आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराPUBG खेळू न दिल्याने संतापलेल्या 16 वर्षांच्या मुलाने आईला गोळ्या झाडून ठार केले. त्यानंतर तो तीन दिवस आईच्या मृतदेहासोबत घरातच राहिला. 10 वर्षांच्या बहिणीलाही त्याने धमकावून ठेवले होते. मृतदेह कुजल्यामुळे दुर्गंधी पसरली तेव्हा लष्करात अधिकारी असलेल्या वडिलांना स्वत: फोन करून आईची हत्या झाल्याचे सांगितले. मंगळवारी रात्री वडिलांच्या माहितीवरून पोलिसांनी मृतदेह बाहेर काढला.
नवीन कुमार सिंग हे मूळचे वाराणसीचे असून ते लष्करात कनिष्ठ आयोग अधिकारी आहेत. त्यांची पोस्टिंग पश्चिम बंगालमध्ये आहे. लखनऊच्या पीजीआय भागातील यमुनापुरम कॉलनीत त्यांचे घर आहे. येथे त्यांची पत्नी साधना (40 वर्षे) त्यांचा 16 वर्षीय मुलगा आणि 10 वर्षांच्या मुलीसोबत राहत होती. मुलाने मंगळवारी रात्री वडील नवीन यांना व्हिडिओ कॉल करून आईची हत्या केल्याचे सांगितले. तसेच मृतदेह वडिलांना दाखवला. नवीन यांनी एका नातेवाईकाला फोन करून लगेच त्यांच्या घरी पाठवले. पोलिस आल्यावर घरातील परिस्थिती पाहून ते थक्क झाले.
पोलिसांचा दावा - मोबाइलवर गेम खेळण्यापासून रोखल्याने हत्या
एडीसीपी काशिम आब्दी यांनी दिलेल्या माहितीनुसार, मुलाला मोबाइलवर गेम खेळण्याची सवय होती, मात्र साधना त्याला गेम खेळण्यापासून रोखत असत. शनिवारी रात्रीही त्यांनी आपल्या मुलाला गेम खेळण्यास मनाई केली. यामुळे मुलगा संतापला. रात्री दोन वाजण्याच्या सुमारास साधना गाढ झोपेत असताना त्याने कपाटातून वडिलांचे पिस्तूल काढून आईची हत्या केली. यानंतर बहिणीला धमकावून त्याच खोलीत बंद केले.
भावाच्या भीतीने आईच्या मृतदेहासोबत झोपून राहिली चिमुकली
मंगळवारी रात्री उशिरा पोलिसांनी बाहेरचे दार उघडले असता घरातून असह्य दुर्गंधी येत होती. नाकाला रुमाल बांधून पोलीस कसेतरी आत शिरले तेव्हा साधना यांचा कुजलेला मृतदेह बेडवर पडलेला होता. मृतदेह इतका कुजला होता की चेहरा ओळखणे कठीण झाले होते. साधना यांची 10 वर्षांची मुलगीही त्याच खोलीत रडत होती. मुलाने बहिणीसमोरच आईवर गोळ्या झाडल्याचा पोलिसांचा दावा आहे. यामुळे ती इतकी घाबरली की भावाच्या सांगण्यावरून ती आईच्या मृतदेहाजवळ झोपली.
मृतदेहाशेजारी पिस्तूल, संपूर्ण मॅगझिन रिकामी
साधना यांच्या मृतदेहाजवळ पोलिसांना नवीनचे परवाना असलेले पिस्तूल सापडले. पिस्तुलाची मॅगझीन पूर्णपणे रिकामी होती. यावरून मुलाने सर्व गोळ्या आईवर झाडल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. मात्र, मृतदेह कुजल्यामुळे शरीरावर बंदुकीच्या गोळ्या दिसत नव्हत्या. पोलिसांनी मुलाची खूप चौकशी केली, पण त्याला किती गोळ्या झाडल्या हे सांगता आले नाही. यासाठी पोलीस पोस्टमॉर्टम रिपोर्टची वाट पाहत आहेत.
वाढदिवसाच्या रात्री आई-मुलामध्ये वाद
दुसरीकडे, साधना आपल्या मुलाला कशाचा तरी राग येऊन त्रास देत होत्या, असेही पोलिसांचे म्हणणे आहे. ऑक्टोबरमध्ये मुलाचा वाढदिवस होता. वाढदिवसाच्या त्याच रात्री मुलाने आईची अशी तक्रार वडिलांकडे केली, यावरून दोघांमध्ये जोरदार वाद झाला. तेव्हापासून साधना आपल्या मुलाचा सतत छळ करत होत्या. घटनेच्या दोन दिवस आधी मुलावर 10 हजार रुपये चोरल्याचा आरोप करत बेदम मारहाण केली होती. तेव्हाच त्याने आईला मारण्याचा विचार केला होता.
आईच्या सवयीचा तिरस्कार करून घरातून पळून गेला
मुलाला आईच्या काही सवयींचा तिटकारा आल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. याबाबत त्याने वडिलांकडे अनेकदा तक्रार केली. असे असूनही आईच्या वागण्यात काही बदल झाला नाही. या कृत्याला कंटाळून तो वर्षभरापूर्वी घरातून पळून गेला होता. मात्र, हे प्रकरण काय होते, याबाबत पोलिसांनी काहीही सांगितले नाही. सध्या पोलिसांनी मुलाला आपल्या संरक्षणात घेऊन 10 वर्षांच्या मुलीला नवीन यांच्या भावाकडे सोपवले आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.