आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • 15 Lakh Cows Infected With Lumpy In 15 States; 1,435 Animals Affected In Maharashtra

75 हजार गायी दगावल्या:15 राज्यांमध्ये 15 लाख गायींना लम्पीची लागण; महाराष्ट्रात 1,435 जनावरे बाधित

अवधेश आकोदिया |जयपूर21 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

लम्पी चर्मरोगाचे देशभरात थैमान सुरू असून देशात १५ राज्यांमधील १७५ जिल्ह्यांत त्याचा प्रादुर्भाव झाला आहे. अधिकृत आकडेवारीनुसार देशभरात आतापर्यंत १५ लाखांपेक्षा अधिक गायी तसेच जनावरांना याची लागण झाली असून आतापर्यंत ७५ हजार गायी दगावल्या आहेत. प्रत्यक्षात याचा आकडा अधिक असण्याची शक्यता आहे. मात्र देशात ५७ हजार गायी मृत्युमुखी पडल्याचे केंद्रीय पशुसंवर्धन मंत्री पुरुषोत्तम रुपाला यांनी सांगितले.

दरम्यान, राज्यात लम्पी आजाराच्या प्रादुर्भावाने मृत झालेल्या जनावरांसाठी शेतकरी, पशुपालकांना जिल्हा परिषदेच्या निधीतून १० हजार रुपये मदत देण्याचे आदेश महसूल, पशुसंवर्धन मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी गुरुवारी जळगाव येथील बैठकीत दिले आहेत. पशुधनाची आकडेवारी पाहता राजस्थानमध्ये ३३ पैकी ३१, गुजरातमध्ये ३३ पैकी २६, पंजाबच्या सर्व म्हणजे २३, हरियाणातही सर्व २२ आणि उत्तर प्रदेशातील ७५ पैकी २१ जिल्ह्यांत लम्पीचा प्रादुर्भाव मोठया प्रमाणात आहे.तर महाराष्ट्रात त्यातुलनेने कमी म्हणजे १७ जिल्ह्यांमध्ये याचा प्रादुर्भाव झाला आहे. यामुळे विशेषत: गो पालनावर अवलंबून असलेल्या कुटुंबांसमोर उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे. दुसरीकडे दुधाचीही टंचाई जाणवत आहे. ज्या राज्यांमध्ये प्रादुर्भावर मोठ्या प्रमाणात आहे तिथे पाऊस कधी थांबतो याकडे राज्य सरकारांचे लक्ष लागून आहे. पावसामुळे या आजाराचा प्रादुर्भाव अधिक होत असल्याचे मानले जात आहे. पाऊस थांबताच डास,माश्या कमी होतील आणि लम्पी आटोक्यात येऊ शकेल. दरम्यान,जनावरांचे लसीकरणही वेगात सुरु आहे. सध्या गायींना पॉक्स लस दिली जात आहे. राष्ट्रीय अश्व संशोधन केंद्र आणि भारतीय पशु चिकित्सा संशोधन संस्था स्वदेशी लस निर्मितीची तयारी करीत आहे.

टंचाईमुळे दुध संघांनी दर वाढवले

लम्पीची लागण झाल्यास गायीच दूध कमी होते अथवा पूर्ण बंदच होऊन जाते. राजस्थानात सर्वाधिक प्रादुर्भाव झालेल्या ५ जिल्ह्यांमध्ये दूध उत्पादन ३० टक्के घटले आहे. गुजरातमध्ये याचे प्रमाण १० टक्के तर पंजाबमध्ये ८ टक्के घट झाली आहे. पाऊस थांबल्यानंतर दूध टंचाई अधिक वाढण्याची भीती व्यक्त केली जाते. कारण सध्या हिरवा चारा अधिक खाल्याने दूधाळ जनावरे अधिक दूध देत आहेत. पुरवठा घटल्यामुळे काही दूध संघांनी दुधाचे दर लिटरमागे २ ते ४ रुपयांनी वाढवले आहेत. प्रादुर्भाव झालेल्या गायींचे प्रमाण केवळ १.०३ टक्के : राष्ट्रीय डेअरी विकास महामंडळाच्या २०१९ च्या पशुगणनेनुसार देशात एकूण १९.२४ कोटी गोधन आहे. यापैकी १४.५ गायी असून लम्पीची लागण झालेल्या गायींची संख्या पाहता ही संख्या केवळ १.०३ टक्के आहे.

