आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराहरयाणाच्या करनाल जिल्ह्यात पोलिसांनी गुरुवारी सकाळी 4 खलिस्तानी अतिरेक्यांना अटक केली. गुरप्रीत, अमनदीप, परविंदर व भूपिंदर अशी त्यांची नावे आहेत. हे सर्वजण पंजाबचे असून, ते एका इनोव्हा कारमधून जाताना त्यांच्या मुसक्या आवळण्यात आल्या. हे अतिरेकी तेलंगणातील आदिलाबादेत शस्त्र पुरवठा करण्याच्या तयारीत होते. त्यांनी यापूर्वी नांदेड भागातही शस्त्रास्त्रांची खेप पाठवल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. त्यामुळे काळजी वाढली आहे.
गुप्तहेर विभागाला मिळाली होती खबर
4 खलिस्तानी अतिरेकी गुरुवारी राष्ट्रीय महामार्गावरुन जात असल्याची खबर गुप्तहेर विभागाला मिळाली होती. त्यानंतर पोलिस व सुरक्षा यंत्रणांनी बांसताडा टोल प्लाझाजवळ सापळा रचून इनोव्हा गाडीला तपासणी करण्यासाठी रोखले. त्यात त्यांच्या हाती मोठ्या प्रमाणात दारुगोळा लागला. पोलिसांच्या माहितीनुसार, या अतिरेक्यांकडून एक देशी पिस्तूल, 31 काडतूस, 1.30 लाख रुपयांची रोकड, 3 लोखंडी बॉक्स (प्रत्येकी अडीच किलो वजनाचे) जप्त करण्यात आलेत. पोलिसांनी या बॉक्सची तपासणी केली असता त्यात स्फोटके असल्याचे स्पष्ट झाले.करनालचे पोलीस अधीक्षक गंगाराम पुनिया यांनी याची पुष्टी केली. सूत्रांच्या माहितीनुसार, अटक करण्यात आलेल्या अतिरेक्यांची मधूबन पोलिस ठाण्यात कसून चौकशी केली जात आहे.
पाकशी असणारे धागेदोरे स्पष्ट
एसपी गंगाराम पुनिया यांनी सांगितले की, चारही आरोपी पाकिस्तानी अतिरेकी हरविंदर सिंग रिंदा याच्या इशाऱ्यानुसार काम करत होते. रिंदानेच त्यांना शस्त्र पुरवठा केला. त्यानंतर ते हे शस्त्र व दारुगोळा तेलंगणाच्या आदिलाबाद जिल्ह्यात पोहोचवणार होते. या मोबदल्यात त्यांना पैसे देण्यात येणार होते.
उल्लेखनीय बाब म्हणजे या अतिरेक्यांनी यापूर्वीही नांदेड परिसरात खेप पोहोचवलेल्याचे स्पष्ट झाले आहे. रिंदा त्यांना ड्रोनद्वारे शस्त्र पुरवठा करत होता. तसेच मोबाईल अॅपद्वारे लोकेशन पाठवत होता. त्यानंतर हे आरोपी त्या लोकेशनवर शस्त्र पुरवठा करत होते.
रिंदा यांनी मोबाईलद्वारे अटकेतील तरुणांना लोकेशन पाठवले होते. त्यानुसार त्यांना फिरोजपूरला बोलावण्यात आले होते. फिरोजपूरमध्ये भारत-पाक सीमेलगत आरोपी गुरप्रीतचा मित्र आकाशदीप याची शेती आहे. याच शेतात ड्रोनद्वारे स्फोटकांचा पुरवठा करण्यात आला होता. हे चौघे तेथून स्फोटके घेऊन तेलंगणात पोहोचवणार होते. पण, तत्पूर्वी, पोलिसांनी त्यांच्या मुसक्या आवळल्या.
राजवीर होता रिंदाच्या संपर्कात
एसपी गंगाराम पुनिया यांनी सांगितले की, आरोपी गुरप्रीतने यापूर्वी तुरुंगाची हवा खाल्ली आहे. तुरुंगात त्याची राजवीर नामक व्यक्तीशी ओळख झाली. राजवीरने पाकिस्तानी अतिरेकी हरविंदर सिग रिंदाशी जूनी ओळख आहे. राजवीरनेच गुरप्रीतची रिंदाशी ओळख करवून दिली होती. ते जवळपास 9 महिन्यांपासून एकमेकांच्या संपर्कात होते.
चारही अतिरेक्यांची सध्या मधूबन पोलिस ठाण्यात चौकशी केली जात आहे. यासाठी या ठाण्यात येणाऱ्या तक्रारदारांना तात्पुरत्या स्वरुपात रोखले जात आहे. यामुळे त्यांची काहीशी गैरसोय होत आहे.
पोलिसांनी इनोव्हा कार पोलिस ठाण्यासमोरील मोकळ्या मैदानात उभी केली आहे. तिच्या आसपास दूरवर एकही वस्तू नाही. पोलिस पथक बारकाईने या कारची तपासणी केली जात आहे. याकामी बॉम्बनाशक पथकाचीही चौकशी केली जात आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.