आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हिंगोली:बळसोंड येथे गावकऱ्यांनीच पकडला स्वस्त धान्याचा तांदूळ आणि गहू, तहसीलच्या पुरवठा विभागाचेही पितळ उघडे!

21 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

हिंगोली शहरालगत बळसोंड येथे एका गोदामात दडवून ठेवलेला स्वस्त धान्याचा 58 कट्टे तांदूळ व 9 कट्टे गहू गावकऱ्यांनी (बुधवारी ता. 17) पकडून दिला. मात्र हे धान्य कोणत्या योजनेचे व कधी उचल केली याची स्पष्ट माहिती दुकानदारासह तहसीलच्या कर्मचाऱ्यांनाही देता आली नाही. त्यामुळे तहसीलच्या पुरवठा विभागाचे पितळ उघडे पडले आहे.

हिंगोली शहरालगत बळसोंड येथे स्वस्त धान्य दुकानदाराकडून मागील दोन वर्षात केवळ तीन वेळेसच धान्य देण्यात आल्याचा आरोप गावकऱ्यांनी केला आहे. तर ग्रामपंचातीने मासीक बैठकीत स्वस्त धान्य दुकानदार बदलून देण्याचा ठराव घेऊन तहसील कार्यालयाकडेही पाठविला होता. मात्र तहसील कार्यालयाकडून कुठल्याही प्रकारची कार्यवाही झाली नाही. त्यामुळे तहसीलच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांचे काळ्या बाजाराला पाठबळ असल्याचा आरोपही गावकऱ्यांनी केला.

दरम्यान, आज सकाळी स्वस्त धान्य दुकानदाराने काही धान्य एका गोदामात दडवून ठेवल्याची माहिती गावकऱ्यांना मिळाली होती. त्यावरून भाजपाचे युवक जिल्हाध्यक्ष पप्पू चव्हाण यांच्यासह गावकऱ्यांनी तेथे जाऊन पाहणी केली असता तेथे धान्य आढळून आले. मात्र हे धान्य कोणत्या योजनेतून व कधी उचल केले याची माहिती दुकानदाराला देता आली नाही. त्यामुळे चव्हाण यांनी तातडीने तहसील कार्यालयाशी संपर्क साधून प्रकाराची माहिती दिली. त्यानंतर मंडळ अधिकारी व इतर कर्मचारी तेथे दाखल झाले. त्यांनी सदरील धान्याचा पंचनामा केला आहे. तर सदर धान्य स्वस्त धान्याचेच असल्याचे स्पष्ट केले.

तर तिव्र आंदोलन करणार- पप्पू चव्हाण, युवक जिल्हाध्यक्ष भाजप

गावकऱ्यांच्या तसेच ग्रामपंचायतीच्या तक्रारीनंतरही पुरवठा विभागाकडून कोणतीच कारवाई झाली नाही. आता धान्य पकडून दिल्यानंतरही कारवाई न झाल्यास तिव्र आंदोलन केले जाईल.

बातम्या आणखी आहेत...