आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कोरोना:हिंगोलीत आणखी 14 जण पॉझिटिव्ह, सर्व राखीव दलाचे जवान, एकूण रुग्ण संख्या 89 

हिंगोली3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • हिंगोली येथील राज्य राखीव दलाचे जवान मुंबई व मालेगाव येथे कार्यरत होते

हिंगोली येथील शासकिय रुग्णालयाने पाठविलेल्या स्वॅब नमुन्यांपैकी आणखी १४ जवानांचे स्वॅब नमूने पॉझिटिव्ह आले आहे. या बाबतचा अहवाल मंगळवारी ता. ५ प्राप्त झाला आहे. आता हिंगोलीतील रूग्णाची संख्या ८९ झाली आहे. 

हिंगोली येथील राज्य राखीव दलाचे जवान मुंबई व मालेगाव येथे कार्यरत होते. सदरील जवान हिंगोलीत दाखल झाल्यानंतर त्यांना क्वांरंटाईन सेंटरमध्ये ठेवण्यात आले होते. त्यानंतर त्यांचे स्वॅबनमुने गोळा करण्याचे काम जिल्हा शल्यचिकीत्सक डॉ. किशोर श्रीवास, निवासी वैद्यकिय अधिकारी डॉ. गोपाल  कदम, डॉ. संजीवन लखमावार, डॉ. स्वाती नुन्नेवार, डॉ. अरुण जिरवणकर, डॉ. दीपमाला पाटील यांनी सुरु केले होते. ता. १ एप्रील व ता. २ एप्रील या दोनच दिवसांत ३२ जण पॉझीटिव्ह आले होते. त्यामुळे क्वारंटाईन सेंटरमध्ये असलेल्या सर्वच जवानांचे नव्याने स्वॅब घेऊन तपासणीसाठी पाठविण्याचा निर्णय घेण्यात आला होता.

दरम्यान, मागील दोन दिवसांत जवानांचे नमुने तपासणीला पाठविले होते. त्याचा अहवाल सोमवारी  रात्री उशीराप्राप्त झाला आहे. यामध्ये तब्बल २३ जणांचे अहवाल पॉझीटीव्ह आले आहेत. यामध्ये २२ जवान असून १ परिचारिकेचा समावेश आहे. त्यानंतर आज सकाळी शासकीय रुग्णालयास अहवाल प्राप्त झाला आहे. यामध्ये १४ नमुने पॉझीटिव्ह आहेत. हे सर्व जण राखीव दलाचे जवान आहेत. त्यामुळे आता प्रशासनाने खबरदारीचा उपाय म्हणून कोरोना सेेटरमध्ये काम करणाऱ्या अधिकारी  व कर्मचाऱ्यांचे स्वॅब नमुने तपासणीसाठी पाठविण्याचा निर्णय घेतला आहे.

हिंगोलीत कोरोनाबाधीतांची संख्या ८९

हिंगोलीत आतापर्यंत कोरोनाबाधीतांची संख्या ८९ झाली आहे. यामधे राज्य राखीव दलाच्या ८३ जवानांचा समावेश आहे. तर उर्वरीत सहा जणांमध्ये एक शासकिय रुग्णालयातील परिचारिका, तसेच वसमत येथील एक व्यक्ती, सेनगाव तालुक्यातील जांभरून रोडगे येथील  दोघे जण तर हिंगोली तालुक्यातील हिवराबेल येथील दोघांचा समावेश आहे. या सर्वांची प्रकृती चांगली असल्याचे रुग्णालयाच्या सुत्रांनी सांगितले.

हिंगोली शहराचा भाग सील

हिंगोली शहरांमधून परिचारिकेचा अहवाल पॉझिटिव्ह आल्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून प्रशासनाने शहराचा काही भाग सील केला आहे. जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी, उपविभागीय अधिकारी अतुल चोरमारे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. शिवाजी पवार. पालिका मुख्याधिकारी रामदास पाटील यांच्या पथकाने तातडीने बैठक घेऊन शहराचा काही भाग सील करण्याचा निर्णय घेतला आहे.

शासकीय रुग्णालयातील त्या परिचारिका सह त्यांच्या कुटुंबियातील काहीजणांना विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले आहे. त्यांचे स्वॅब नमुने तपासणीसाठी घेतले जाणार असून त्यांच्या संपर्कात आलेल्या इतर परिचारिकांचे देखील स्वॅब नमुने तपासणीला पाठवले जाणार आहेत.