आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

उत्तर शोधले:कोरोनामुळे विस्कळीत झालेले जीवन सात वर्षांत पूर्वपदावर येण्याची शक्यता

एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • जगभरात सुरू असलेल्या कोरोना लसीकरणाचा अंदाज

टॉम रँडल
कोरोना महामारीनंतर विस्कळीत झालेले जीवन पुन्हा पूर्वपदावर केव्हा येऊ शकेल? असा मोठा प्रश्न जगासमोर आहे. आता कोरोनाची लस तयार झाली आहे. अनेक देशांत लसीकरणही सुरू झाले आहे. त्यामुळे या प्रश्नाने पुन्हा जोर धरला आहे. त्या पृष्ठभूमीवर ‘ब्लूमबर्ग कोविड व्हॅक्सिन ट्रॅकर’ने त्याचे उत्तर शोधून काढले आहे. त्यानुसार, महामारीचा सध्याचा वेग आणि लसीकरणाची निश्चित केलेली उद्दिष्टे पाहिल्यास कोरोनामुळे विस्कळीत झालेले आयुष्य पुन्हा रुळावर येण्यास सात वर्षे लागतील.

‘ब्लूमबर्ग’ने या अंदाजासाठी जगभरात सुरू असलेल्या लसीकरण कार्यक्रमाचा विस्तृत डेटाबेस तयार केला आहे. त्यानुसार जगात आतापर्यंत कोरोना लसीचे ११.९ कोटी डोस देण्यात आले आहेत. या कामाची माहिती असलेल्या तज्ञांत अमेरिकेचे वैज्ञानिक अँथनी फॉसी यांचाही समावेश आहे. त्यांच्या मते, सामान्य स्थितीत कोणत्याही देशातील सुमारे ७०-८० टक्के लोकसंख्येचे लसीकरण करणे अनिवार्य असेल. काही देशांत ७५ टक्के लोकसंख्येला लसीचे दोन डोस देण्याचे उद्दिष्ट गाठण्याचा वेग चांगला आहे, असे ब्लूमबर्ग ट्रॅकर दर्शवते. उदाहरणार्थ इस्रायलचा वेग सर्वाधिक आहे. फक्त दोन महिन्यांतच ७५ टक्के लोकसंख्येला लसीकरण करण्याचे उद्दिष्ट साध्य करण्याकडे त्या देशाची वाटचाल सुरू आहे. अमेरिका २०२२ च्या सुरुवातीला हे उद्दिष्ट पूर्ण करू शकेल, तर कॅनडाला त्यासाठी १० वर्षे लागतील.

दोन डोस आवश्यक, या आधारावरच अंदाज
ब्लूमबर्ग ट्रॅकरने अमेरिकेसह ६८ देशांत होत असलेल्या लसीकरणाचे आकडे आणि तथ्य यांची शहानिशा केली आहे. कोरोनापासून बचावासाठी लसीच्या दोन डोसची गरज आहे. त्याच्याच आधारे आपला अंदाज व्यक्त केला आहे. तथापि, ब्लूमबर्ग ट्रॅकरचे असेही म्हणणे आहे की, अलीकडेच जॉन्सन अँड जॉन्सनच्या कोरोना लसीच्या चाचण्यांत फक्त एकाच डोसमुळे चांगला परिणाम झाल्याचे समोर आले आहे. जर या लसीला परवानगी मिळाली तर विविध देशांत तिच्या उपलब्धतेच्या आधारावर अंदाजात बदल करता येऊ शकतो.

भारतात नुकतीच सुरुवात, त्यामुळे अंदाजात समावेश नाही
ब्लूमबर्गचा हा अंदाज लसीकरणाच्या सुरुवातीच्या आकड्यांवर आधारित आहे. त्याचा वेग वाढल्यास अनुमानित कालावधीत घटही होऊ शकते. लसीची उपलब्धताही एक महत्त्वाचा पैलू आहे. लसनिर्मिती करणाऱ्या भारत आणि मेक्सिको यांसारख्या निवडक देशांत हे काम नुकतेच सुरू झाले आहे. त्यामुळे त्या देशांचा समावेश अंदाजात करण्यात आलेला नाही.

बातम्या आणखी आहेत...