आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आसाम-मेघालय बॉर्डरवर 6 जण ठार:VIDEO व्हायरल झाल्यानंतर उसळला हिंसाचार, 7 जिल्ह्यांतील मोबाइल इंटरनेट सेवा बंद

गुवाहाटी15 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

लाकडाची तस्करी रोखण्याच्या मुद्यावरून मंगळवारी भयंकर हिंसाचार झाला. त्यात एका वन रक्षकासह 6 जणांचा मृत्यू झाला. अधिकाऱ्यांनी सांगितले की, या दोन्ही राज्यांच्या सीमेवर पोलिसांनी लाकडांची अवैध तस्करी करणाऱ्या एका ट्रकला थांबवले होते. त्यानंतर हा हिंसाचार झाला. खबरदारी म्हणून या भागातील 7 जिल्ह्यांतील इंटरनेट सेवा बंद करण्यात आली आहे.

वन रक्षकांनी तिघांना पकडले

पश्चिम कार्बी आंगलोंगचे पोलिस अधीक्षक इमदाद अली यांनी या घटनेची माहिती दिली. त्यांनी सांगितले की, आसाम वन विभागाने मेघालयच्या सीमेवरील पश्चिम जयंतिया हिल्सच्या मुकरोह येथे लाकडांची तस्करी करणाऱ्या तस्करांचा एक ट्रक थांबवला होता. त्यानंतर ट्रक चालकाने पळून जाण्याचा प्रयत्न केला. त्याला थांबवण्यासाठी वन रक्षकांनी गोळीबार केला. त्यात ट्रकचे टायर पंक्चर झाले. त्यानंतर ट्रक चालकासह 3 जणांच्या मुसक्या आवळल्या. इतर संशयित पळून जाण्यात यशस्वी झाले.

शस्त्रांसह पोहोचला जमाव

अधिकाऱ्यांनी सांगितले की, या घटनेची माहिती लगतच्या पोलिस ठाण्यात देण्यात आली. तसेच अतिरिक्त कुमकही मागवण्यात आली. सकाळी 5 च्या सुमारास ही कुमक पोहोचताच स्थानिक नागरिक हातात शस्त्र घेऊन तिथे धडकले. त्यांनी तस्करांना सोडण्याची मागणी करत वन रक्षक व पोलिसांना घेराव घातला. त्यानंतर पोलिसांनी स्वतःच्या संरक्षणासाठी गोळीबार करावा लागला.

वन रक्षकासह 6 जणांचा मृत्यू

या गोळीबारात वन रक्षकाचा मृत्यू झाला. तसेच मेघालयच्या 5 नागरिकांचाही बळी गेला. हिंसाचारात जखमी झालेल्या लोकांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. वन रक्षकाच्या मृत्यूचे कारण अद्याप समजले नाही. या घटनेचा तपास सुरू आहे.

व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर उसळला हिंसाचार

या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर मेघालयच्या 7 जिल्ह्यांत हिंसाचार उसळला आहे. त्यानंतर मुख्यमंत्री कॉनराड संगमा यांच्या आदेशांनुसार या 7 जिल्ह्यांत पुढील 48 तासांसाठी मोबाइल इंटरनेट सेवा बंद करण्यात आली आहे. यात पश्चिम जयंतिया हिल्स, पूर्व जयंतिया हिल्स, पूर्व खासी हिल्स, री-भोई, पूर्व पश्चिम खासी हिल्स, पश्चिम खासी हिल्स व दक्षिण-पश्चिम खासी हिल्सचा समावेश आहे.

मेघालयच्या मुख्यमंत्र्यांनी या घनटेवर शोकही व्यक्त केला आहे. ते म्हणाले - जे काही घडले ते अत्यंत दुखद आहे. या प्रकरणी पोलिसांनी एफआयआर दाखल केला आहे. घटनेचा तपास केला जाईल. त्यानंतर दोषींवर कठोर कारवाई केली जाईल. संगमा यांनी पीडित कुटुंबीयांप्रती संवेदना व्यक्त करत जखमींवर सर्वश्रेष्ठ उपचार करण्याचेही निर्देश दिलेत.

यंदाच सुटला होता आसाम-मेघालय सीमावाद

आसाम-मेघालय सीमावाद 50 वर्षांहून जुना आहे. चालू वर्षाच्या सुरुवातीलाच दोन्ही राज्यांचे मुख्यमंत्री हिमंत बिस्वा सरमा व कॉनराड कोंगकल संगमा यांनी दिल्लीत एका करारावर स्वाक्षरी केली होती. त्यानुसार 12 सर्वात वादग्रस्त क्षेत्रांपैकी 6 क्षेत्रांची सीमा निर्धारित करण्यात आली होती. सामंजस्य करारावर स्वाक्षरी होताना केंद्रीय गृहमंत्री अमित शहाही उपस्थित होते.

MoUवर स्वाक्षरी केल्यानंतर आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिस्वा सरमा म्हणाले होते की, हा आमच्यासाठी ऐतिहासिक दिवस आहे. या करारानंतर उर्वरित वादग्रस्त ठिकाणांवरील समस्येवर तोडगा शोधणे आपले उद्दीष्ट आहे. आम्ही ईशान्य भारताला विकासाचे इंजिन करण्याच्या दिशेने काम करू.

31 जानेवारी रोजी पाठवला होता प्रस्ताव

आसाम व मेघालयच्या मुख्यमंत्र्यांनी गृह मंत्रालयाकडे एक प्रस्ताव पाठवला होता. त्यात दोन्ही राज्य 884 किमीच्या सीमेवरील 12 पैकी 6 वादग्रस्त ठिकाणचा वाद निकाली काढण्याची तयारी दर्शवली होती. 36.79 चौरस किमी जमिनीसाठी पाठवण्यात आलेल्या शिफारशीनुसार आसाम आपल्याकडे 18.51 चौरस किमी भाग ठेवेल व उर्वरित 18.28 चौरस किमीचा भाग मेघालयला देईल.

1972 साली आसाममधून मेघालय विभक्त झाला होता. तेव्हापासून या दोन्ही राज्यांत सीमावाद सुरू आहे. या करारामुळे हा वाद काहीसा शांत झाला होता. पण ताज्या घटनेमुळे तो पुन्हा उफाळून आला आहे.

सीमावादामुळे अनेक हिंसक घटना

14 मे रोजी आसामच्या कामरूपच्या सीमेलगत पश्चिम खासी हिल्सच्या लँगपीहमध्य आसाम पोलिसांच्या गोळीबारात खासी समुदायाचे 4 नागरिक ठार झाले होते. तर 12 जण जखमी झाले होते.

बातम्या आणखी आहेत...