आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अमली पदार्थ:टॅल्कम पावडरच्या नावाने कंदहारहून आले 21 हजार कोटी रुपयांचे हेरॉइन, तालिबान सत्तेत आल्यानंतर जगातील सर्वात मोठी जप्ती

कच्छ/विजयवाडा/नवी दिल्ली2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अफगाणिस्तानात तालिबानी राजवट आल्यानंतर भारतात अमली पदार्थांचा नवा अड्डा करण्याचा कट उघडकीस आला आहे. महसूल गुप्तचर संचालनालयाने (डीआरआय) गुजरातच्या कच्छमधील मुंद्रा पोर्टवर ३ हजार किलो हेरॉइन जप्त केले. आंतरराष्ट्रीय बाजारात त्याची किंमत तब्बल २१ हजार कोटी रुपये असल्याचे सांगितले जाते. ही भारतात ड्रग्जची आजवरची सर्वात मोठी जप्ती आहे. तसेच अफगाणिस्तानवर तालिबानी ताब्यानंतर ही जगातीलही ड्रग्जची सर्वात मोठी जप्ती आहे. डीआरआयनुसार, २ कंटेनर्समधून ड्रग्ज जप्त केले. एकात २,००० किलो व दुसऱ्यात १,००० किलो हेरॉइन आहे. अफगाणिस्तानहून ही खेप इराणच्या अब्बास बंदरामार्गे गुजरातेत पाठवली होती. ती आंध्रच्या विजयवाडात पोहोचणार होती. गांधीनगरच्या सेंट्रल फोरेन्सिक सायन्स लॅबने हे ‘अत्युच्च दर्जाचे’ हेरॉइन असल्याचे सांगितले. याप्रकरणी दिल्लीतून काही अफगाणी नागरिकांना ताब्यात घेतले आहे.

संस्थांनी अहमदाबाद, दिल्ली, चेन्नई, गांधीनगर व मांडवीत झडती व चौकशी केली. ईडीही मनी लाँड्रिंगचा तपास करणार आहे. जप्त हेरॉइन विजयवाडाच्या मेसर्स आशी ट्रेडिंग कंपनीच्या पत्त्यावर जाणार होते. कंपनीचे मालक एम. सुधाकर व पत्नी दुर्गपूर्णाला डीआरआयने १७ सप्टेंबरला अटक केली. ही कन्साइनमेंट टॅल्कम स्टोनच्या नावाखाली मागवली होती. गतवर्षी तांदूळ निर्यातीसाठी कंपनीची नाेंदणी झाली होती. कंपनीनुसार, हे कंटेनर्स चेन्नईला जाणार होते. दोन्ही कंटेनर्सवर पाठवणाऱ्याचे नाव म्हणून कंदहारच्या हसन हुसेनी ट्रेडर्सचे नाव आहे. ती १३ सप्टेंबरला इराणच्या बंदरावरून लोड झाली. दरम्यान, मुंद्रा पोर्ट संचालित करणाऱ्या अदानी पोर्टच्या प्रवक्त्याने म्हटले की, पोर्टमध्ये कंटेनर्सची तपासणी फक्त सक्षम तपास संस्थाच करू शकतात.

६ जून २०२१ पासून १९ जुलैपर्यंत भारतात १२५ कोटींचे उच्च दर्जाचे १८ किलो हेरॉइन पकडले आहे. आता ३ हजार किलो हेरॉइन जप्ती ही अफगाणिस्तानात सत्ताबदलानंतर ड्रग्ज तस्करी प्रचंड वाढेल, या तज्ज्ञांच्या शंकेला बळ देत आहे. दै. भास्करशी चर्चेत जगातील प्रख्यात काउंटर नार्कोटिक्स तज्ज्ञ वेंडा फेलबाब ब्राऊन म्हणाल्या, अफगाणिस्तानात खुद्द तालिबानी अफू व हेरॉइनच्या तस्करीत गुंतलले आहेत. गृहयुद्धापासून वाचण्यासाठी व परकीय मदतीच्या अभावात तालिबान आता ड्रग्जचा धंदा अनेक पटींनी वाढवू शकते. १५ ऑगस्ट २०२१ ला संयुक्त राष्ट्र ड्रग्ज व गुन्हे कार्यालयाच्या काबूलस्थित कार्यालयाचे प्रमुख सीझर गुडेस यांनीही अशीच शंका व्यक्त केली होती. या हेरॉइन जप्तीमागील अन्वयार्थाचा उलगडा तज्ज्ञ करत आहेत.

जूनमध्येही आंध्र प्रदेशच्या याच कंपनीकडे आली होती २५ टनांची कन्साइनमेंट
माध्यमांतील वृत्तांनुसार, यंदा जून महिन्यात विजयवाडाच्या याच कंपनीच्या पत्त्यावर २५ टन ‘सेमी कट टॅल्कम पावडर ब्लॉक्स’ आले होते. ते दिल्लीच्या एका व्यावसायिकाला कथितरीत्या एका ट्रकद्वारे पाठवण्यात आले होते. तथापि, त्याचा ट्रक मुंद्रा पोर्टहून दिल्लीकडे जात असताना एकाही टोलनाक्यावरून गेला नव्हता. दिल्लीच्या ज्या व्यावसायिकाकडे तो पाेहोचला त्याचे नावही बनावट असल्याचे सांगितले जात आहे. सूत्रांनुसार, ही खेप कुठे पाठवण्यात आली व त्याचा काय वापर झाला, याची आता चौकशी केली जात आहे.

असा आहे अफगाणिस्तानहून ड्रग्ज पुरवठ्याचा मार्ग
- अफगाणिस्तानहून पाकिस्तानमार्गे मोझाम्बिकला जाते हेरॉइन
- अफगाणिस्तानातून भारतामार्गे हेरॉइन तस्करीचा जुनाच रस्ता, आता थेट ऑस्ट्रेलियापर्यंत पुरवठा करत आहेत तस्कर
- हेरॉइन द. भारताच्या किनारपट्टी भागांतून दिल्ली अन् नंतर तेथून नेपाळला पाठवले जाते.
- अफगाणिस्तानातून हेरॉइन भारताच्या मार्गे आता थेट ऑस्ट्रेलियापर्यंतही पाठवले जात असल्याचे संयुक्त राष्ट्राच्या तज्ज्ञांनीही मान्य केले आहे.
- अफगाणिस्तानचे हेरॉइन भारतात पारंपरिकरीत्या पंजाबाच्या मार्गाने येत राहिलेले आहे. मात्र येथे ५०० किलोचीच सर्वात मोठी खेप पकडण्यात आलेली आहे.
- सुरक्षा संस्थांना मुंद्रा पोर्टच्या मार्गाने मोठ्या प्रमाणात हेरॉइन तस्करीचा संशय होता. मात्र अशा प्रचंड प्रमाणातील जप्तीची कारवाई पहिल्यांदाच झाली आहे.
- अफगाणिस्तानात ८०% अफू दक्षिण व दक्षिणपूर्व सीमेकडील प्रांतात घेतली जाते. याच भागातून जगभरात तीन चतुर्थांश हेरॉइन पाठवले जाते. रशियात १००% आणि युरोपात ६५ ते ७०% हेरॉइन येथूनच जाते.

बातम्या आणखी आहेत...