आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • 10 Coaches Of Pawan Express Derailed Near Nashik, One Killed, Several Injured | Marathi News |

नाशिकमध्ये रेल्वे अपघात:देवळालीलगत पवन एक्सप्रेसचे 10 डबे रुळावरुन घसरले, 5 हून अधिक प्रवाशी जखमी, घटनास्थळी मदतकार्य सुरू

नाशिक4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबईहून बिहारच्या दरभंगाकडे जाणाऱ्या पवन एक्सप्रेसला (11061) रविवारी नाशिकच्या देवळालीलगत मोठा अपघात झाला. या एक्सप्रेसचे तब्बल 10 डबे रुळावरुन घसरले. त्यात 5 हून अधिक प्रवाशी जखमी झाले. पण, घटनास्थळावरील चित्र पाहता जखमींचा आकडा 10 हून मोठा असल्याचा दावा केला जात आहे.

रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार, पवन एक्सप्रेस सकाळी 11.30 वा. मुंबईच्या लोकमान्य टिळक टर्मिनसवरुन जयनगरच्या (दरभंगा) दिशेने निघाली होती. त्यानंतर दुपारी 3.30 च्या सुमारास तिला नाशिकलगत मोठा अपघात झाला. नाशिकहून 20 किमी अंतरावर असलेल्या लहवीत-देवळाली दरम्यान तिचे 10 डबे अचानक रुळावरुन घसरले. त्यात 5 जण जखमी झाले. या अपघाताची माहिती मिळताच प्रशासनाने स्थानिकांच्या मदतीने मदतकार्य सुरू केले. अपघात निवारण गाडी व मेडिकल व्हॅनही तातडीने घटनास्थळी दाखल झाली आहे.

हा अपघात एका डोंगरावरील धोकादायक वळणावर झाला आहे. त्यात रुळांचे मोठे नुकसान झाल्यामुळे या मार्गावरील रेल्वे वाहतूक सुरूळीत होण्यास वेळ लागणार आहे. जखमींना लगतच्या रुग्णालयांत दाखल करण्यात आले आहे. नाशिकचे निवासी उपजिल्हाधिकारी भागवत डोईफोडे यांनी स्थानिक तहसीलदार व मंडळ अधिकाऱ्यांना मदत कार्यावर लक्ष्य ठेवण्याचे निर्देश दिलेत.

उल्लेखनीय बाब म्हणजे मुंबईहून बिहारकडे जाणाऱ्या प्रवाशी रेल्वे नेहमीच प्रवाशांनी गजबजलेल्या असतात. त्यामुळे जखमींचा आकडा आणखी वाढण्याची भीती आहे. अधिकाऱ्यांच्या मते, सर्वाधिक नुकसान A1व B2 या दोन डब्यांचे झाले आहे.या अपघातानंतर मध्य रेल्वेने 3 रेल्वे रद्द केल्यात. तर 3 रेल्वेंचे मार्ग बदललेत. रेल्वेने या प्रकरणी काही हेल्पलाईन क्रमांकही जारी केलेत.

11 रेल्वे गाड्या रद्द

या अपघातामुळे मध्य रेल्वेच्या 11 गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. तर 10 गाड्यांचे मार्ग आपत्कालीनस्थितित बदलण्यात आले. त्यात पवन एक्सप्रेसच्या अपघातामुळे मुंबईहून सुटणारी देवगिरी एक्सप्रेस, हुजूरसाहिब राज्यराणी एक्सप्रेस, नंदिग्राम एक्सप्रेस, अमरावती एक्सप्रेस, पुरी एक्सप्रेस रद्द करण्यात आली आहे. तर दुरांतो एक्सप्रेस, हजरत निजामुद्दीन राजधानी एक्सप्रेस, उद्योगनगरी एक्सप्रेस, सुलतानपूर सुपरफास्ट एक्सप्रेस, पंजाब मेल, पाटणा-जनता एक्सप्रेस, सेवाग्राम या रेल्वेगाड्यांचा मार्ग बदलण्यात आल्याची माहिती मध्य रेल्वेने दिली आहे.

या अपघातामुळे विदर्भ सुपरफास्ट एक्सप्रेस (12016), देवगिरी (1758), नंदिग्राम एक्सप्रेस (11402) , तपोवन (17618) या 4 रेल्वेंचा प्रवास अर्ध्यातच थांबला आहे. त्यामुळे प्रवाशांची मोठी गैरसोय झाली आहे.

हेल्पलाईन क्रमांक

सीएसएमटी- 022-22694040

रेल्वे -55993

हेल्पलाइन क्रमांक - 022-67455993

नाशिक रोड -0253- 2465816

भुसावळ - 02582-220167

बातम्या आणखी आहेत...