आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
प्रवासी भारतीय दिवस दरवर्षी भारतामध्ये 9 जानेवारी रोजी साजरा केला जातो. 9 जानेवारी 1915 रोजी महात्मा गांधी दक्षिण आफ्रिकेहून मुंबईमध्ये परतले होते. यानिमित्ताने 2003 सालापासून दरवर्षी अनिवासी भारतीय नागरिकांच्या भारताच्या प्रगतीमधील योगदानासाठी प्रवासी भारतीय दिवस साजरा केला जात आहे.
88 वर्षानंतर 2003 साली पहिल्यांदा प्रवासी भारतीय दिवस भारतात साजरा केला गेला. याचे आयोजन भारत सरकारचे अनिवासी भारतीय कार्य मंत्रालय व उत्तर पूर्वी क्षेत्र विकास मंत्रालय, फेडरेशन ऑफ इंडियन चेंबर ऑफ कॉमर्स ॲंड इंडस्ट्रीज आणि कॉन्फेडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्री यांच्या मार्फत केले जाते. 2015 पासून त्याचे स्वरूप बदलले गेले आहे. त्यानंतर PBD ची थीम निश्चित केली जाते. डिसेंबरपासून निश्चित केलेल्या थीमवर कॉन्फरन्ससह बरेच कार्यक्रम आयोजित केले जातात. यावर्षी प्रवासी भारतीय दिवसाची थीम ही स्वावलंबी भारत घडवण्यात योगदान ही आहे.
परराष्ट्र मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार 210 देशांमध्ये 1.34 कोटी एनआरआय आहेत. तथापि, संयुक्त राष्ट्रांच्या म्हणण्यानुसार, 1.75 कोटी भारतीय इतर देशांमध्ये राहतात. इतर कोणत्याही देशाच्या तुलनेत ही संख्या मोठी आहे. दुस-या देशांमध्ये राहण्याच्या बाबतीत भारतीय अव्वल स्थानावर आहे, असेही म्हणता येईल. विशेष म्हणजे अमेरिकेच्या तुलनेत UAE सारख्या मुस्लिम देशांना भारतीयांची पहिली पसंती आहे.
अनिवासी भारतीयांची व्याख्याः भारतीय नागरिक जे 183 दिवसांपेक्षा जास्त काळ इतर देशात राहतात. दुस-या शब्दांत जे लोक भारतात 182 दिवसांपेक्षा कमी दिवस राहतात.
भारतीय केवळ अनेक देशांत प्रवासी म्हणून राहतच नाहीत, तर तेथील नागरिकही आहेत. अशा लोकांना पीपल ऑफ इंडियन ओरिजिन (PIO) म्हणतात. हे लोक भारतीय वंशाचे परदेशी नागरिक असतात, जे एकेकाळी भारतीय नागरिक होते किंवा त्यांचे आईवडील, आजी आजोबा, पती किंवा पत्नीपैकी एक भारतीय नागरिक आहे किंवा होते. जगात 1.87 कोटी पीआयओ आहेत. असे बरेच लोक अमेरिकेत आहेत. भारतीय वंशाचे जवळपास 31.80 लाख भारतीय वंशाचे अमेरिकन नागरिक आहेत. जगात असे फक्त 30 देश आहेत जिथे भारतीय वंशाचे नागरिक नाहीत.
परदेशात राहणारे एनआरआय असो किंवा भारतीय वंशाचे परदेशी नागरिक (पीआयओ), एकूण 3 कोटी 21 लाख भारतीय जगभर पसरले आहेत. भारताबाहेर राहून अनेकांनी आपल्या देशाचे नाव जगभरात उज्ज्वल केले आहे
चला तर प्रवासी भारतीय दिवसानिमित्त, जगभरात पसरलेल्या भारतीयांशी संबंधित रोचक आकडेवारी आणि तथ्य जाणून घेऊयात. त्याचबरोबर अशा NRI विषयी देखील जाणून घेऊयात, ज्यांनी जगभरात आपल्या देशाचे नाव उज्ज्वल केले आहे.
