आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिवसेना बंड:सेनेच्या 35 आमदारांसाठी 150 पोलिस ; दुपारनंतर एकूण 35 जणांचा जथ्था हॉटेलात दाखल

सुरत7 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोमवारी (२० जून) दिवसभर विधान परिषदेच्या १० जागांसाठी झालेल्या मतदानाच्या धावपळीनंतर राज्याच्या राजकारणात राजकीय भूकंप येईल याची कल्पना कुणालाही नसेल. मतदान आटोपल्यानंतर शिवसेनेचे अनेक आमदार अचानक बेपत्ता होण्यास सुरुवात झाली. परिषदेच्या निकालानंतर थकलेले सेनेचे आमदार आल्यापावली परतत असतील या संभ्रमात शिवसेना असतानाच अचानक मातोश्रीसह अनेक राजकारण्यांचे फोन खणखणण्यास सुरुवात झाली. अन् महाराष्ट्राच्या राजकारणाची ‘सुरत’ बदलून गेली. पाहता-पाहता सेनेचे एक-दोन नाही तर तब्बल ३५ आमदार महाराष्ट्रातून ‘गायब’ झाले अन् ते सापडले दुसऱ्या दिवशी थेट सुरतमध्ये. रात्री जेवण आटोपून शिवसेनेचे एकनाथ शिंदे आपल्या मोजक्याच आमदार आणि समर्थकांसह थेट सुरतच्या दिशेने निघाले. २८४ किलोमीटरचे हे अंतर. मुंबईवरून शिंदेंची ही टीम रात्री ११ च्या सुमारास सुरतेकडे निघाली. वसई, पालघर, सिल्वासा करत ही टीम वलसाडला पोहोचली. मध्यरात्री गुजरातच्या वलसाडमध्ये गुजरात भाजपचे काही नेते आणि कार्यकर्ते त्यांची वाट पाहत होते. हे सारे महाराष्ट्रातील शिवसेनेचे आमदार असल्याची माहिती स्थानिक पोलिसांना देण्यात आली. गुजरात आयबीने हा रिपोर्ट त्वरित वरिष्ठांना कळवला अन् इथूनच हालचालींनी अधिक वेग घेतला.

रात्री १:०० वाजता : वलसाडवरूनच भाजपने दाखवली दिशा : गुजरात भाजपचे काही नेते व कार्यकर्ते एकनाथ शिंदे यांची वलसाडजवळ वाट पाहत होते. त्यांनी येथूनच शिंदे यांच्या गाड्यांसाठी मार्गदर्शक म्हणून काम केले. शिंदे यांच्यासमवेत या वेळी ५ आमदार व ८ समर्थक होते. सारेच आमदार असल्याचे कळल्याने आयबीनेही १३ आमदार सुरतेत दाखल अशी माहिती कळवली होती. मात्र शिंदे यांच्यासोबत केवळ ५ आमदार असून इतर ८ जण त्यांचे समर्थक असल्याचे नंतर पोलिसांना कळले.

दुपारी २ वा. : डॉ. संजय कुटे ला मेरिडियनमध्ये दाखल : भाजपचे गुजरात प्रदेशाध्यक्ष सी. आर. पाटील हे त्यांच्या काही विश्वासू समर्थकांसह रात्री २ वाजेपासूनच हॉटेलमध्ये तळ ठोकून होते. सकाळी ते गेल्यानंतर विदर्भातील बुलडाण्यातील जळगाव जामोदचे भाजप आमदार डॉ. संजय कुटे यांची दुपारी दोन वाजता हॉटेलात एन्ट्री झाली.

दुपारी ४ वा. : अन् ४ वाजताचे उड्डाण रद्द : सुरत विमानतळावर दाखल झालेल्या चार्टर प्लेनला दिल्लीकडे उड्डाणासाठी दुपारी ४ वाजताची वेळ दिली गेली होती. पण शिंदे यांची हॉटेलमधील आमदारांशी सुरू असलेली बैठक लांबली. यातच शिंदे यांच्याशी वाटाघाटी करण्यासाठी शिवसेनेचे सचिव व उद्धव ठाकरे यांचे विश्वासू मिलिंद नार्वेकर आणि एकनाथ शिंदे यांचे निकटवर्तीय मानले जाणारे रवींद्र फाटक मुंबईवरून निघाल्याचे वृत्त आल्याने दुपारी ४ वाजता दिल्लीला जाणाऱ्या विमानाचे उड्डाण रद्द झाले.

