महागाईच्या तुलनेत मानधन वाढीसह, इतर सोयी-सुविधांचा लाभ द्यावा, अशी मागणी संघटनेतर्फे करण्यात आली. त्यासंदर्भातील निवेदन जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांना देण्यात आले. याप्रसंगी सरला चाबुकस्वार, सुनीता गायकवाड, हेमा गव्हाण, सुलभा कुलकर्णी, प्रमिला माळी, कांचन पांढरे, हौसाबाई शेंडगे आदी उपस्थित होत्या.

मानधन नको वेतन द्या, निवृत्तीवेतन सुरू करा
अंगणवाडी सेविका मदतनीस केंद्र व राज्य सरकारचे कर्मचारी आहेत. त्यांना शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे वेतन व भत्ते द्या. मानधन नको, वेतन द्या. सेवानिवृत्त सेविकांना दरमहा चार हजार रुपये निवृत्तीवेतन सुरू करा. एप्रिल महिन्याचे प्रलंबित मानधन त्वरित द्या. महागाईचा भत्ता व भरीव मानधनवाढ द्या. मोबाइल पोषण ट्रॅकर ॲप मराठीमध्ये उपलब्ध करा. प्रलंबित उन्हाळी सुटी, रजा द्या. सीम रिचार्जसाठी पैसे द्यावेत. राज्यभरातील सेविका, मदतनीस यांची साडेआठ हजार रिक्त पदे त्वरित भरावीत.

अडीच वर्षांत आघाडी सरकारने एकही मागणी पूर्ण केली नाही
महाविकास आघाडी सरकाराने सत्तेत येण्यापूर्वी अंगणवाडी सेविकांच्या मानधनात वाढ करू, असे आश्वासन दिले होते. पण प्रत्यक्षात अडीच वर्षे होऊनही एकही मागणी पूर्ण केली नाही. महिला व बालविकासमंत्री यशोमती ठाकूर यांचे अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष झाले आहे. त्वरित मागणी मान्य न झाल्यास २० जून रोजी यवतमाळ ते अमरावती पदयात्रा मोर्चा काढून मंत्री ठाकूर यांचे लक्ष वेधण्यात येईल.
सूर्यमणी गायकवाड, प्रदेश कार्याध्यक्ष, अंगणवाडी कर्मचारी संघ

बातम्या आणखी आहेत...