आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराकोरोनाच्या पार्श्वभूमीवर सुमारे ४३ दिवसांपासून म्हणजे २० मार्चपासून बंद असलेली उस्मानाबाद जिल्ह्यातील दुकाने सोमवारपासून (दि.४) सुरू झाली आहेत. केंद्र व राज्य शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार जिल्हाधिकारी दीपा मुधोळ-मंुडे यांनी वेळेचे निर्बंध घालून दुकाने सुरू करण्यासाठी परवानगी दिली. दरम्यान, पहिल्याच दिवशी जिल्ह्यातील ४० टक्के दुकाने उघडण्यात आली होती. दुपारी १ वाजेपर्यंत दुकाने उघडण्यासाठी परवानगी देण्यात आली होती. त्यानंतर बाजारपेठ बंद करण्यात आली.
कोरोनाचा एकही रुग्ण नसल्याने शासनाच्या वर्गवारीनुसार उस्मानाबाद जिल्हा ग्रीन झोनमध्ये आला आहे. महिन्यापूर्वी जिल्ह्यात कोरोनाचे ३ रुग्ण अाढळले होते.उपचारानंतर त्यांना घरी सोडण्यात आले. ग्रीन झोनच्या निकषानुसार जिल्हाधिकारी मुंडे यांनी रविवारी रात्री नियमावलीसह दुकाने उघडण्यास परवानगी दिली. त्यानुसार अत्यावश्यक सेवेतील दुकाने वगळता अन्य दुकानांना सकाळी ९ ते दुपारी १ वाजेपर्यंत परवानगी देण्यात आली आहे. हा निर्णय किंवा प्रशासनाचे आदेश सर्व दुकानदारांपर्यंत पोहोचण्यासाठी विलंब लागला तसेच अजूनही काही दुकानदारांमध्ये आदेशाबद्दल संभ्रमावस्था असल्याने जिल्ह्यातील सरासरी ४० टक्के दुकाने उघडण्यात आली.दुकाने प्रदीर्घ काळासाठी बंद असल्याने दुकानदारांचा साफसफाईसाठी अधिक वेळ गेला. त्यानंतर एक वाजता दुकाने बंद करण्याच्या सूचना मिळत गेल्या. त्यामुळे दुकानांतून साहित्य विक्री किंवा व्यवहार मोठ्या प्रमाणावर सुरू झाले नाही. शहरी भागात नागरिकांची रस्त्यांवर मोठी गर्दी दिसून आली. वाहनांची संख्याही मोठ्या प्रमाणावर रस्त्यांवर दिसत होती.
हॉटेलचालक संभ्रमात
जिल्हाधिकारी दीपा मुधोळ-मंुडे यांनी रविवारी रात्री उशिरा दुकाने सुरू करण्याबद्दलचे आदेश जारी केले. वास्तविक पाहता या आदेशामध्ये सर्व आस्थापना असा शब्दप्रयोग केला गेला असला तरी त्यामध्ये हॉटेल व्यवसायिकांना अर्थबोध होत नाही. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानंतरही सोमवारी हॉटेल सुरू झालेच नाहीत.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.