• Home
  • Local
  • Covid 19 Maharashtra: Maharashtra Coronavirus Death, Cured Live News And Updates

कोरोना: राज्यात ‘कोरोना’चा चौथा बळी, रुग्णसंख्या 107; नव्याने पडली 18 बाधित रुग्णांची भर

  • मुंबईत संयुक्त अरब अमिरातवरून आलेल्या रुग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू
  • मुंबईतून 12 कोरोनाग्रस्त पूर्णपणे बरे झाले, रुग्णालयातून मिळाला डिस्चार्ज

दिव्य मराठी वेब टीम

Mar 25,2020 08:59:40 AM IST

मुंबई - सोमवारी सायंकाळपासून राज्यात आणखी एका रुग्णाचा कोविड-१९ मुळे मृत्यू ओढवला. त्यामुळे राज्यात कोरोना संसर्गाने मृत्यू पडलेल्या रुग्णांचा आकडा ४ इतका झाला आहे. राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या १०७ इतकी झाली आहे. नव्याने भर पडलेल्या बाधित रुग्णांत मुंबईचे ६, इस्लामपूरचे (जि. सांगली) ४, पुण्याचे ३, सातारा जिल्ह्यातील २ आणि अहमदनगर, कल्याण-डोंबिवली आणि ठाणे येथील प्रत्येकी एक-एक रुग्ण आहे.


मंगळवारी आढळलेल्या नवीन बाधित रुग्णांपैकी सर्वाधिक म्हणजे ८ रुग्णांनी मध्यपूर्वेतील देशांत प्रवास केला होता. इतर काही जणांनी अमेरिका, इंग्लंड आणि पेरू या देशांत प्रवास केला आहे. दोन जण पूर्वी बाधित आढळलेल्या रुग्णांच्या निकट सहवासात आले होते.


आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी राज्यात कोरोनाने तिघांचाच बळी गेल्याचा मंगळवारी दावा केला. मात्र, बृहन्मुंबई पालिकेने सोमवारी सायंकाळी कस्तुरबा रुग्णालयात मृत झालेला रुग्ण कोरोनाबाधित होता, असे स्पष्ट करत मुंबईतील बळींची संख्या ४ झाल्याचे आपल्या प्रसिद्धिपत्रकात म्हटले आहे.


कोरोना विषाणूच्या संसर्गाने मंगळवारी मुंबईत चौथ्या रुग्णाचा बळी गेला. मृत रुग्ण ६५ वर्षीय असून त्यास ताप, खोकला व सर्दीचा त्रास होता. ही व्यक्ती यूएई येथून १५ मार्च रोजी अहमदाबाद येथे आला. २० मार्च रोजी मुंबईत आला होता. त्यास उच्चरक्तदाब व अनियंत्रित मधुमेहाचा त्रास होता. २३ मार्च रोजी संध्याकाळी या व्यक्तीचा कस्तुरबा रुग्णालयात मृत्यू झाला, अशी माहिती बृहन्मुंबई महापालिकेच्या आरोग्य अधिकाऱ्यांनी दिली.


डाॅक्टरांनी ओपीडी बंद ठेवू नये : डाॅक्टरांनी ओपीडी बंद ठेवू नये. पुण्या-मुंबईहून आलेल्या लोकांच्या हातावर कोणताही होम क्वाॅरंटाइनचा शिक्का मारू नये. मेडिकल खुले ठेवावेत, डाॅक्टरांनी रुग्णांना तपासण्यास नकार देऊ नये, परदेशातून आलेल्या प्रवाशांवर बहिष्कार टाकू नका, असे आवाहन राज्याच्या आरोग्य विभागाने केले आहे.

X