देशात कोरोनाबाधित नवे 90 रुग्ण, आतापर्यंत 568; यातील 40 पूर्णपणे बरे झाले, 1.88 लाख लोकांवर नजर

  • आव्हान... देशात 10 रुग्णांत अद्याप संसर्गाचा स्रोतच माहीत पडलेला नाही

दिव्य मराठी नेटवर्क

Mar 25,2020 07:31:00 AM IST

नवी दिल्ली - देशात मंगळवारी कोरोनाबाधित ९० रुग्ण आढळले. आतापर्यंत ५६८ रुग्ण झाले असून यातील ४० पूर्णपणे बरे झाले. ९ जणांचा मृत्यू झाला. केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांच्यानुसार, देशात १,८७,९०४ लोक निगराणीखाली असून ३५,०२८ जणांना २८ दिवसांचा क्वाॅरंटाइन पूर्ण केला आहे. परदेशातून परतलेल्या अनेकांनी १४ दिवसांच्या विलगीकरणाची सूचना पाळली नाही. ते लोकांत मिसळत राहिले.


आयसीएमआरनुसार, ही लक्षणे आढळलेल्यांनी क्वाॅरंटाइन पाळले तर रुग्णांची संख्या ६२ टक्के कमी होऊ शकेल. ही संख्या ८९% पर्यंत कमी होऊ शकते. सध्या ३२ राज्ये, केंद्रशासित प्रदेशांत लॉकडाऊन आहे. इतर ३ राज्यांतील ५८ जिल्ह्यांत लॉकडाऊन आहे. पंजाब, महाराष्ट्र, पुद्दुचेरी व चंदिगडनंतर हिमाचल व मप्रमध्ये २ जिल्ह्यांत संचारबंदी लागू आहे. संसर्ग रोखण्यासाठी रुग्णालये, प्रयोगशाळा व आयसोलेशन वॉर्डसाठी राज्यांनी निधी जारी करावा, असे केंद्रीय गृह राज्यमंत्री किशन रेड्डी यांनी म्हटले.


आव्हान... देशात 10 रुग्णांत अद्याप संसर्गाचा स्रोतच माहीत पडलेला नाही

आरोग्य मंत्रालयाच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, १० रुग्णांत अद्याप कोरोना व्हायरसचा स्रोतच कळलेला नाही. काही रुग्णांची चौकशी झालेली नाही. काही रुग्ण बोलण्याच्या स्थितीतही नाहीत. दिल्ली, पंजाब, महाराष्ट्र, उत्तर प्रदेशासह अनेक राज्यांत आजाराचा स्रोत माहीत करण्यासाठी आरोग्य मंत्रालयाची पथके झटत आहेत. रुग्णांच्या संपर्कात आलेल्या लोकांची ओळख पटवण्यासाठी प्रत्येक राज्यात केंद्र सरकारने एका संयुक्त सचिव पातळीवरील अधिकाऱ्याची नियुक्ती केली आहे, जेणेकरून संसर्गाच्या लिंक कळू शकतील.


तयारी... ४३ हजार आयसाेलेशन बेड सज्ज ठेवण्यात आले आहेत देशभरात

कोरोना रुग्णांसाठी देशभरात केंद्र व राज्य सरकारांसह लष्कर, निमलष्करी दले, रेल्वे, ईएसआयसी, कोल इंडियाच्या रुग्णालयांत ४३ हजार आयसाेलेशन बेडची व्यवस्था केली आहे. रुग्णांचा आकडा सातत्याने वाढत असताना व्हेंटिलेटरची उपलब्धता हे सर्वात मोठे आव्हान आहे. सरकारी यंत्रणेत ६ ते ८ हजार व्हेंटिलेटर आहेत. सरकारने व्हेंटिलेटर निर्मिती करणाऱ्या ३ कंपन्यांना शक्य तितके जास्त व्हेंटिलेटर बनवण्याचे निर्देश दिले. ज्या कंपन्यांचे स्पेसिफिकेशन फेल झाले होते त्यांनाही आवश्यक सुधारणा करून व्हेंटिलेटर तयार करण्यास सांगितले आहे.


आशा... भारतात काेराेनाचा यशस्वी मुकाबला करण्याची क्षमता : डब्ल्यूएचओ
भारत या महामारीतून मुक्त होऊ शकतो, अशी आशा डब्ल्यूएचआेने व्यक्त केली. संस्थेचे कार्यकारी संचालक मायकेल रेयान म्हणाले, भारताने कांजण्या व पाेलिआेसारख्या दोन सायलेंट किलर्सचे उन्मूलन करण्यात जगाचे नेतृत्व केले होते.

X