आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
देशातील प्रत्येक भागात कोरोना प्रतिबंधक लसीच्या वितरणाचे संभाव्य दायित्व पार पाडण्यासाठी वायुदल सज्ज आहे. दुर्गम भागातील लस पुरवण्याची जबाबदारी सैन्यावर सोपवली जाण्याची दाट शक्यता आहे. याचा अंदाज घेत वायुदलाने या दिशेने राष्ट्रव्यापी अभियानाची रूपरेषा आखणे सुरूदेखील केले आहे.
वायुदलाच्या सूत्रांनुसार, लसीच्या एअरलिफ्टिंगसाठी मालवाहू विमानांतील बदल, लस वितरण केंद्र आणि लास्ट पॉइंट डिलिव्हरीसाठी हेलिकॉप्टरचे प्रकार व संख्याही निश्चित करण्यात आली आहे. लसीचा साठा केला जाणाऱ्या २८ हजार शीतगृहांपर्यंत जास्तीत जास्त भार वाहून नेण्यासाठी सी-१७ ग्लोबमास्टर, सी-१३६ जे सुपर हर्क्युलिस आणि आयएल-७६ सारखी कार्गो विमाने तैनात असतील. लहान केंद्रांसाठी वर्कहोर्स एएन-३२ आणि डोर्नियिर विमानांचा वापर केला जाईल. तसेच तिसरा पर्याय म्हणून मीडियम लिफ्ट हेलिकॉप्टर राखीव ठेवले जातील. यात एएलएच, शिनूक, चिता आणि चेतकसारख्या हेलिकॉप्टरची महत्त्वाची भूमिका असेल.
वायुदलाच्या अधिकाऱ्याने “भास्कर’ला सांगितल्यानुसार, या अभियानासाठी लागणारी मालवाहतूक विमाने आणि हेलिकॉप्टरच्या संख्येचा अंदाज आता लावता येणार नाही. लस वितरणासाठी टास्क फोर्स तयार केल्यावर याचा अंदाज येईल. मात्र या अभियानासाठी १०० पेक्षा जास्त विमाने आणि हेलिकॉप्टर राखीव ठेवण्याचे काम वायुदलाकडून सुरू आहे. वायुदलाकडे लस वाहतुकीचा पुरेसा अनुभव आहे. दोन वर्षांपूर्वी मीजल्स व रुबेलावरील लस वितरणात वायुदलाने महत्त्वाची भूमिका निभावली होती.
दरम्यान, नोटबंदीच्या वेळी बँकांपर्यंत चलन पोहोचवणे आणि निवडणुकीच्या काळात ईव्हीएम तसेच कर्मचाऱ्यांच्या वाहतुकीप्रमाणेच लस वितरणाचे अभियान राबवले जाईल, असेही त्यांनी सांगितले. वायुदलाचे माजी अधिकारी ग्रुप कॅप्टन संदीप मेहता यांनी सांगितले की, टास्क फोर्समध्ये सहसा संबंधित मंत्रालयांचे अधिकारी व बचाव दलाच्या प्रतिनिधींचा समावेश असतो. यंदा लस वितरणासाठी संरक्षण मंत्रालय, गृह मंत्रालय, आरोग्य मंत्रालय आणि वायुदलाच्या प्रतिनिधींचा टास्क फोर्स तयार केला जाईल. विमानतळांवर वेळेवर लस पोहोचवणे, विमानात लोड करणे, शीतगृहात लसीचे बॉक्स उतरवणाऱ्या कुशल कर्मचाऱ्यांवर निगराणी ठेवण्याचे तसेच या संबंधित इतर कामे टास्क फोर्सतर्फे केली जातील. औषधनिर्मिती कंपन्यांकडून लस ड्राय आइस बॉक्समध्ये मिळेल. मात्र यांचा आकार आणि हाताळण्यासंबंधीची दक्षता वायुदलाकडून घेतली जाईल.
‘मिशन व्हॅक्सिन’चा लडाखमधील रणनीतीवर परिणाम होऊ नये, याचीही विशेष काळजी
वायुदलाच्या अधिकाऱ्याने सांगितले, लडाखमध्ये सैन्याला होणाऱ्या पुरवठ्यावर लस वितरणाचा किंचितसाही परिणाम होणार नाही, याची काळजी घेतली जात आहे. सैन्य आणि लस वितरणाला एकसमान महत्त्व देण्याचा आणि त्याप्रमाणे संसाधने पुरवण्याचा रोडमॅप तयार केला जात आहे.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.