आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Action May Be Taken Against Shiv Sena Rebels Today; Uddhav Thackeray Will Win The Battle Sharad Pawar

शिवसेनेची मॅच फिक्सिंग नाही:बंडखोरांवर आजच कारवाई होऊ शकते; लढाईत उद्धव ठाकरेंचाच विजय होणार- शरद पवार

नवी दिल्लीएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

शिवसेनेच्या बंडखोर आमदार, मंत्र्यांवर आजच कारवाईची शक्यता शरद पवार यांनी व्यक्त केली. ''शिवसेना संर्घष करणारा पक्ष आहे, चाळीस-पन्नास लोक गेले तर त्याचा शिवसेनेवर परिणाम होणार नाही. शिवसैनिक चिवट आहे ते पुन्हा संघर्ष करतील. उद्धव ठाकरेंचा विजय होणार हे निश्चित आहे.'' असा विश्वास राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज स्पष्ट केले.

राष्ट्रपती पदासाठी यशवंत सिन्हा भाजपविरोधात उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. त्यासाठी शरद पवार हे दिल्लीला गेले असून तेथे त्यांनी पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी ते माध्यमांशी बोलत होते.

राऊतांचे वक्तव्य ऐकलेच नाही

पवार म्हणाले, शिवसेनेचा एक गट आज आसाममध्ये आहे, त्यांच्यावतीने जी स्टेटमेंट आले त्यातून त्यांना सत्ता परिवर्तन हवे आहे. शिवसेनेची ही खासीयत आहे की गेलेले लोक परत आल्यानंतर त्यांचा पराभव होतो. आमचा पाठिंबा आजही शिवसेनेला आहे. मी संजय राऊत यांचे वादग्रस्त वक्तव्य मी ऐकले नाही.

मुंबईत येताच बंडखोरांची भूमिका बदलेल

बंडखोर आमदारांची मुंबईत आल्यानंतर भूमिका बदलेल. महाविकास आघाडी सरकार अबाधित आहे आणि आम्ही ते अबाधित ठेवू ईच्छितो. एकनाथ शिंदे गट नाराज आहे पण ते आज किंवा उद्या परत येतीलच. त्यांच्या अटी आणि मागण्यांबाबत शिवसेना निर्णय घेईल हा त्यांच्यातील विषय आहे, त्यात मला माहीती नाही असे पवार म्हणाले.

मग गुवाहाटील का बसले?

शरद पवार म्हणाले, एकनाथ शिंदे गट म्हणतात की, आमच्याकडे संख्याबळ आहे, तर एकनाथ शिंदे गट गुवाहाटीत का बसला त्यांनी राज्यात यावे. आधी शिंदे गटाला त्रास झाला नाही. आजच का होतोय असा सवालही पवार यांनी व्यक्त केला.

शिंदे गटाला भाजपची साथ

पवार म्हणाले, गुजरात आणि त्यानंतर दुसरे आसाममध्ये शिंदे गट आहे; पण तेथे राज्य भाजपचे आहे. भाजपचा यात कुठपर्यंत हात आहे हे मला माहित नाही. शिंदे यांचे एक वक्तव्य होते की, एका सशक्त राष्ट्रीय पक्षाचा आम्हाला पाठिंबा आहे असे ते म्हणाले भाजपशिवाय तो पक्ष असूच शकत नाही असेही ते म्हणाले.

शिवसेनेची मॅच फिक्सिंग नाही

पवार म्हणाले की, आमचा पाठिंबा उद्धव ठाकरे यांच्या नैतृत्वातील शिवसेनेला आहे. बंडखोर आमच्यासोबत दोन वर्षे चांगले काम करीत होते; पण त्यांची नाराजी कुणावर आहे हे मी सांगू शकत नाही. बंडखोरांना पोलिसांचे संरक्षण आधीच दिलेले आहे. शिवसेना मॅच फिक्सींग करीत आहे का या प्रश्नावर पवार म्हणाले की, जर तसे असते तर जिल्ह्या-जिल्ह्यात मोठ्या संख्येने मेळावे झाले असते का? आम्ही ओढाताण का करतोय? असे सांगत त्यांनी अप्रत्यक्ष तशी कोणतीही शक्यता नसल्याचे स्पष्ट केले.

आज ना उद्या राजीनामे घेणारच

पवार म्हणाले, आम्ही आमची जबाबदारी पार पाडतोय, पण बंडखोर आमदार जेव्हा परततील तेव्हा काय होईल हे पाहावे लागेल. बंडखोरांनी सांगितले होते की, आम्ही राष्ट्रवादीमुळे नाराज आहोत पण आज ना उद्या मंत्र्यांचे राजीनामे घेतले जातील ते काम मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे आहे.

ठाकरेंचाच विजय होणार

पवार म्हणाले, शिवसेना संर्घष करणारा पक्ष आहे. चाळीस लोक गेले तर त्याचा परिणाम संघटनेवर होणार नाही. शिवसैनिक चिवट आहे पुन्हा पक्ष उभा करतील. उद्धव ठाकरेंचा विजय होणार हे शरद पवार यांनी स्पष्ट केले.

जिंकण्यासाठीच लढणार

राष्ट्रपती निवडणुकीबाबत पवार यांनी भाष्य केले की, आम्ही अनेक निवडणुका पाहिल्या. राष्ट्रपती निवडणुकीत आता आमची स्थिती खूपच वाईट आहे असे नाही. दोन उमेदवारात एक जिंकतो दुसरा हरतो असे नाही, तर तिसराही उमेदवार असतो आणि त्याच्यामुळे वेगळी स्थितीही निर्माण होऊ शकते. निवडणुका जिंकण्यासाठी लढवल्या जातात. उद्या यशवंत सिन्हा राष्ट्रपती पदासाठी उमेदवारी अर्ज भरणार आहेत असेही ते म्हणाले.