आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • 12 States Says Take Only 3 4 Subjects, Reduce Time Too; 8 States Said Vaccinate Or Cancel The Exam

दिव्य मराठी विशेष:12 राज्यांचे मत - फक्त 3-4 विषयांची परीक्षा घ्या, वेळही घटवावा; 8 राज्ये म्हणाली - लस द्या किंवा परीक्षा रद्द करा

अनिरुद्ध शर्मा | नवी दिल्ली2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • सीबीएसईच्या 12 वीच्या परीक्षेचा पॅटर्न ठरवण्यासाठी सर्व राज्यांनी केंद्राला पाठवल्या सूचना

देशभरात १२ वीच्या परीक्षेबाबत राज्यांनी आपल्या सूचना केंद्राला पाठवल्या आहेत. कमी अवधीसाठी फक्त ३-४ पेपर घ्यावेत, असे १२ राज्यांनी म्हटले आहे, तर परीक्षेआधी सर्व विद्यार्थ्यांना लस द्यावी किंवा परीक्षाच रद्द करावी, असे दिल्ली, महाराष्ट्र, राजस्थानसह ८ राज्यांचे मत आहे. आम्ही राज्य बोर्डातही सीबीएसईचा पॅटर्न वापरू, असे अनेक राज्यांनी सांगितले.

रविवारी संरक्षणमंत्री राजनाथसिंह यांच्या अध्यक्षतेखाली देशभरातील शिक्षणमंत्र्यांची बैठक झाली होती. त्यानंतर शिक्षणमंत्री रमेश पोखरियाल निशंक यांनी सर्व राज्यांना मंगळवारपर्यंत सूचना पाठवण्यास सांगितले होते. दरम्यान, सोमवारी रात्री पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही संरक्षणमंत्री आणि शिक्षणमंत्र्यांसोबत बैठक घेऊन याबाबतची प्रगती जाणून घेतली. दिल्लीचे शिक्षणमंत्री मनीष सिसोदिया यांनी सूचना केली की, १२ वर्षांवरील मुलांना दिल्या जात असलेल्या फायझरच्या लसीची केंद्र सरकारने व्यवस्था केली तर मग सर्व विद्यार्थ्यांच्या लसीकरणानंतर परीक्षा होऊ शकते. महाराष्ट्र, झारखंड, केरळ, मेघालय, अरुणाचल, तामिळनाडू आणि राजस्थाननेही परीक्षेआधी लस देण्याची सूचना केली. महाराष्ट्राने ऑनलाइन परीक्षेचीही सूचना केली. फक्त मुख्य विषयांची परीक्षा व्हावी, अवधी कमी असावा आणि परीक्षा आपल्या शाळेतच व्हावी, असे मत यूपी, जम्मू-काश्मीर, गुजरात, अासाम, हिमाचल, चंदीगड, सिक्कीम, पंजाब, आंध्र प्रदेश, तेलंगण, बिहार आणि ओडिशाने व्यक्त केले. आम्ही सर्वसंमतीने निश्चित झालेल्या सीबीएसईचा पॅटर्न वापरू, असे कर्नाटक, पुद्दुचेरीने म्हटले. यूपीने म्हटले आहे की, सहमती झाल्यास आम्ही एक महिन्यात राज्यात बोर्डाची परीक्षा आयोजित करून निकालही जाहीर करू. मध्य प्रदेशने जूनच्या पहिल्या आठवड्यात परीक्षेची घोषणा केली होती, त्यावर त्यांना निर्णय घ्यायचा आहे. हरियाणाने १५ ते २० जूनदरम्यान तयारी केली आहे. छत्तीसगडमध्ये १ ते ५ जूनदरम्यान घरांत ऑफलाइन परीक्षा होईल.

२९७ विद्यार्थ्यांचे सरन्यायाधीशांना पत्र, बोर्ड परीक्षा रद्द करण्याची मागणी
सीबीएसई १२ वीची परीक्षा रद्द करण्याबात २९७ विद्यार्थ्यांनी सरन्यायाधीशांना पत्र लिहिले आहे. विद्यार्थ्यांनी पत्रात म्हटले आहे की,‘सरन्यायाधीशांनी स्वत: याची दखल घ्यावी. मागील वर्षाप्रमाणेच पर्यायी मूल्यांकन योजना बनवण्याचे निर्देश द्यावेत. कोरोनामुळे अनेक विद्यार्थ्यांनी आप्तांना गमावले असल्याने सध्या परीक्षा घेणे योग्य नाही. त्यामुळे लाखो विद्यार्थी, शिक्षक, कर्मचारी आणि पालकांच्या जिवाला धोका निर्माण होऊ शकतो. अनेक राज्यांत लॉकडाऊन सुरू आहे. अनेक विद्यार्थी सध्या परीक्षा केंद्रांच्या ठिकाणी नाहीत. ऑफलाइन परीक्षा झाली तर त्यांना प्रवास करून परीक्षा स्थळांपर्यंत जाणे कठीण होईल. अनेक विद्यार्थी १८ वर्षांखालील आहेत. लस न दिल्याने त्यांना धोका असेल.’ पत्रात असेही म्हटले आहे की, बोर्ड परीक्षा स्थगित झाल्याने विद्यार्थी संभ्रमितही आहेत. आपण विदेशी विद्यापीठे आणि कॉलेजच्या प्रवेश परीक्षा देऊ शकू की नाही, याबाबत त्यांच्या मनात संभ्रम आहे.

बातम्या आणखी आहेत...