आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

लॉकडाऊन ३ मेपर्यंत:20 एप्रिलपर्यंत अग्निपरीक्षा, नंतर सूट; पहिला-दुसरा मिळून एकूण लॉकडाऊन 40 दिवस 

नवी दिल्लीएका वर्षापूर्वीलेखक: प्रतिनिधी
  • कॉपी लिंक
मुंबईत जमले हजारो परप्रांतीय मजूर, ‘जेवण द्या वा गावाकडे जाऊ द्या’ची मागणी - Divya Marathi
मुंबईत जमले हजारो परप्रांतीय मजूर, ‘जेवण द्या वा गावाकडे जाऊ द्या’ची मागणी
  • २० एप्रिलपर्यंत तुमचा भाग हॉटस्पॉट झाला नाही तर लॉकडाऊनमध्ये सूट, संसर्ग वाढला की सूट मागे : मोदी
  • कडक लॉकडाऊनसंबंधी विस्तृत निर्देश आज जारी करणार

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लॉकडाऊन ३ मेपर्यंत वाढवला आहे. मात्र, जे भाग हॉटस्पॉट नाहीत, कोरोनाचा संसर्ग जेथे होण्याची शक्यता अत्यंत कमी आहे अशा ठिकाणी २०  एप्रिलनंतर काही अत्यावश्यक व्यवहार सुरू होतील. पंतप्रधानांनी मंगळवारी सकाळी देशाला उद्देशून भाषण केले. ते म्हणाले की, २०  एप्रिलपर्यंत अग्निपरीक्षा आहे. या काळात प्रत्येक शहर, ठाणे, जिल्हा आणि राज्यात लॉकडाऊनचे पालन कसे होते आणि या भागात संसर्ग कसा टाळण्यात आला यावर नजर राहील. सूट मिळाली तरी ती सशर्त असेल आणि बाहेर पडण्याचे नियम अत्यंत कडक असतील, असा इशारा त्यांनी दिला. नियमभंग झाला आणि संसर्ग पुन्हा वाढला तर ही सूट तत्काळ मागे घेतली जाईल. लॉकडाऊन २.० साठीचे निर्देश सरकार बुधवारी जाहीर करणार आहे. 

पहिला लॉकडाऊन २१ दिवसांनंतर १४  एप्रिलला संपणार होता. आता १९ दिवसांच्या वाढीमुळे लॉकडाऊन एकूण ४० दिवसांचा झाला आहे. आपल्या २५ मिनिटांच्या भाषणात पंतप्रधानांनी म्हटले की, देश लॉकडाऊनची मोठी आर्थिक किंमत चुकवत आहे. मात्र राज्यांनी लॉकडाऊन वाढीची शिफारस केली आहे. ११ राज्यांनी यापूर्वीच लॉकडाऊन ३०  एप्रिलपर्यंत वाढवला आहे. सूत्रांनुसार, एक मेची सुटी, तर २ व ३ मेला शनिवार-रविवार आहे, त्यामुळे लॉकडाऊन ३ मेपर्यंत वाढवण्यात आला आहे. 

रेल्वे ३ मेपर्यंत रद्द, आता अॅडव्हान्स बुकिंग नाही 

रेल्वेने प्रवासी वाहतुकीवरील बंदी ३ मेपर्यंत वाढवली आहे. तीन मेच्या मध्यरात्रीपर्यंत काउंटर बंद राहतील. रेल्वेने १५  एप्रिलनंतरचे बुकिंग सुरू केले होते. ऑनलाइन बुक केलेल्या तिकिटाचे पैसे रिफंड होतील. 

देशातील, आंतरराष्ट्रीय उड्डाणेही ३ मेपर्यंत बंद 

डीजीसीएने आंतरराष्ट्रीय, देशातील उड्डाणांवर ३ मेच्या मध्यरात्रीपर्यंत बंद ठेवण्यास सांगितले आहे. पूर्वी या सेवा २५ मार्चपासून ते १४  एप्रिलपर्यंत बंद होत्या. एअरलाइन्सने ३ मेपर्यंतची तिकिटे रद्द करणे सुरू केले आहे. 