दुपारी ४:३० वा. : नार्वेकर, फाटक यांना गुजरात पोलिसांनी रोखले : मिलिंद नार्वेकर आणि रवींद्र फाटक हे दोघेही सुरतमध्ये ४:३० वाजता दाखल झाले. हॉटेलचा पत्ता चुकल्याने आधी ते काही अंतर पुढे गेले. त्यानंतर ते पुन्हा वळसा घेऊन ला-मेरिडियन हॉटेलजवळ आले. नंतर हॉटेलात गेले.

पहाटे ४:१५ : नितीन देशमुख रुग्णालयात : शिंदे यांच्या ताफ्यातील बुलडाण्याचे आमदार नितीन देशमुख यांना अचानक छातीत दुखू लागल्याने सकाळी ४:१५ वाजता सुरतच्या जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांच्यावर उपचार करून त्यांना परत पाठवण्यात आल्याचे सांगण्यात आले.

सकाळी ६ वा. : ११ - २५-३५ नेमके किती? : शिवसेनेचे काही आमदार बंडखोरी करून सुरतमध्ये आल्याची माहिती स्थानिक प्रसारमाध्यमांमध्ये सकाळी ६ वाजता पसरली. यानंतर ला मेरिडियन हॉटेलबाहेर माध्यम प्रतिनिधींनी गर्दी करण्यास सुरुवात केली. आधी आयबीच्या रिपोर्टनुसार ११ आमदार असल्याचे सांगण्यात आले. नंतर विविध मार्गांनी आमदार हॉटेलमध्ये दाखल होत गेले तशी ही संख्या बदलत गेली. काही आमदार हे नाशिकमार्गे रस्त्याने सुरतेत दाखल झाले तर काही आमदार विमानाने सुरतेत दाखल झाल्याचे सांगण्यात आले. दुपारपर्यंत हा आकडा ३५ पर्यंत जाऊन पोहोचला आणि महाराष्ट्राच्या राजकारणात एकच खळबळ माजली.

सकाळी ७ वा. : दीडशे पोलिस अन् क्राइम ब्रँचची एक तुकडी : हॉटेलमध्ये असल्याने गुजरात पोलिसांनी सकाळी ७ पासूनच हॉटेलमधील बंदोबस्त वाढवण्यास सुरुवात केली. पाहता-पाहता हॉटेलबाहेर दीडशे पोलिसांचा ताफा १८ गाड्यांतून पोहोचला. विशेष म्हणजे सुरत क्राइम ब्रँचची एक टीम हॉटेलबाहेर बंदोबस्तात होती.

सकाळी ९ वा. : तीन चेक पॉइंट अन् नो एन्ट्री : पोलिसांनी ला मेरिडियन हॉटेलला वेढा घातल्यानंतर हॉटेलने ९ वाजेपासून बुकिंग करणे थांबवले. २४ जूनपर्यंत हॉटेलच्या सर्व खोल्यांचे बुकिंग फुल झाले असून, हॉटेल सामान्य ग्राहकांसाठी बंद असल्याचे सांगण्यात आले. हॉटेलच्या सर्व कर्मचाऱ्यांना एकत्र करत पोलिसांनी त्यांच्या ओळखपत्रांची तपासणी केली व त्या सर्वांचे मोबाइल जप्त करण्यात आले.

दुपारी १:३० वा. : सुरत विमानतळावर अचानक आले चार्टर फ्लाइट : हॉटेलमध्ये घडामोडींना वेग आला असतानाच अचानक सुरत विमानतळावर दुपारी १:३० वाजता एक चार्टर प्लेन उतरले. कोणतेही शेड्यूल नसताना व बुकिंग नसतानाही हे प्लेन विमानतळावर का आले, असा प्रश्न अनेकांना पडला. सुरत विमानतळावरून दिल्लीत लँड करण्यासाठीची वेळ विचारण्यात आली. हे प्लेन काही तासांत दिल्लीला जाणार असल्याचे सांगण्यात आले.

बातम्या आणखी आहेत...