आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराकाँग्रेस नेते अधीर रंजन चौधरी यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याविषयी केलेल्या वादग्रस्त विधानाविषयी माफी मागितली आहे. त्यांनी या प्रकरणी थेट मुर्मूंना पत्र लिहून माफी मागितली आहे. 'मी चुकून तुमच्यासाठी चुकीचा शब्द वापरला. माझी जीभ घसरली. मी माफी मागतो. माफीचा स्वीकार करा,' असे चौधरींनी आपल्या माफीनाम्यात म्हटले आहे.
अधीर रंजन चौधरींनी बुधवारी राजधानीतील विजय चौकात निदर्शने करताना राष्ट्रपती मुर्मूंसाठी 'राष्ट्रपत्नी' या वादग्रस्त शब्दाचा वापर केला होता. सत्ताधारी भाजपच्या खासदारांनी या प्रकरणी काँग्रेसची कोंडी केली होती. तसेच अधीर व काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या माफीचीही मागणी केली होती.
अधीर यांना महिला आयोगाची नोटीस
या प्रकरणी राष्ट्रीय महिला आयोगाने अधीर यांना नोटीस बजावली आहे. आयोगाने 3 ऑगस्ट दुपारी साडेअकरा वाजेपर्यंत त्यांचा खुलासा मागवला आहे. या प्रकरणी मध्य प्रदेशाच्या डिंडोरीमध्ये भाजप कार्यकर्त्याच्या तक्रारीच्या आधारावर अधीर रंजन चौधरींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अधीर रंजन काय म्हणाले होते?
अधीर रंजन यांना बुधवारी पत्रकारांनी संसदेबाहेर गाठले. त्यावेळी त्यांना तुम्हाला राष्ट्रपती भवनात जाऊ देण्यात आले नाही, असा प्रश्न विचारण्यात आला. त्याला उत्तर देताना ते म्हणाले -मी आजही राष्ट्रपती भवनात जाण्याचा प्रयत्न करेल. भारताच्या राष्ट्रपत्नी सर्वांसाठी आहेत. आमच्यासाठी का नाहीत.
गुरुवारी या प्रकरणी वाद वाढल्यानंतर चौधरींनी आपल्या विधानाप्रकरणी माफी मागण्याची घोषणा केली होती. ते म्हणाले होते -हिंदी माझी मातृभाषा नाही. माझी जीभ घसरली. मला फाशी द्या. सत्ताधारी पराचा कावळा करण्याचा प्रयत्न करत आहे. मी राष्ट्रपतींना भेटण्याची वेळ मागितली आहे. मी फक्त त्यांचीच माफी मागेन, ढोंगी लोकांची नाही.
प्रथमच भाजपमुळे संसदेचे कामकाज ठप्प
चालू अधिवेशनात महागाई व जीएसटीच्या मुद्द्यावरून विरोधक सातत्याने गदारोळ करत आहेत. 18 जुलैपासून सुरू झालेल्या पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी महागाईवरून राज्यसभेत गदारोळ झाला. त्यानंतर दोन्ही सभागृहांचे कामकाज 19 जुलैपर्यंत तहकूब करण्यात आले.
20 जुलै रोजी लोकसभेचे कामकाज आधी दुपारी 4 वाजेपर्यंत, नंतर दिवसभरासाठी तहकूब करण्यात आले. त्यानंतर जीएसटीवरून झालेल्या गदारोळामुळे राज्यसभेचे कामकाजही दुपारनंतर दिवसभरासाठी तहकूब करण्यात आले. या आठवड्यात संसदेत गदारोळ केल्याप्रकरणी लोकसभा व राज्यसभेच्या 27 खासदारांना निलंबित करण्यात आले आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.