आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:722 पोलिस कर्मचाऱ्यांनी सहा जिल्ह्यांतील ओसाड गावांचे केले पुनर्वसन

डेहराडून6 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

उत्तराखंड सरकारने नेपाळ व चीनच्या सीमेवरील गावांतून शहराकडे होणारे पलायन रोखण्यासाठी २०१७ मध्ये आपल्या बदली धोरणात जे बदल केले आहेत त्याचा चांगला परिणाम समोर येत आहे. या बदलांतर्गत सीमावर्तीa ६ जिल्ह्यांत हेड कॉन्स्टेबल स्तरापर्यंतच्या स्थानिक पोलिसांची गावाजवळच नियुक्ती केली होती. त्यानंतर चंपावत, बागेश्वर, रुद्रप्रयाग, चमोली, पिथौरागड आणि उत्तरकाशी जिल्ह्यात ७२२ पोलिस कर्मचारी पोस्टिंग घेऊन आपल्या गावांतच कुटुंबासह राहू लागले. त्यामुळे पलायनामुळे रिकामी झालेली गावे पुन्हा गजबजू लागली आहेत. पोलिसांनी गावात आपल्या वडिलोपार्जित घरांची दुरुस्तीही केली. काहींनी नवी घरे बांधली ही आनंदवार्ता आहे. कारण उत्तराखंडमध्ये पलायन विक्रमी स्तरावर आहे. पलायन प्रतिबंधक आयोगानुसार गेल्या दशकात ३२ लाख लोकांनी पलायन केले आहे.

तीन हजार गावे पूर्ण ओसाड झाली आहेत. अनेक गावांत १०० पेक्षाही कमी लोक उरले आहेत. तथापि, आपल्या गावांत नोकरी मिळवणाऱ्या पोलिसांनी शेती करण्यासह सुरुवात केली आहे. चंपावत जिल्ह्यात हेड कॉन्स्टेबलच्या पदावर तैनात सुनील जोशी आधी मैदानी भागात कुटुंबासह राहत होते. बदली धोरण आल्यानंतर गावात येऊन त्यांनी घराची दुरुस्ती केली आणि मुलांना जवळच्याच शाळेत प्रवेश घेतला. फावल्या वेळात त्यांनी शेती करण्यास सुरुवात केली. त्यामुळे त्यांचे उत्पन्न वाढले.डीजीपी अशोककुमार यांनी सांगितले की, आधी प्रशासकीय आधारावर बदल्या होत असल्याने बाहेरच्या लोकांची येथे येण्याची इच्छाच नव्हती. आता स्थानिक लोकच येथे राहतात. रोज घरी जाता यावे यासाठी पोलिसांना त्यांच्या गावाजवळील तहसीलमध्येच तैनात केले आहे. कुटुंबासोबत राहिल्याने त्यांचा तणावही कमी होईल, अशी अपेक्षा आहे.

पलायनामुळे उत्तराखंडमधील २ लाख ८० हजार घरांना लागले टाळे
अल्मोडा 36,401
पौडी 35,654
टिहरी 33,689
पिथौरागड 22,936
डेहराडून 20,625
चमोली 18,535
नैनिताल 15,075
उत्तरकाशी 11,773
चंपावत 11,281
रुद्रप्रयाग 10,970

बातम्या आणखी आहेत...