आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पावसाचे थैमान:प. बंगालमध्ये 200 गावे जलमय, रस्त्यांवर बोटी, मदतीला वेग; ऑगस्ट-सप्टेंबर महिन्यांमध्ये सरासरीहून जास्त पावसाचा अंदाज

कोलकाता / सोमा नंदी2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

पश्चिम बंगालच्या हुगळी, पश्चिम मिदनापूर व हावडा या तीन जिल्ह्यांत पावसाने थैमान घातले आहे. तीनही जिल्ह्यांतील सुमारे २०० गावांना पुराला तोंड द्यावे लागत आहे. तीन दिवसांत ३०० मिमीहून जास्त पावसाची नोंद झाली. आतापर्यंत विविध दुर्घटनांत १६ जणांचा मृत्यू झाला आहे. पाऊस, पुराचा फटका सुमारे ५ लाख लोकांना बसला आहे.

शुक्रवारपासून राज्यात मुसळधार पाऊस सुरू होता. त्यामुळे सिलाबती व बुढीगंगा नदीवरील धरणांना किमान दहा ठिकाणी तडे गेले. घाटल व खरड शहरांत रस्त्यावर पाणीच पाणी झाल्याने बोटी चालवाव्या लागत आहेत. शनिवारपासून या भागांतील वीजपुरवठा खंडित झाला आहे. त्यामुळे हवाई दलास पाचारण करण्यात आले असून आतापर्यंत ३१ जणांना एअरलिफ्ट करण्यात आले. त्यात १०० वर्षीय महिला व ९ महिन्यांच्या बाळाचाही समावेश आहे. हुगळीत बचाव कार्यात सैन्यात तैनात करण्यात आले आहे. सैन्याने अरंगबाग भागात २० जणांना सुरक्षित ठिकाणी हलवले. रूपनारायण व द्वारकेश्वर नद्या कोपल्याने घाटापर्यंत पाणी शिरले आहे. अधिकारी म्हणाले, दामोदर व्हॅली धरणातून सोमवारी सकाळपर्यंत सुमारे १.४६ लाख क्युसेक पाण्याचा विसर्ग करण्यात आल्याने खानकुल व घाटलमध्ये पूरस्थिती निर्माण झाली आहे. ७३ वर्षीय दिलीप म्हणाले, धरणातील विसर्गामुळे पुराने विक्राळ रूप धारण केले आहे. लोक घाबरून उंच इमारतींचे छत गाठू लागले आहेत. त्यांनाही सुरक्षित ठिकाणी जाण्याची प्रतीक्षा आहे. माझ्या आयुष्यात एवढे मोठे संकट पाहिले नव्हते. सरकारने मदतीच्या स्वरूपात १ हजार मेट्रिक टन तांदूळ, हजारो पाण्याची पाकिटे व स्वच्छ कपडे पाठवले आहेत. बंगालच्या उत्तर खाडीत कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे. त्यामुळे मुसळधार पाऊस पडू लागला आहे. ४८ तासांत मिदनापूर, दक्षिण २४ परगणा, पश्चिम मिदनापूर, उत्तर २४ परगण्यात अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे.

राजस्थानमध्ये चोवीस तासांत २४६ मिमी पाऊस
राजस्थानातील बारा जिल्ह्यांत सलग दुसऱ्या दिवशी मुसळधार पाऊस झाला. अनेक घरे वाहून गेली. अनेक गावांतील शेकडो लोकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले. सर्वाधिक फटका शाहाबाद व किशनगंजमध्ये बसला आहे. येथे पूरस्थिती दिसून आली. जिल्हाधिकारी राहुल मल्होत्रा म्हणाले, शाहाबादमध्ये मंगळवारी सकाळी सात वाजेपर्यंत २४६ मिमी पावसाची नोंद झाली. सकाळी ११ वाजेपर्यंत ६० मिमि पाऊस झाला. त्यामुळे सखल भागातील वसाहती जलमय झाल्या. ऑगस्ट-सप्टेंबरमध्ये सरासरीहून जास्त पाऊस होईल, असे हवामान विभागाचे म्हणणे आहे. विभागाने ५ दिवसांत उत्तर भारतात मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे.

घरातून पोलिस ठाण्याचा कारभार, ६३ कैद्यांची सुटका
घाटल पोलिस ठाण्यात पाणी साचले आहे. त्याशिवाय इतर कार्यालयेदेखील जलमय झाली. त्यामुळेच ठाण्याचा कारभार घरातून चालवावा लागतोय. ६३ कैद्यांची मिदनापूर केेंद्रीय सुधारगृहात रवानगी करण्यात आली. घाटलच्या कारागृहात पाणी साचले आहे. या भागातील ३ लाख लोकसंख्येला पुराचा फटका बसला.

बातम्या आणखी आहेत...