- 1.34 कोटी एनआरआय म्हणजे परदेशात राहणारे भारतीय नागरिक आहेत. तर 1.87 कोटी PIO म्हणजेच भारतीय वंशाचे परदेशी नागरिक आहेत.
- यूएईमध्ये सर्वाधिक म्हणजे 34.20 लाख एनआरआर राहतात, जे भारतीय नागरिक आहेत.
- USA मध्ये सर्वाधिक म्हणजे 31.80 लाख भारतीय वंशाचे PIO आहेत. जे आता तेथील नागरिक आहेत.
- पाकिस्तान, सैन मारिनो, किरीबाती आणि तुवालू येथे एकही भारतीय नागरित नाही. म्हणजेच या देशात एकही NRI नाही.
- 5 टक्के पूर्व भारतीय
- 18 टक्के पश्चिम भारतीय
- 23 टक्के उत्तर भारतीय
- 54 टक्के दक्षिण भारतीय
- अमेरिका वगळता 80 टक्के एनआरआय हे temporary work visa वर आहेत.
- अमेरिकेत 50 टक्के भारतीयांकडे ग्रीनकार्ड किंवा सिटिजनशिप आहे.
- 26 टक्के भारतीय H1B वर्क व्हीजावर आणि इतर डिपेंडंट किंवा विद्यार्थी आहेत.
कुणीही पाकिस्तानी भारतीय वंशाचा नाही
- 1947 पुर्वीपर्यंत संपूर्ण पाकिस्तान भारताचा भाग होता. मात्र कायद्यात पाकिस्तानी नागरिकाला भारतीय वंशाच्या नागरिकाच्या व्याख्येत सामील करण्यात आलेले नाही.
- पाकिस्तान आणि सैन मारिनो हे दोन असे देश आहेत, जिथे कोणताही नागरिक हा भारतीय वंशाचा नाही.
- रशियात केवळ 21,354 NRI आहे.
- फक्त 2236 भारतीय वंशाचे रशियन नागरिक आहेत.
- किम जोंगच्या उत्तर कोरियात भारतीय वंशाचा फक्त एक नागरिक म्हणजे PIO राहतो.
- उत्तर कोरियात केवळ 15 एनआरआय आहेत. दक्षिण कोरियात 13 हजारांहून अधिक NRI वास्तव्याला आहेत.
- महात्मा गांधींची पहिली कर्मभूमी राहिलेल्या दक्षिण आफ्रिकेत 15 लाख नागरिक हे भारतीय वंशाचे आहेत.
- या देशाची एकुण लोकसंख्या ही 5.78 कोटी असून येथे 60 हजारांहून अधिक NRI राहतात.
जगात भारताचे नाव उज्वल करणारे अनिवासी भारतीय --
1. अक्षय रूपारेलिया
भारतीय वंशाचा अक्षय रूपारेलिया 2017 मध्ये ब्रिटनचा सर्वात तरुण कोट्यधीश झाला. 19 वर्षीय अक्षयची ऑनलाइन कंपनी Doorstep.co.uk ने केवळ 16 महिन्यांत ब्रिटनमधील 18 मोठ्या कंपन्यांमध्ये प्रवेश केला.
2. रोहिंटन मिस्त्री
मुंबईत जन्मलेले रोहिंटन मिस्त्री हे कॅनडाचे प्रसिद्ध लेखक आहेत. रोहिंटन यांनी Tales from Firozsha Baag आणि Such a Long Journey अशी अनेक लोकप्रिय पुस्तके लिहिले आहेत. त्यांनी मुंबईतील झेविअर कॉलेज येथून पदवी पूर्ण केली. त्यांना त्याच्या पुस्तकांसाठी गव्हर्नर जर्नल आणि गिलर या पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे.