संयम ठेवा : जीव धोक्यात घालणे कुटुंबासह संपूर्ण देशासाठी घातक

आपल्या घरी जाण्यासाठी ही गर्दी जमली होती. संसर्गाच्या अदृश्य शत्रूला आमंत्रण देत प्रवास करणे तुमच्यासाठी, कुटुंबासाठीही धोकादायक आहेच, शिवाय देशासाठीही ते घातक ठरू शकते. “दिव्य मराठी’चे पुन्हा आवाहन आहे की, जेथे आहात तेथेच राहा. सुरक्षित राहा.

  • उत्तरप्रदेश सरकारने सा. बां. विभागाचे काम १५ एप्रिलपासून पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र लॉकडाऊन वाढल्याने तो स्थगित करण्यात आला.
  • कंपन्यांनी लोकांना नोकरीवरून काढू नये तसेच त्यांचे वेतन देण्यास विलंब लावू नये, असे निर्देश कर्नाटक कामगार विभागाने दिले आहेत.

मुंबईत जमले हजारो परप्रांतीय मजूर, ‘जेवण द्या वा गावाकडे जाऊ द्या’ची मागणी

मुंबई | वांद्रे स्टेशनवर मंगळवारी सायंकाळी ५ वाजता हजारो परप्रांतीय मजूर जमले. खाण्यासाठी काहीच शिल्लक राहिलेले नाही, आम्हाला जेवण द्या किंवा आमच्या गावी परत जाऊ द्या, अशी मागणी त्यांनी केली. पोलिसांनी जमाव पांगवला. यावर पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे म्हणाले, यासाठी केंद्र सरकार जबाबदार आहे. आम्ही केंद्राकडे विशेष रेल्वेची मागणी केली होती, ती मान्य झाली नाही. या घटनेसंदर्भात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी उद्धव ठाकरे यांच्याशी फोनवर चर्चा केली.

मोदींची सप्तसूत्रे : कोरोनाविरुद्ध या ७ बाबींचे पालन करण्यास सांगितले 

1. ज्येष्ठांची काळजी घ्या. ज्यांना जुने आजार आहेत, त्यांची जास्त काळजी घेत संसर्ग टाळा. 2. लॉकडाऊन आणि सोशल डिस्टन्सिंगचे पालन करा. घरात बनवलेले मास्क लावणे टाळू नका.  3. रोगप्रतिकारक क्षमता वाढवण्यासाठी आयुष मंत्रालयाच्या निर्देशांचे पालन करा. गरम पाणी, काढा प्या.  4. आरोग्य सेतू अॅप डाऊनलोड करा, दुसऱ्यांनाही द्या. 5. गरीब कुटुंबांची काळजी घ्या, त्यांना जेवण द्या.  6. आपल्या व्यवसाय, उद्योगात काम करत असलेल्या लोकांप्रति भावना जपा. कुणाला नोकरीवरून काढू नका.  7. डॉक्टर, नर्स, सफाई कामगार, पोलिस या कोरोना योद्ध्यांचा सन्मान राखा. 

आपण योग्य वेळी योग्य मार्ग निवडला, त्याची जगभर चर्चा होईल : पंतप्रधान 

पंतप्रधान म्हणाले, देशात कोरोनाचा एकही रुग्ण नव्हता, तेव्हाच बाधित देशातून येणाऱ्यांची स्क्रीनिंग सुरू केली. कोरोनाचे ५५० रुग्ण झाल्यानंतरच देशात २१ दिवसांच्या लॉकडाऊनचे पाऊल उचलण्यात आले. बड्या देशांच्या तुलनेत आज भारतात स्थिती नियंत्रणात आहे. योग्य वेळी जो योग्य मार्ग निवडला आहे, तो बरोबर आहे. भारताने जो मार्ग निवडला, त्याची जगभर चर्चा होईल.  

बातम्या आणखी आहेत...