आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करादिल्लीच्या निर्भया अत्याचार प्रकरणानंतर देशभर गाजलेल्या साकीनाका बलात्कार आणि हत्या प्रकरणाचा आरोपी मोहन चौहानला अखेर फाशीची शिक्षा ठोठावण्यात आली आहे. दिंडोशी सत्र न्यायालयाने गुरुवारी हा महत्त्वाचा निकाल दिला. आरोपी मोहन चौहानने सप्टेंबर महिन्यात पीडितेवर बलात्कार करून तिची निर्घृण हत्या केली. या घटनेने पुन्हा एकदा राजधानी मुंबईसह देश हादरला होता. त्यावर आज दिंडोशी न्यायालयात सुनावणी झाली. न्यायालयाने आरोपी मोहन चौहानवर कसलिही दया-माया न दाखवता फाशीची शिक्षा सुनावली. त्यामुळे पीडितेला खऱ्या अर्थाने न्याय मिळाल्याची भावना व्यक्त होत आहे.
सेफ सिटी इंडेक्स (2021) मध्ये देशातील दुसऱ्या क्रमांकाची सर्वात सुरक्षित मानल्या जाणाऱ्या मुंबईत बलात्कार आणि अत्याचार झालेल्या महिलेचा तब्बल 30 तासांनंतर रुग्णालयात मृत्यू झाला होता. बलात्कारानंतर आरोपीने महिलेच्या प्रायव्हेट पार्टवर रॉडने जबर वार केले होते. पीडित महिलेवर मुंबईतील राजावाडी रुग्णालयात उपचार सुरू होते. उपचारादरम्यान पीडितेचा मृत्यू झाला होता.
वर्षाच्या आत खटल्याचा निकाल
या प्रकरणाचा जलद गतीने तपास करत केवळ एका वर्षाच्या याचा निकाल लावण्यात आला आहे. गणेश चतुर्थीच्याच दिवशी मुंबईत घडलेल्या साकीनाका बलात्कार प्रकरणाने संपूर्ण मुंबई हादरली होती. या प्रकरणातील नराधम मोहन चौहानला पोलिसांनी काही तासांतच अटक केली. पीडितेला आणि तिच्या कुटुंबियांना न्याय देण्यासाठी हा खटला जलदगतीने चालविण्यात येईल, असे आश्वासन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जनतेला दिले होते. त्यानुसार मुंबई पोलिसांनी अवघ्या 18 दिवसांत या प्रकरणाचा तपास पूर्ण करत आपले आरोपपत्र दिंडोशी सत्र न्यायालयात दाखल केले होते. 346 पानांच्या या आरोपपत्रातील माहितीनुसार, पीडित महिला ही आरोपीला आधीपासूनच ओळखत होती. गुन्हा घडला त्याच्या 25 दिवस आधीही आरोपीने महिलेला भेटण्याचा आणि संपर्क साधण्याचा प्रयत्न केला होता. पण तो यशस्वी होऊ शकला नाही. त्यामुळेच बऱ्याच कालावधीनंतर ती त्याला भेटली तेव्हा रागाच्या भरात नराधमाने तिच्यासोबत हे अमानुष कृत्य केले. यात लोखंडी सळीचाही त्याने वापर केल्याचे पोलिसांनी म्हटले आहे.
काय आहे घटना?
गेल्या वर्षी ऐन गणेशोत्सवात मुंबईतील साकीनाका परिसरात घडलेल्या या घटनेने संपूर्ण मुंबई हादरली होती. 10 सप्टेंबर 2021 च्या मध्यरात्री एक 32 वर्षीय महिला रस्त्यावर रक्तबंबाळ अवस्थेत जखमी आढळून आली. तिला राजावाडी रुग्णालयात दाखल करण्यात आले असता तिच्यावर बलात्कार करण्यात आल्याचे स्पष्ट झाले. डॉक्टरांच्या अथक प्रयत्नांनंतरही 11 सप्टेंबर रोजी तिने आपले प्राण सोडले. या घटनेनंतर काही तासांच्या आतच मुंबई पोलिसांकडून आरोपी मोहन चौहानला अटक केली होती. मोहनवर भारतीय दंड संहितेच्या विविध कलमांतर्गत बलात्कार, हत्या, अॅट्रॉसिटी, जाणीवपूर्वक गंभीर मारहाण यासह हत्यार कायद्यानुसार गुन्हा नोंदवण्यात आला. अवघ्या 18 दिवसांत मुंबई पोलिसांकडून याप्रकरणी आरोपपत्र दाखल करण्यात आलं होतं.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.