आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कोरोनाशी लढा:हरभरा विकून गरीबांना वाटले 2 लाखांचे मास्क, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष संजय दूधगावकर यांचे दातृत्व

उस्मानाबाद2 वर्षांपूर्वीलेखक: प्रतिनिधी
  • कॉपी लिंक
  • विधवा महिलांकडून तयार करून घेतले मास्क, 10 हजार मास्क वाटण्याचा निश्चय

(चंद्रसेन देशमुख)

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर झालेल्या लॉकडाऊनचा वेगवेगळ्या घटकातील व्यक्तींवर प्रभाव निर्माण झाला आहे. कुठे रोजगाराचा तर कुठे सुरक्षेचा प्रश्न आहे. शहरी भागात कोरोनापासून वाचण्यासाठी मास्क, सॅनिटायझर, हातमोजे, अशा साहित्यासह धान्याच्या कीट वाटण्याची स्पर्धा असली तरी ग्रामीण भागात सुरक्षेसाठी साधन-साहित्याचा वापर आणि वाटप अपवादानेच होत आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष तथा शेतकरी संघर्ष समितीचे प्रमुख संजय पाटील दुधगावकर यांनी शेतातील हरभरा विक्रीतून आलेल्या 2 लाख रुपयांतून शेतकऱ्यांना मास्क वाटप सुरू केले आहे. विशेष म्हणजे त्यांनी ग्रामीण भागातील विधवा महिलांकडून मास्कची शिलाई केली आहे. त्यामुळे हाताला काम नसलेल्या काही महिलांना रोजगार मिळाला आहे. आजवर 7 हजार 432 मास्क वाटले असून, एकूण 10 हजार मास्क वाटपाचा त्यांचा निश्चय आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विशेषत: ग्रामीण भागातील परिस्थिती हलाखीची आणि चिंताजनक होत आहे. मात्र, समाजातील दातृत्व विभूतींच्या माध्यमातून एकमेकांना हातभार मिळत आहे. मात्र, शहराच्या तुलनेत ग्रामीण भागात अजूनही काेरोनापासून संरक्षणासाठी साहित्याचा पुरेसा वापर होत नाही. वास्तविक पाहता शहराच्या तुलनेत फिजिकल डिस्टन्सिंगबद्दलची जागरूकता ग्रामीण भागातच अधिक आहे. तरीही प्रत्येकजण मास्क, सॅनिटायझरचा वापर करू शकत नाही. शेतकऱ्यांची अडचण लक्षात घेऊन दुधगाव (ता.उस्मानाबाद) येथील शेतकरी संघर्ष समितीचे प्रमुख तथा जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष संजय पाटील दुधगावकर यांनी शेतकऱ्यांना 10 हजार मास्क वाटप करण्याचा निश्चय केला. त्यांनी आजवर कळंब आणि उस्मानाबाद तालुक्यातील कसबे तडवळे, दुधगाव, सातेफळ, गौर, दहिफळ, अवधूतवाडी, वाणेवाडी आदी भागात 7 हजार, 432 मास्क वाटप केले आहेत. लॉकडाऊन संपेपर्यंत एकूण 10 हजार मास्क वाटप करण्यात येणार आहेत. दूधगावकर यांची कौटुंबिक परिस्थिती सामान्य आहे. मात्र, यावर्षी दूधगाव येथील त्यांचा शेतात हरभरा पिक उत्तम आले होते. सुरुवातीलाच हरभऱ्याला 4 हजार, 200 रुपये भाव मिळाला. त्यातून आलेले दोन लाख रुपये शेतकऱ्यांना मास्क वाटप करण्यासाठी खर्च करण्याचा निर्णय त्यांनी घेतला. सुरूवातील 4 हजार मास्क 20 रुपये दराने त्यांनी खरेदी केले होते. त्यानंतर ग्रामीण भागातील विधवा महिलांकडून 15 रुपये दराने मास्क खरेदी केले. यासाठी 1 लाख, 80 हजार रुपये आजवर खर्च झाले असून, लॉकडाऊन संपेपर्यंत हा उपक्रम सुरूच ठेवण्याचा त्यांनी निर्धार केला आहे. त्यांच्या या दातृत्वाबद्दल कौतुक होत आहे.

लाखोंचा पोशिंदा जगायला हवा

संजय दूधगावकर म्हणतात, शहरी भागातील समस्या, गरजा तातडीने समोर येतात. मात्र, ग्रामीण भागातील शेतकऱ्यांच्या, शेतमजुरांच्या समस्या प्रकर्षाने प्रशासन, शासनाच्या समोर येत नाहीत. शहरातील घटकांना मदतीचा महापूर सुरू असताना जगाचा पोशिंदा असलेल्या शेतकऱ्यांना कुठलीही मदत मिळत नाही. उलट त्याला दररोजची कामे जीव धोक्यात घालून करावी लागतात. नोकरदारांना शासन घरात बसून पगार देते, मात्र, शेतकऱ्यांना जागोजागी समस्यांचा सामना करावा लागतो. काही शेतकरी भाजीपाला विक्रीसाठी, काही दूध विक्रीसाठी तर काही शेतकरी शेतातील सामग्री आणण्यासाठी बाहेर पडतात. त्यांच्या सुरक्षेची काळजी कोण घेणार. त्यांची अडचण विचारात घेऊन मास्क वाटप करण्याचा निर्णय घेतला. माझीही परिस्थिती सामान्य आहे. मात्र, हरभरा विक्रीतून आलेली रक्कम शेतकऱ्यांसाठी खर्च करण्याचा निर्णय घेतला. लाखाचा पोशिंदा शेतकरी महत्वाचा असून, तो जगण्यासाठी सगळ्यांचे प्रयत्न असायला हवेत.

बातम्या आणखी आहेत...