आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • According To Footage From Delhi, Jharkhand MLAs Meet BJP Leaders Including Bavankulam On July 15; News And Live Updates

आमदार खरेदी प्रकरण:दिल्लीतील फुटेज सांगतेय, झारखंड आमदारांची 15 जुलैला बावनकुळेंसह भाजप नेत्यांशी बैठक; हॉटेलमधील बैठकीत चरणसिंग ठाकूर, बेलखेडे सहभागी

रांची3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • बावनकुळे म्हणतात.... 15 जुलै रोजी दिल्लीतच होतो.., कर नाही त्याला डर कशासाठी ?

झारखंड सरकार पाडण्याचा कट आणि आमदारांच्या खरेदी प्रकरणात झारखंड पोलिसांच्या हाती मंगळवारी महत्त्वाचे धागेदोरे लागले. झारखंडचे तीन आमदार काँग्रेसचे इरफान अन्सारी, उमाशंकर अकेला आणि अपक्ष अामदार अमित यादव यांची १५ जुलै रोजी दिल्लीतील द्वारका भागातील हॉटेल विवांतामध्ये महाराष्ट्राचे माजी ऊर्जामंत्री तथा भाजप प्रदेश सरचिटणीस चंद्रशेखर बावनकुळे, नागपूरचे भाजप जिल्हा उपाध्यक्ष चरणसिंग ठाकूर आणि व्यावसायिक जयकुमार बेलखेडे यांच्यासोबत १५ मिनिटे बैठक झाली.

या बैठकीचे सीसीटीव्ही फुटेज रांची पोलिसांना मिळाले आहे. झारखंडमधील खलारीचे पोलिस उपअधीक्षक अनिमेष नैथानी यांच्या नेतृत्वाखालील पथक दिल्लीत तपास करीत आहे. या पथकाला हे फुटेज मिळाले आहे. यात दिल्लीला गेलेले झारखंडचे तीन अामदार, अटकेत असलेला ठेकेदार अभिषेक दुबे, अमितकुमार सिंह आणि निवारण महतो हॉटेलमध्ये प्रवेश करताना दिसतात. याशिवाय हॉटेलमध्ये झारखंडचे तीन आमदार, महाराष्ट्रातील दोन नेते आणि व्यावसायिक व तीन आरोपींच्या बैठकीचे क्षणही सीसीटीव्हीत कैद झाले आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार बैठकीनंतर हे सर्व दोन अलिशान गाड्यांमधून दुसऱ्या नेत्यांच्या भेटीसाठी बाहेर पडले. अटकेत असलेल्या आरोपींनीही पोलिसांना दिलेल्या जबाबामध्ये दोन गाड्यांचा उल्लेख केला आहे. इंडिगोच्या विमानाने ते दिल्लीला पोहोचल्यावर विमानतळावर दोन गाड्या तैनात होत्या. यापैकी इनोव्हामध्ये तीन आमदार आणि स्कॉर्पिओमध्ये तीन आरोपी हॉटेल विवांतामध्ये गेले होते. तर बावनकुळे आणि चरणसिंग यांना घेऊन महाराष्ट्रातील व्यावसायिक जयकुमार बेलखेडे हॉटेलमध्ये अाले होते.

एका केंद्रीय नेत्यांचीही भेट
महाराष्ट्रातील नेत्यांसोबत झारखंडचे तीन आमदार दिल्लीतील बड्या केंद्रीय नेत्याच्या निवासस्थानी गेले होते. तथापि तिथे केवळ औपचारिक नमस्कार वगैरे झाल्यानंतर सर्व परतले, अशीही माहिती सूत्रांनी दिली.

तीन अामदारांना नोटीस पाठवणार
सीसीटीव्ही फुटेज मिळाल्यामुळे तीन अामदार गोत्यात आले आहेत. पोलिस पथक रांचीला परत येताच अन्सारी, अकेला आणि यादव या तिघांना नोटीस पाठवून त्यांचा जबाब घेतला जाणार आहे.

सीबीआय चौकशी करा, रांची उच्च न्यायालयात याचिका दाखल
रांचीतील सामाजिक कार्यकर्ते पंकज यादव यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल करून अामदार खरेदी प्रकरणी सीबीआय चौकशीची मागणी केली आहे. सन २००५ पासून झारखंड हे घोडेबाजाराचे केंद्र बनले आहे. झारखंडचे नेेते पैसे घेऊन जनतेची मते विकतात. ही मतदारांच्या संविधानिक हक्काची पायमल्ली असल्याचा अारोप याचिकेत करण्यात आला आहे. याचिकेत आयकर विभाग,सीबीअाय,ईडी, रांची पोलिस आणि आमदार जयमंगलसिंह यांना प्रतिवादी करण्याची मागणी करण्यात आली आहे.

