आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराकेंद्राच्या ७८ मंत्रालय-विभागांत मंजूर ४० लाख पदांपैकी ९.८ लाख पदे रिक्त आहेत. रेल्वे, गृह, संरक्षण व टपाल या चार विभागांतच ३५ लाखांहून अधिक पदे मंजूर आहेत. पैकी २२.५% म्हणजे ८ लाख पदे रिक्त आहेत. सर्वाधिक २.९४ लाख पदे रेल्वेत रिक्त आहेत. संरक्षण मंत्रालयात (नागरी-कारकुनी) २.६५ लाख, गृह मंत्रालयात १.४४ लाख आणि टपाल विभागात ९० हजारांहून अधिक पदे आतापर्यंत भरण्यात आली नाहीत.
सर्वात वाईट स्थिती विज्ञान व तंत्रज्ञान विभागाची आहे. या विभागात एकूण १२,४४२ पदे मंजूर आहेत. पैकी ८,५४३ (६९%) पदे रिक्त आहेत. पंतप्रधान कार्यालयातही १२९ पदे रिक्त आहेत. अशाच प्रकारे राष्ट्रपती भवनात ९१ व कॅबिनेट सचिवालयात ५४ पदे रिक्त आहेत. केंद्राने रिक्त पदांची माहिती संसदेत सादर केली. कार्मिक विभागाचे मंत्री डॉ. जितेंद्र सिंह संसदेत म्हणाले, हे आकडे ३१ मार्च २०२२ पर्यंतचे आहेत. १.४७ लाख पदांची भरती प्रक्रिया झाली आहे, पण त्याची विभागनिहाय आकडेवारी सध्या तयार नाही.
प्रशासनावर परिणाम : आयएएसची १,४७२ आणि आयपीएसची ८६४ पदे रिक्त
केंद्र सरकारने बुधवारी संसदेत सांगितले, देशभरात आयएएस अधिकाऱ्यांची १,४७२, आयपीएस अधिकाऱ्यांची ८६४ आणि आयएफएसची (वने) १,०५७ पदे रिक्त आहेत. देशामध्ये आयएएस अधिकाऱ्यांची एकूण ६७८९, आयपीएसची ४९८४ आणि आयएफएसची ३१९१ पदे मंजूर आहेत. या हिशेबाने पाहिल्यास आयएएसची २२%, आयपीएसची १७% व आयएफएसची ३३% पदे भरलीच नाहीत.
तपास यंत्रणेतही... : सीबीआयमध्येही १६७३ पदे अद्याप भरलीच नाहीत
देशाची प्रमुख तपास यंत्रणा सीबीआयमध्ये एकूण ७,२९५ पदे मंजूर आहेत. त्यापैकी १,६७३ पदे रिक्त आहेत. केंद्र सरकारनुसार, रिक्त असलेल्या पदांची ही स्थिती ३० नोव्हेंबर २०२२ पर्यंत होती. सरकारने नुकतीच १२८ अतिरिक्त पदे मंजूर केली आहेत. ही संख्यादेखील यात जोडली आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.