आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराराजीव गांधी हत्या प्रकरणावर सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी मोठा निकाल दिला आहे. न्यायालयाने सर्व 6 दोषींना सोडण्याचे आदेश दिले. यामध्ये नलिनी आणि आरपी रविचंद्रन यांचा समावेश आहे. यानंतर जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेल्या सर्व दोषींची सुटका करण्यात आली आहे.
18 मे रोजी सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणातील दोषी पेरारिवलनला सोडण्याचे आदेश दिले होते. उर्वरित दोषींनीही याच आदेशाचा हवाला देत कोर्टाकडून सुटकेची मागणी करण्यात आली होती. नलिनी आणि रविचंद्रन या दोघांनी 30 वर्षांहून अधिक काळ तुरुंगात घालवला आहे.
सोनियांनी दोषी नलिनीला केले होते माफ
राजीव गांधी यांच्या हत्येप्रकरणी नलिनी यांना अटक झाली तेव्हा ती गर्भवती होती. तिला गरोदर होऊन दोन महिने झाले होते. त्यानंतर सोनिया गांधींनी नलिनी यांना माफ केले. अद्याप जगात न आलेल्या नलिनीच्या चुकीची शिक्षा एका निष्पाप मुलाला कशी दिली जाऊ शकते, असे त्या म्हणाल्या होत्या.
याआधीही गुन्हेगारांच्या सुटकेसाठी झाले असे प्रयत्न
राजीव गांधी हत्येप्रकरणी ट्रायल कोर्टाने कटात सहभागी असलेल्या 26 दोषींना फाशीची शिक्षा सुनावली होती. मे 1999 मध्ये सर्वोच्च न्यायालयाने 19 जणांची निर्दोष मुक्तता केली. उर्वरित सात आरोपींपैकी चार आरोपींना (नलिनी, मुरुगन ऊर्फ श्रीहरन, संथन आणि पेरारिवलन) मृत्युदंड आणि उर्वरित (रविचंद्रन, रॉबर्ट पायस आणि जयकुमार) यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली. चौघांच्या दयेच्या अर्जावर तामिळनाडूच्या राज्यपालांनी नलिनी यांची फाशीची शिक्षा जन्मठेपेत बदलली. उर्वरित आरोपींचा दयेचा अर्ज राष्ट्रपतींनी 2011 मध्ये फेटाळला होता.
निवडणुकीच्या सभेत झाली होती राजीव गांधी यांची हत्या
राजीव गांधी यांची 21 मे 1991 रोजी तामिळनाडूमधील श्रीपेरुंबदुर येथे निवडणूक सभेदरम्यान धनू नावाच्या LTTE आत्मघातकी बॉम्बरने हत्या केली. एलटीटीईची महिला दहशतवादी धनू (तेनमोजी राजरत्नम) हिने राजीव गांधींना फुलांचा हार घातल्यानंतर त्यांच्या पायाला स्पर्श केला आणि खाली वाकून कमरेला बांधलेल्या स्फोटकांचा स्फोट केला. हा स्फोट एवढा जोरदार होता की अनेकांचे तुकडे झाले. राजीव गांधी आणि हल्लेखोर धनू यांच्यासह 16 जणांचा जागीच मृत्यू झाला, तर 45 जण गंभीर जखमी झाले.
श्रीलंकेत शांतीरक्षक दल पाठवल्याने नाराज होती लिट्टे
राजीव यांनी त्यांच्या कार्यकाळात श्रीलंकेत शांती सेना पाठवली होती, त्यामुळे तामिळ बंडखोर संघटना LTTE (लिबरेशन टायगर्स ऑफ तमिळ इलम) त्यांच्यावर नाराज होती. 1991 मध्ये राजीव गांधी लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी चेन्नईजवळील श्रीपेरंबदुर येथे गेले होते, तेव्हा एलटीटीईने राजीव यांच्यावर आत्मघातकी हल्ला केला.
देशाचे सर्वात तरुण पंतप्रधान होते राजीव गांधी
1984 मध्ये इंदिरा गांधी यांच्या हत्येनंतर राजीव गांधी पंतप्रधान झाले. लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला तीन चतुर्थांश जागा जिंकण्यात यश आले होते. त्यावेळी काँग्रेसने 533 पैकी 414 जागा जिंकल्या होत्या. राजीव पंतप्रधान झाले तेव्हा त्यांचे वय अवघे 40 वर्षे होते. ते देशाचे सर्वात तरुण पंतप्रधान होते. त्यांनी आपल्या कार्यकाळात शाळांमध्ये संगणक बसविण्याची व्यापक योजना आणली. राजीव गांधी यांच्या कार्यकाळात जवाहर नवोदय विद्यालयांची स्थापना झाली. पीसीओच्या माध्यमातून गावोगावी दूरध्वनी पोहोचला.
यादरम्यान त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोपही करण्यात आले. शीख दंगल, भोपाळ गॅस घटना, शाह बानो प्रकरण, बोफोर्स घोटाळा, काळा पैसा आणि श्रीलंका धोरणावर राजीव सरकारवर टीका झाली. त्यामुळे निवडणुकीत काँग्रेसचा पराभव झाला आणि व्हीपी सिंह यांचे सरकार स्थापन झाले. हे सरकार 1990 मध्ये पडले आणि काँग्रेसच्या पाठिंब्याने चंद्रशेखर यांचे सरकार स्थापन झाले. हे सरकारही 1991 मध्ये पडले आणि निवडणुका जाहीर झाल्या. या निवडणुकांच्या प्रचारासाठी राजीव तामिळनाडूला गेले होते. जिथे त्यांची हत्या झाली.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.