विवांतामध्ये बैठक झाली नाही, तीन अामदारांचा दावा
हाॅटेल विवांतामध्ये गेलोच नाही त्यामुळे बैठकीत सहभागी असल्याचा प्रश्नच येत नाही,अशा शब्दांत तीन आमदारांनी आपल्यावरील आरोप फेटाळले. मग सीसीटीव्ही फुटेजमध्ये कसे दिसता असे विचारले असता, आमच्याविरोधात मोठा कट रचण्यात आला असून सीसीटीव्ही फुटेज मॅन्युपुलेटही केले जाऊ शकतात, असे काँग्रेस आमदार अन्सारी म्हणाले. माझ्या नावाची खोली बुक आहे असे सांगितले होते, पण मी तिथे गेलो नाही, असे ते म्हणाले.

बावनकुळे म्हणतात.... १५ जुलै रोजी दिल्लीतच होतो.., कर नाही त्याला डर कशासाठी ?
नागपूर | झारखंड पोलिसांचे पथक मुंबईत आले असून ते माझी चौकशी करणार आहे, अशी बातमी आहे. मी कुठल्याही चौकशीला भीत नाही. आणि कोणत्याही चौकशीसाठी तयार आहे, “कर नाही त्याला डर कशासाठी?’ असा सवाल भाजप प्रदेश सरचिटणीस चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला. तसेच १५ जुलै रोजी आपण दिल्लीत होतो हे मात्र त्यांनी मान्य केेले. परत एकदा सांगतो मी झारखंडला कधीही गेलो नाही.

त्यामुळे तेथील घडामोडींशी माझा दुरान्वयेही संबंध नाही. पकडण्यात आलेल्या अभिषेक दुबे नामक आरोपीने माझे नाव कसे व का घेतले, हे चौकशीत उघड होईल. त्यावर मी अधिक काही बोलणे योग्य होणार नाही, असे बावनकुळे यांनी स्पष्ट केले. झारखंडमधील ८१ आमदारांपैकी एकालाही मी भेटलो नाही. भेटलो असतो तर त्यांच्या माेबाइलमध्ये माझा नंबर आला असता. चॅटिंग केले असते तर एसएमएस सापडले असते. तसे काहीही झालेले नाही, असे ते म्हणाले.

पक्षांतर्गत विराेधकच नाही...
मला बदनाम करण्यात पक्षांतर्गत विरोधक असण्याचा प्रश्नच येत नाही. कारण पक्षांतर्गत माझे कोणी विरोधकच नाही. पक्षात सर्वांशी माझे संबंध चांगले आहेत, असे बावनकुळे यांनी स्पष्ट केले.

१५ ते १७ जुलै दरम्यान दिल्लीतच
१५ ते १७ जुलै दरम्यान मी दिल्लीत होतो, ते रावसाहेब दानवे आणि भागवत कराड यांना भेटून शुभेच्छा देण्यासाठी गेलो होतो. महाजेनकोचे संचालक विश्वास पाठक दानवे यांचे ओएसडी म्हणून गेले आहे. त्यांनीही बोलावले होते. नवीन मंत्री १५ आॅगस्टपर्यत स्वागत व सत्कार स्वीकारणार नव्हते म्हणून मीच त्यांना भेटण्यासाठी गेलो असे बावनकुळे यांनी स्पष्ट केले.

आज ना उद्या भाजपचे पाप उघडकीस येईल : नाना पटोले
भाजपच्या चंद्रशेखर बावनकुळेंचे नाव झारखंड आमदार खरेदीत समोर येत आहे. अभिषेक दुबे नावाच्या दलालाने त्यांचे नाव घेतले अाहे. ही सर्व मंडळी दिल्लीत होती. झारखंडमध्ये एफआयआरची नोंद झाली आहे. त्यामध्ये बावनकुळेंचेही नाव आहे. आमदार, खासदारांची खरेदी विक्री करणे आणि सरकार पाडण्याचे प्रयत्न भाजपकडून होत आहेत. लोकशाहीचा खून करण्याचे पाप नरेंद्र मोदी आणि त्यांचे लोक या देशात करत आहेत. आज ना उद्या भाजपचे हे पाप उघडकीस येणार आहे. त्यानंतर या देशातील जनताच त्यांना काय शिक्षा द्यायची ती देईल, असे ते म्हणाले.

कोर्टातील हजेरी टळली
तीन आरोपी अभिषेक दुबे,अमितकुमार सिंह आणि निवारण महतो यांना मंगळवारी न्यायालयात हजर करण्यात येणार होते. परंतु रांचीत एका वकिलाची हत्या झाल्याने वकील संघाने कामकाजावर बहिष्कार टाकला होता.

बातम्या आणखी आहेत...