आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराहिंगोली जिल्ह्यात शंभर टक्के लसीकरणासाठी प्रशासनाकडून युद्धपातळीवर प्रयत्न सुरु असून मंगळवारी ता.14 सकाळी जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी खंडाळा या गावाला भेट देऊन गावकऱ्यांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी लसीकरणाबाबत गावकऱ्यांमधून जनजागृती करीत लसीकरण केंद्रालाही भेट दिली.
हिंगोली जिल्ह्यात ओमायक्रॉनचा संभाव्य धोका लक्षात घेता शंभर टक्के लसीकरणासाठी प्रशासनाने प्रयत्न चालविले आहे. त्यासाठी जिल्हाधिकारी पापळकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजय दैने, जिल्हा शल्यचिकीत्सक डॉ. राजेंद्र सुर्यवंशी, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. शिवाजी पवार, उपमुख्यकार्यकारी अधिकारी गणेश वाघ, विस्तार व माध्यम अधिकारी प्रशांत तुपकरी यांनी गावपातळीवर लसीकरणाबाबत सुक्ष्म नियोजन केले आहे.
दरम्यान, अंगणवाडी सेविका तसेच आशा कर्मचाऱ्यांमार्फत गावांमध्ये लसीकरण न झालेल्या गावकऱ्यांची माहिती घेतली जात असून त्यानंतर आरोग्य विभागामार्फत घरोघरी जाऊन लसीकरण केले जात आहे. सध्याच्या स्थितीत पहिला डोस घेतलेल्या गावकऱ्यांची संख्या 7 लाख असून दुसरा डोस घेतलेल्या गावकऱ्यांची संख्या 3.50 लाख आहे.
हिंगोली तालुक्यात उपविभागीय अधिकारी उमाकांत पारधी यांनी 100 टक्के लसीकरण झालेल्या गावांना प्रोत्साहनपर पारितोषीक देण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी आज प्रत्येक गावात शिबीर आयोजित केले आहे. तसेच जिल्हाधिकारी पापळकर यांनी ग्रामीण भागात जाऊन जनजागृती सुरु केली आहे. आज पापळकर यांनी खंडाळा या गावात जाऊन गावकऱ्यांशी संवाद साधला. तसेच लसीकरण करून घेण्याचे आवाहन केले. त्यानंतर लसीकरण केंद्रांना भेटी देऊन पाहणी केली. तसेच मुख्यकार्यकारी अधिकारी संजय दैने यांनी फाळेगाव व इतर ठिकाणी भेटी दिल्या आहेत. खंडाळा येथे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. शिवाजी पवार, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सतीष रुणवाल, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष उध्दवराव गायकवाड यांच्यासह गावकरी उपस्थित होते.
लसीकरण करून घ्या अन् सुरक्षीत व्हा- जिल्हाधिकारी
ग्रामीण भागातील गावकऱ्यांनी कोविडची संभाव्य तिसरी लाट लक्षात घेता लसीकरण करून घेत आरोग्य सुरक्षीत करावे. यासोबतच दोन्ही डोस घेतले असले तरी घराबाहेर पडताना मास्कचा वापर करा, वारंवार हात धुवा तसेच सामाजिक अंतर पाळणे गरजेचे आहे. विनाकारण गर्दीच्या ठिकाणी जाऊ नये.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.