आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • 4 Arrested For Smuggling Weapons From Pakistan To Telangana, Suspects Nabbed With Explosives And Weapons

संशयितांना अटक:पाकिस्तानातून आलेली शस्त्रे तेलंगणात नेणारे 4 अटकेत, संशयितांना स्फोटके आणि शस्त्रांसह गजाआड

करनाल10 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

हरियाणातील करनालमध्ये पोलिसांनी चार संशयितांना स्फोटके आणि शस्त्रांसह गजाआड केले. ते पाकिस्तानातून ड्रोनद्वारे आलेली शस्त्रे तेलंगणातील आदिलाबादला घेऊन जात होते. हे संशयित अतिरेकी बब्बर खालसाशी संबंधित असल्याची शंका आहे.

विशेष म्हणजे हे संशयित अतिरेकी नांदेड येथील कुख्यात गुंड व खंडणीबहाद्दर हरविंदर संधू ऊर्फ रिंदाचे सहकारी असल्याचे पोलिस तपासात सिद्ध झाले असून पोलिसांनी रिंदा आणि परमिंदरसिंग यांच्याविरोधातही गुन्हा नोंदवला आहे. दरम्यान, पोलिसांनी या संशयित अतिरेक्यांच्या ताब्यातून अडीच किलो आरडीएक्स, पिस्तूल, मॅगझिन, ३१ काडतुसे, १.३० लाख रुपये रोकड आणि ६ फोन जप्त केले. करनालचे पोलिस अधीक्षक गंगाराम पुनिया यांनी सांगितले की, आरोपींची ओळख पंजाबमधील फिरोजपूर निवासी गुरप्रितसिंग, त्याचा भाऊ अमनदीप, परमिंदरसिंग आणि लुधियानातील भूपिंदरसिंग अशा नावांनी पटली आहे. राजबीर गुरुदासपूर येथील रहिवासी आहे. तर रिंदा महाराष्ट्रातील नांदेडचा रहिवासी आहे.

पोलिसांच्या प्राथमिक तपासात स्पष्ट झाले की, लुधियाना कारागृहात असताना गुरप्रितची ओळख राजबीरसोबत झाली होती. येथेच शस्त्रे पाठवण्याचा गट रचला गेला. ही शस्त्रे पाकिस्तानातून रिंदा याने ड्रोनद्वारे आकाशदीपच्या ननिहाल येथील शेतात पोहोचती केली होती.

व्हाइस क्लिपवर रिंदा मागतो खंडणी : रिंदावर २०१६ पासून नांदेड जिल्ह्यात तसेच पंजाबमध्ये गुन्हे दाखल आहेत. रिंदा हा पंजाबचा असून त्याचे नांदेड येथे शिक्षण झाले आहे. नांदेड येथे रोशनसिंग माळी व रिंदा यांच्यात एकमेकांविरुद्ध खुनाचे गुन्हे दाखल झाले आहेत. त्याच्या नावाने किंवा त्याच्या व्हॉइस क्लिपने खंडणीचे गुन्हे दाखल आहेत. रिंदाचे नांदेडमधील १७ सहकारी कारागृहात असून एकाचा मृत्यू झाला आहे. तसेच काही आरोपी फरार तर काहींना जामीन मिळाला असल्याचे सूत्रांनी सांगितले.

नांदेडात रिंदाची खंडणी वसुली
रिंदाचा नांदेड जिल्ह्याशी संबंध असून नांदेडमध्ये त्याचे ५० साथीदार खंडणी वसुलीसह खुनाची सुपारी घेतात. त्यांच्यावरही विविध गंभीर स्वरूपातील गुन्हे दाखल आहेत. रिंदा हा व्हॉइस क्लिप पाठवून व्यापारी आणि प्रतिष्ठित व्यक्तींकडे खंडणीची मागणी करतो. ती पूर्ण न झाल्यास टोळीतील सदस्यांकरवी गोळीबारासह हत्याही करतो.

बातम्या आणखी आहेत...