आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • A System Like A Bank Has Been Set Up With The Money Received As Begging In Bihar; News And Live Updates

दिव्य मराठी विशेष:बिहारमध्ये भीक म्हणून मिळालेल्या पैशात उभी केली बँकेसारखी व्यवस्था, जमा रकमेवर मिळते व्याज अन् गरज पडेल तसे कर्जही

मुजफ्फरपूर2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • 175 भिकाऱ्यांनी घेतला पुढाकार, सरकार पाचही बचत गटांना देणार 10 लाखांची मदत

आर्थिक चिंता कुणाला नसते? या चिंतेतून मग लोक वेगवेगळे उपाय शोधत राहतात. असाच एक उपाय मुजफ्फरपूर येथील भिकाऱ्यांनीही शोधला. कोणतीही आर्थिक अडचण सहज सोडवता यावी यासाठी जिल्ह्यातील १७५ भिकाऱ्यांनी एकत्र येऊन बँकेसारखे पाच बचत गट सुरू केले. हे बचत गट व्यवस्थित चालावेत म्हणून हे भिकारी लोक दिवसभर मिळालेल्या पैशातून काही रक्कम यात जमा करतात. नुसते जमा करत नाहीत, त्यावर व्याजही मिळते. वर गरज पडलीच तर कर्जही. गरजू सदस्यास १ टक्का व्याजदराने तीन महिन्यांसाठी कर्ज दिले जाते. साप्ताहिक बैठकीत बचत गटात जमा रक्कम व कर्जाच्या रकमेचा हिशोब लावला जातो.

या अफलातून योजनेला आता सरकारनेही मदत करण्याचे ठरवले आहे. दर रविवारी हे गट एकत्र येतात. बैठक घेतात. एकत्रित निर्णय घेतात. बैठकीची कार्यवाही टिपून ठेवली जाते. यासाठी मदतीला शिकलेल्या तरुणांना बोलावले जाते. त्यांच्या मदतीने आठवड्यातील जमा रक्कम, दिलेले कर्ज आणि व्याजाचा हिशेब नोंद करून ठेवला जातो. या गटांच्या पारदर्शक व्यवहारांची दखल सामाजिक सुरक्षा विभागानेही घेतली असून पाचही बचत गटांना प्रत्येकी १० लाख रुपयांची मदत आता दिली जाणार आहे. यामुळे हे लोक मुख्य प्रवाहात येतील आणि स्वयंरोजगाराची प्रेरणा त्यांना मिळेल, हा उद्देश आहे.

सामाजिक सुरक्षा विभागाचे सहायक संचालक ब्रजभूषण कुमार यांनी सांगितले, हे गट यशस्वीपणे सुरू आहेत. स्वकमाईवर त्यांचे प्रामाणिक प्रयत्न सुरू आहेत. सरकारी मदतीतून हे गट आता चादरी, कार्पेट, मेणबत्ती इत्यादी वस्तू तयार करतील. सरकार त्याची खरेदी करेल. जिल्ह्यात भीक मागून उदरनिर्वाह चालवणाऱ्यांचा सर्व्हे केला जात असून मंदिर, मशिदी, रेल्वेस्टेशन व बसस्थानकांवर ही मोजणी होत अाहे. आतापर्यंत ५७५ जणांची नोंद झाली आहे. ३१ सप्टेंबरपासून या सर्वांना मदत सुरू होईल. या पाचही बचत गटांची एकूण जमा रक्कम ५७ हजार रुपये आहे.

साप्ताहिक बैठकीत होतो हिशेब, याच वेळी कर्जाला दिली जाते मंजुरी
कर्ज घेण्यासाठी प्रक्रियेचे पूर्ण पालन करावे लागते. कर्ज घेणाऱ्याच्या अंगठ्याचे ठसे घेतले जातात. ज्या सदस्यास गरज आहे तो बैठकीत मागणी करतो. त्यानंतर एक सदस्य साक्षीदार म्हणून नोंदवला जातो आणि २ हजार रुपये कर्ज स्वरुपात दिले जातात. उर्वरित रक्कम एका पेटीत ठेवली जाते. या पेटीच्या तीन चाव्या असतात. एक अध्यक्ष, दुसरी सचिवाकडे आणि तिसरी कोषाध्यक्षाकडे असते. बैठकीदिवशी ही पेटी उघडली जाते. कोषाध्यक्ष कर्जाची रक्कम, व्याज किंवा जमा रकमेचा व्यवहार पाहतो.

बातम्या आणखी आहेत...