आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नवी दिल्ली:संधी मिळाल्यास इंग्रजीऐवजी मातृभाषेत इंजिनिअरिंगची 74 टक्के मुलांची इच्छा, मुलींची संख्या फक्त 26 टक्के

नवी दिल्लीएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • 90% तामिळ भाषिक मुलांना हवे मातृभाषेतून इंजिनिअरिंगचे शिक्षण

देशातील ७४% मुलांनी संधी मिळाल्यास मातृभाषेत इंजिनिअरिंग करण्याची इच्छा व्यक्त केली आहे, पण अशी इच्छा असणाऱ्या मुलींची संख्या फक्त २६% आहे.

एआयसीटीईच्या (अखिल भारतीय तांत्रिक शिक्षण परिषद) एका सर्वेक्षणात हे तथ्य समोर आले आहे. नव्या शैक्षणिक धोरणात (२०२०) इंजिनिअरिंग आणि मेडिकलसह संपूर्ण शिक्षण प्रादेशिक आणि मातृभाषेत देण्यावर भर देण्यात आला आहे. त्या पृष्ठभूमीवर एआयसीटीईने प्रा. प्रेम व्रत यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन केली आहे. बीई/बीटेकचे शिक्षण मातृभाषेत देण्याची शक्यता पडताळून पाहण्याची जबाबदारी या समितीवर सोपवण्यात आली आहे. या समितीने देशातील २२ भाषांतील ८३,१९५ विद्यार्थी-विद्यार्थिनींत एक सर्व्हे केला.

त्यात १० वी, १२ वीसह इंजिनिअरिंगच्या चारही वर्षांच्या मुलांची मते घेण्यात आली. त्यातील निष्कर्षांनुसार १० वीतील ७२ % तर १२ वीतील ७४ % मुलांची मातृभाषेत तांत्रिक शिक्षण घेण्याची इच्छा आहे. हेच प्रमाण १० वीच्या मुलींमध्ये २८% तर १२ वीच्या मुलींमध्ये २६% आहे. एकूण ४४% (३६,४३२) मुलांनी मातृभाषेत इंजिनिअरिंग करण्याची इच्छा दर्शवली आहे. त्यात सर्वात जास्त संख्या (९०%) तामिळभाषिक मुलांची आहे. हिंदीच्या ६०%, तेलगूच्या ३०%, मराठीच्या २७% आणि कन्नड व गुजरातीच्या १०-१०% मुलांनी मातृभाषेत बीई/बीटेक करण्याची इच्छा दर्शवली. मल्याळम, बंगाली आणि उडिया भाषक ५% पेक्षा कमी मुलांची तशी इच्छा आहे. याबाबत एआयसीटीईचे अध्यक्ष प्रा. अनिल सहस्रबुद्धे म्हणाले की, मातृभाषेत उच्च शिक्षण देण्यासाठी चांगल्या गुणवत्तेची पुस्तके आणि शिक्षक उपलब्ध असणे महत्त्वाचे आहे. एआयसीटीईने मोठ्या संख्येत स्थानिक भाषांत पुस्तक लेखन व अनुवाद सुरू केला आहे.

देशात सध्या उच्च शिक्षण घेणाऱ्यांची संख्या फक्त २७ टक्के
सहस्रबुद्धेंच्या मते, सध्या उच्च शिक्षण घेणाऱ्यांची संख्या फक्त २७% आहे. त्याचे कारण म्हणजे उच्च शिक्षण संस्थांमधील इंग्रजीतील शिक्षण कळणार नाही अशी भीती मातृभाषेत १० वी-१२ वी शिकणाऱ्या मुलांमध्ये असते. ही संख्या ५०% पर्यंत न्यायची असेल तर मातृभाषेत शिक्षण हा पर्याय द्यावा लागेल.

बातम्या आणखी आहेत...