आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Unrest In Shiv Sena Faction Due To Raj Thackeray's Rally, Latest News And Update

शिवसेनेच्या गोटात अस्वस्थता:'राज'सभेपासून शिवसैनिकांना कसे ठेवणार दूर? शिवसेनेने शोधली प्रशिक्षण शिबिराची मात्रा!

15 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्या औरंगाबादेतील सभेमुळे शिवसेनेच्या गोटात प्रचंड अस्वस्थता पसरली आहे. मनसेच्या नेत्यांनी या सभेला शिवसेना, काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस या तिन्ही सत्ताधारी पक्षांचे शेकडो नेते व कार्यकर्ते उपस्थित राहणार असल्याचा दावा केला. यामुळे सेनेच्या स्थानिक नेत्यांत खळबळ माजली. त्यामुळे या सभेपासून शिवसैनिकांना कसे दूर ठेवायचे? यासाठी त्यांनी अनेक पर्याय शोधले. अखेर त्यांना यावर प्रशिक्षण शिबिराची मात्रा सापडली.

राज ठाकरे यांनी मनसेच्या स्थापनेनंतर महाराष्ट्राच्या विकासाची ब्ल्यूप्रिंट मांडली. त्यांनी मराठी व परप्रांतीयांच्या मुद्यावर अनेक वर्षे राजकारण केले. प्रारंभी मनसेचे काही निवडक आमदार विधानसभेत पोहोचले. पण, त्यानंतर मात्र पक्षाला अपेक्षित यश मिळाले नाही. अखेर, त्यांनी अचानक कट्टर हिंदुत्वाच्या मार्गावर वाटचाल करुन हिंदुत्ववादी संघटनांत विशेषतः शिवसेनेच्या गोटात एकच खळबळ उडवून दिली.

सूत्रांच्या माहितीनुसार, राज ठाकरेंच्या औरंगाबादेतील सभेपासून शिवसैनिकांना दूर ठेवण्यासाठी सेनेने रविवारी प्रशिक्षण शिबिराचे आयोजन केले होते. या शिबिराला राज्याचे उद्योगमंत्री तथा औरंगाबादचे पालक मंत्री सुभाष देसाई, आमदार अंबादास दानवे, माजी महापौर नंदकुमार घोडेले आदी प्रमुख नेते उपस्थित होते. सकाळी सुरू झालेले हे शिबिर सायंकाळी उशिरापर्यंत सुरू होते. त्याला अनेक शिवसैनिकांची उपस्थिती होती. सूत्रांनी या शिबिरातील अनेकांची राज ठाकरेंच्या सभेला जाण्याची इच्छा असल्याचा दावा केला. पण, नेत्यांच्या धाकापोटी त्यांना गप्प गुमान आहे त्या ठिकाणी थांबावे लागले.

'शिवसेनेने या शिबिराला प्रशिक्षणाचे नाव दिले. पण, या शिबिराचा मूळ उद्देश शिवसैनिकांना राज ठाकरेंच्या सभेपासून दूर ठेवणे हाच होता,' असे सूत्र म्हणाले.

मनसेच्या सभेला भाजपची गर्दी

तत्पूर्वी, माजी खासदार तथा सेना नेते चंद्रकांत खैरे यांनी भाजपने राज यांच्या सभेसाठी पैसे देऊन गर्दी जमवल्याचा आरोप केला. ते म्हणाले -'मनसेच्या सभेला लाखो लोक आले तरी आम्हाला काहीच फरक पडत नाही. ही गर्दी आमच्या जून्या मित्र्यांच्या पाठिंब्याने जमविली जात आहे. या गर्दीचा पुरस्कर्ता कोण हे पत्रकारांनी शोधून काढावे.' सभेसाठी अनेकांना हजार रुपये व चहा-पाणी व नाश्त्याचे आमिष दाखवण्यात आल्याचेही ते यावेळी म्हणाले.

बातम्या आणखी आहेत...