सणासुदीच्या हंगामापर्यंत परिस्थिती सुधारेल
लम्पी लागण झाल्यास गायीचे दूध कमी होते. आमच्याकडे पुरवठा अर्धा टक्का घटला आहे. सणासुदीपर्यंत परिस्थितीत सुधारणा होण्याची आशा आहे. मागणी प्रमाणे पुरवठा करण्याची योजना तयार करीत आहोत. - आर.एस. सोधी,व्यवस्थापकीय संचालक,अमूल

देखभाल चांगली असूनही जास्त दूध

देणाऱ्या देशी गायींमध्येच अधिक फैलाव

लम्पी रोगाचा प्रादुर्भाव झालेल्यांमध्ये देशी गायी अधिक आहेत, ही अचंबित करणारी बाब आहे. राजस्थान पशुसंवर्धन विद्यापीठाचे निवृत्त कुलगुरू डॉ. ए.के. गहलोत यांच्या मते, चांगली देखभाल असूनही राठी, थारपारकर, कांकरेज, गीर आणि साहिवाल जातींमध्ये संसर्ग जास्त असून या पाच जातींच्या गायी अधिक दूध देतात.

काय आहे आजार

हा आजार जुलै २०१९ मध्ये प्रथम बांगलादेशात आढळला.त्याचवर्षी भारतातील पूर्वेकडील राज्ये पश्चिम बंगाल व ओडिशामध्ये व यावर्षी अंदमान-निकोबारसह पश्चिम आणि उत्तरेकडील राज्यात प्रादुर्भाव झाला. लम्पी विषाणूमुळे चर्मरोग होतो. जनावरांमध्ये त्याची झपाट्याने लागण होते. काही डास, माशा आणि चिलटांद्वारे याचा फैलाव होतो.

महाराष्ट्रातील स्थिती
1435 बाधित जनावरे
52 जनावरे दगावली
17 जिल्ह्यांमध्ये प्रादुर्भाव.
आठवडे बाजार बंद
5 लाख 17 हजार जनावरांना लस देण्याचे उद्दिष्ट. 2.80 लाख जनावरांचे लसीकरण झाले. सर्व जिल्ह्यांत आठवडी बाजारासह आंतरजिल्हा, आंतर तालुका, आंतरराज्य जनावरे वाहतुकीला बंदी.

याला महामारी जाहीर केले जावे
(एक्स्पर्ट| देविंदर शर्मा, कृषितज्ज्ञ)

लम्पीचा कहर कोरोनाएवढाच भीषण आहे. कोरोनाची लागण मनुष्याला झाली तर लम्पीमुळे जनावरे बाधित होत आहेत. दुर्दैवाने जनावरे आपली व्यथा सांगू शकत नाहीत. सन २०१९ पासून हा आजार होतोय, परंतु दोन वर्षांत त्याची संख्या कमी होती. या वर्षी मे-जूननंतर कोरोनाप्रमाणे त्याचे साथीच्या आजारात रूपांतर झाले. केंद्र सरकारने तत्काळ पावले उचलावी आणि त्याला महामारी जाहीर करून राष्ट्रीय आपत्कालीन प्राधिकरणाने त्याचे बचाव कार्य हाती घेतले पाहिजे. ज्या शेतकरी, पशुपालकांची जनावरे दगावली आहेत त्यांना भरपाई मिळाली पाहिजे. उद्योगपतींना पॅकेज मिळू शकते, मग शेतकरी, पशुपालकांना का नाही ?

बातम्या आणखी आहेत...