आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नाशिक गॅस गळती:24 मृत्यूंसाठी जबाबदार कंपन्यांना 24 लाख दंड; 15 दिवसांत अहवाल, साडेतीन महिन्यांनी कारवाई

नाशिक4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

संपूर्ण देशाला हादरवून साेडणाऱ्या डॉ. झाकीर हुसेन रुग्णालयातील ऑक्सिजन गळती दुर्घटनेत २४ रुग्णांच्या मृत्यूला निष्काळजीपणा कारणीभूत असल्याचा ठपका पुण्याच्या ‘ताइवो निप्पॉन’ आणि नाशिक ‘जाधव ट्रेडर्स’ यांच्यावर ठेवण्यात आला आहे. याप्रकरणी ठेकेदार कंपनी ताइवोला २२ लाख, तर जाधव ट्रेडर्सला दोन लाखांचा दंड ठोठावला आहे. दुर्घटनेनंतर पंधरा दिवसांत शासनाला अहवाल दिल्यानंतर दाेषी काेण हे निश्चित करण्यासाठी साडेतीन महिने लागले.

२१ एप्रिल राेजी दुपारी १२ वाजून ५ मिनिटांनी टँकला गळती लागल्यामुळे हुसेन रुग्णालयातील आॅक्सिजन पुरवठा खंडित हाेऊन २४ रुग्णांचा मृत्यू झाला. याप्रकरणी विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांच्या अध्यक्षतेखाली सात सदस्यीय समितीने चौकशी करून १० मे रोजी नगरविकास विभागाकडे अहवाल पाठवला होता. त्यानंतर नगरविकास विभागाने विधी विभागाच्या सल्ल्याने संबंधित अहवाल कार्यवाहीसाठी मनपा आयुक्तांकडे पाठवला होता.

‘दिव्य मराठी’च्या प्रश्नांच्या अनुषंगाने सर्वंकष चाैकशी
आॅक्सिजन टाकी हा संवेदनशील विषय असून येथील तांत्रिक बिघाड दूर करण्यासाठी २४ तास ठेकेदार कंपनीचे तंत्रज्ञ का उपस्थित नव्हते? तसेच दुर्घटनेनंतर तब्बल तीन दिवसांनी कंपनीचे तज्ज्ञ पथक कसे फिरकले? टाकीसाठी वापरलेले साहित्य गुणवत्तापूर्ण हाेते का? ‘पेसाे’सारख्या तज्ज्ञ संस्थेची मान्यता हाेती का? या संस्थेचे प्रत्यक्ष पथक तपासणीसाठी आले की दूरध्वनीद्वारेच तपासणी झाली असे असंख्य मुद्दे ‘दिव्य मराठी’ने उपस्थित केले हाेते. याशिवाय सीसीटीव्ही फुटेज सर्वप्रथम प्रसिद्ध करून त्यात, टाकीत आॅक्सिजन भरण्यासाठी पाइप लावल्यानंतर काही सेकंदांतच ही दुर्घटना कशी घडली यावर प्रकाश टाकला हाेता. चाैकशी समितीने या सर्व मुद्द्यांची दखल घेतली आहे.

बातम्या आणखी आहेत...