आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नियंत्रण रेषेवर तणाव:सीमेवर चीनचे 60 हजार सैनिक तैनात; भारताचीही जय्यत तयारी, पँगाँग भागात चीन पूल उभारतोय

नवी दिल्लीएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • पँगाँग भागात चीन पूल उभारतोय, बांधकाम चीनच्या हद्दीत : भारत

पूर्व लडाखमध्ये सुमारे २० महिन्यांपासून तणातणी सुरू असतानाच चीनने प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर (एलएसी) भारतीय भूभागासमोर ६० हजार सैनिक तैनात केले आहेत. लष्करी वाहतुकीसाठी चीन पायाभूत सुविधा उभारत आहे. यापूर्वी उन्हाळ्यात मोठ्या संख्येने चिनी सैनिकांना प्रशिक्षणासाठी एलएसीवर तैनात करण्यात आले होते. त्यापैकी बरेच जण परतले आहेत, पण ६० हजार चिनी सैनिक एलएसीवर आहेत. चीन दौलत बेग ओल्डी भागासमोर रस्ता तयार करत आहे, असे वृत्त आहे. पँगाँग सरोवर भागात चीन एक पूल उभारत असल्याचे सॅटेलाइट इमेजवरून स्पष्ट झाले आहे. भारतीय सूत्रांच्या मते हे बांधकाम चीनच्या भागात होत आहे. चीनच्या हालचाली पाहून भारताने कुठल्याही संभाव्य हल्ल्याला प्रत्युत्तर देण्यासाठी भक्कम पावले उचलली आहेत, असे सूत्रांनी सांगितले. भारताने राष्ट्रीय रायफल्सची दहशतवादविरोधी तुकडी लडाख थिएटरमध्ये तैनात केली आहे. एलएसीपर्यंत सैनिक आणि वाहनांची वाहतूक सुरळीत व्हावी यासाठी भारतही पायाभूत सुविधा उभारत आहे.

सैनिकांना सहज पोहोचता यावे अशी चीनची इच्छा
चीन पँगाँग सरोवर क्षेत्रातील आपल्या भागात पूल उभारत आहे. त्याद्वारे एलएसीवर सैनिक आणि लष्करी संसाधनांची वाहतूक सोपी व्हावी, अशी चीनची इच्छा आहे. हा भाग गेल्या वर्षीच्या संघर्षाचे मुख्य केंद्र होते. पुलामुळे चिनी सैनिक आणि रसद पुरवठ्याचे मार्ग खुले होतील. त्यामुळे चीन या भागांत कमी वेळात वेगाने जास्त सैनिकांना पोहोचवू शकतो.

बातम्या आणखी आहेत...