आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामान्सूनचे केरळमध्ये ६ जूनला आगमन झाले होते. शुक्रवारी त्यास १०० दिवस पूर्ण झाले. देशात आतापर्यंत ९३ टक्के पाऊस झाला आहे. मान्सूनला निरोप देण्यापूर्वी त्यात सुधारणेची अजूनही अपेक्षा वाटते. कारण मान्सूनदरम्यान दमदार पावसाच्या कारकांपैकी एक कमी दाबाचा पट्टा सात दिवसांत दोन वेळा बंगाल खाडीत तयार होणार आहे. त्यामुळे मुसळधार पावसासोबतच मान्सून पूर्वेकडून पश्चिमेकडे पोहोचेल. गेल्या आठवड्यात बंगालच्या खाडीत निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे मध्य भारतातून मार्गक्रमण करताना आेडिशापासून गुजरातपर्यंत दमदार पावसाला सुरुवात झाली आहे. त्यामुळे २३ ऑगस्टपासून सुरू असलेल्या पावसात ९ ते १० टक्के घट झाली होती. त्यापैकी आताच्या पावसाने २-३ टक्के भरपाई होऊ शकेल.
बंगालच्या खाडीत ओडिशा किनाऱ्यावर ११ सप्टेंबर व १६ सप्टेंबरला दुसरा व तिसरे कमी दाबाचे क्षेत्र विकसित होत आहे. म्हणूनच १२ ते २० सप्टेंबरदरम्यान मध्य भारत, उत्तर व दक्षिण भारतीय भागांत पुन्हा एकदा मुसळधार पाऊस होईल. स्कायमेटचे हवामान तज्ज्ञ महेश पालावत म्हणाले, सप्टेंबरमध्ये यंदा सरासरीहून किमान १५ टक्के जास्त पावसाची चिन्हे आहेत. २०१९ मध्ये सप्टेंबर महिन्यात विक्रमी ५२ टक्क्यांहून जास्त पाऊस झाला होता. २००७ मध्ये ११५ टक्के पाऊस झाला होता. सप्टेंबरच्या सुरुवातीपासूनच चांगल्या पावसाची नोंद होत आहे.
देशातील ६५ टक्के जिल्ह्यांत सरासरी किंवा जास्त पाऊस
हवामानतज्ज्ञ म्हणाले, मान्सूनच्या शतकी खेळीत देशातील ६५ टक्के जिल्ह्यांत सरासरीहून जास्त पाऊस झाला. ९ सप्टेंबरपर्यंत सरासरीपेक्षा ७७१ मिमी पाऊस अपेक्षित आहे. आतापर्यंत ७१४ मिमी पाऊस झाला. सरासरीहून त्यात ७ टक्के घट झाली. यंदा मान्सूनला निरोप दिल्यानंतर अधूनमधून हजेरी सुरूच राहील, असा हवामानतज्ज्ञांचा अंदाज आहे. अनेक भागांत मुसळधार पाऊस होऊ शकतो.
२०१९ पर्यंत एक सप्टेंबरपासून होत असे मान्सूनच्या परतीची सुरुवात
२०१९ पर्यंत मान्सूनच्या परतीची सुरुवात होण्याची तारीख एक सप्टेंबर असे. १९६१ ते २०१९ पर्यंतच्या पॅटर्नच्या आधारे हवामान विभागाने दोन आठवडे पुढे ढकलले आहे. २०२० पासून मान्सूनच्या परतीची सुरुवात पश्चिम राजस्थानमधून सामान्यपणे १७ सप्टेंबरपासून मानली जात आहे. दक्षिणेकडील भाग वगळता उर्वरित देशात मान्सूनची पूर्णपणे पाठवणीची तारीख १५ ऑक्टोबर आहे.
जूनमध्ये ११० टक्के पावसासह मान्सूनची चांगली सुरुवात
जूनमध्ये ११० टक्के पावसासह मान्सूनची चांगली सुरुवात झाली होती. परंतु जुलैमध्ये पावसात ७ टक्के घट (९३ टक्के) व ऑगस्टमध्ये २४ टक्के (७६ टक्के) पावसात घट झाली. सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यापासून देशातील विविध भागांत चांगल्या पावसाने हजेरी लावली. सप्टेंबरमध्ये सरासरी १७० मिमी पाऊस होतो. परंतु ९ दिवसांत ८० मिमी पाऊस झाला. हे प्रमाण सरासरीहून १५ टक्के जास्त आहे.
राजस्थानातून १७ सप्टेंबरपासून मान्सून माघारीची शक्यता धूसर
हवामान विभागातील संशोधक आर.के. जेनामनी म्हणाले, बंगालच्या उपसागरात ११ सप्टेंबरला कमी दाबाचे क्षेत्र विकसित होणार आहे. राजस्थानमधून मान्सून १७ सप्टेंबरला परतीची सुरुवात करणे शक्य दिसत नाही. २०१५ मध्ये ४ सप्टेंबर, २०१३ मध्ये ९ सप्टेंबर, २०१६ मध्ये १५ सप्टेंबरला मान्सूनच्या माघारीला सुरुवात झाली होती. इतर वर्षांत मान्सूनने २७ सप्टेंबरनंतर निरोप घेतला होता.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.