3. हरगोविंद खुराना
भारतीय-अमेरिकन हरगोविंद खुराना यांना नोबेल पुरस्काराने सन्मानिक करण्यात आले आहे. 1968 मध्ये त्यांना फिजिओलॉजी अँड मेडिसीनसाठी हा पुरस्कार देण्यात आला. पंजाबमध्ये जन्मलेले खुराना यांनी लिव्हरपूल विद्यापीठात प्राध्यापक ए. रॉबर्टसनच्या मार्गदर्शनात संशोधन करून डॉक्टरेटची पदवी घेतली होती.
4. प्रणव मिस्त्री
मुळ गुजराती असलेले 33 वर्षीय प्रणव मिस्त्री सॅमसंगमध्ये रिसर्च विंगचे अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत. ते सॅमसंग थिंक टँक टीमचे प्रमुख देखील आहेत. 2013मध्ये वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमने त्यांना यंग ग्लोबल लीडर म्हणून गौरविले होते.
5. इंदिरा नुई
सध्या इंदिरा नुई या पेप्सीकोच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आणि अध्यक्ष आहेत. चेन्नईत जन्मलेल्या नुई यांचा जगातील 100 सर्वात सामर्थ्यवान महिलांच्या यादीत समावेश आहे. 2000 मध्ये पेप्सीकोचा सीएफओ झाल्यानंतर कंपनीच्या वार्षिक महसुलात 72% वाढ झाली होती.
6. सुंदर पिचाई़
सुंदर पिचाई यांचा जन्म तमिळनाडूच्या मदुरै येथे झाला. ते सध्या गुगलचे सीईओ आहेत. ऑक्टोबर 2015 पासून ते या पदावर आहेत. आयआयटी खडगपूर येथून पदवी मिळवल्यानंतर पिचाई यांनी स्टॅनफोर्ड विद्यापीठातही शिक्षण घेतले आहे.
7. सत्या नडेला
सत्या नडेला मायक्रोसॉफ्ट कंपनीचे सीईओ आहेत. 19 ऑगस्ट 1967 रोजी हैदराबादमध्ये जन्मलेल्या सत्या यांना 2014 मध्ये स्टीव्ह बलेमर यांच्या जागी मायक्रोसॉफ्टचे मुख्य कार्यकारी अधिकारी नियुक्त केले गेले होते. मायक्रोसॉफ्टला क्लाऊड इन्फ्रास्ट्रक्चर आणि सेवांकडे नेण्यात त्यांचा मोलाचा वाटा आहे.
8. कल्पना चावला
हरियाणाच्या कर्नाल येथे जन्मलेल्या कल्पना चावला या अंतराळात जाणा-या दुस-या भारतीय महिला होत्या. नोव्हेंबर 1997 मध्ये त्यांनी आपल्या पहिल्या अंतराळ प्रवासात सुमारे 372 तास अंतराळात घालवले होते. दुसर्या अंतराळ प्रवासाहून परतताना त्यांच्या स्पेस शटलला 3 फेब्रुवारी 2003 रोजी कोलंबियात अपघात झाला होता. आणि त्यातच इतर सहा साथीदारांसह त्यांचा मृत्यू झाला होता.
9. नरिंदर सिंग कपानी
फायबर ऑप्टिक्सचे जनक प्रोफेसर नरिंदर सिंग कपानी हे भारतीय वंशाचे अमेरिकन भौतिकशास्त्रज्ञ होते. पंजाबच्या मोगा येथे जन्मलेल्या प्रा. नरिंदर यांनी 1956 मध्ये फायबर ऑप्टिक्सचा शोध लावून जगात क्रांती घडवली. 1998 मध्ये त्यांना प्रवासी भारतीय पुरस्कार देण्यात आला. डिसेंबर 2020 मध्ये कॅलिफोर्नियामध्ये त्यांचे निधन झाले.
10. सलमान रुश्दी
भारतीय वंशाचे ब्रिटीश लेखक सलमान रश्दी यांचा जन्म मुंबईत झाला. Satanic verses आणि Midnight’s Children सारखी पुस्तके लिहिून चर्चेत आलेल्या रुश्दी यांना बुकर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.