आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

संजय राऊत यांची माहिती:आदित्य ठाकरे यांचा 10 जूनला अयोध्येचा दौरा, शिवसैनिक व मंत्रिमंडळातील काही नेतेही जाणार

9 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्याबाबत आज शिवसेना नेते संजय राऊत यांनी महत्त्वपूर्ण घोषणा केली. आदित्य ठाकरे 10 जूनला अयोध्येला जातील, अशी माहिती संजय राऊत यांनी दिली आहे.

आदित्य ठाकरे यांचा अयोध्या दौरा राजकीय नसेल. प्रभू श्री राम यांचे दर्शन घेण्यासाठीच त्यांचा हा दौरा असेल, असेही संजय राऊत यांनी स्पष्ट केले. तसेच, या दौऱ्याची तयारी सुरू झाली असून आदित्य ठाकरे यांच्यासोबत राज्यातीलच नव्हे तर देशभरातील शिवसैनिकही मोठ्या संख्येने या दौऱ्याला जातील. मंत्रिमंडळातील काही नेतेही त्यांच्यासोबत उपस्थित असतील, अशी माहिती संजय राऊत यांनी दिली.

युपीत शिवसेना Vs मनसे
दरम्यान, मनसेप्रमुख राज ठाकरेदेखील 5 जूनला अयोध्या दौऱ्यावर जाणार आहेत. त्यामुळे युपीत आतापासून आदित्य ठाकरे विरुद्ध राज ठाकरे अशी वातावरण निर्मिती केली जात आहे. आदित्य ठाकरेंच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर 'असली आ रहा है, नकली से सावधान!' , असे बॅनर लावण्यात आले आहे. राज ठाकरेंना प्रत्युत्तर म्हणून शिवसेनेनेच हे बॅनर लावल्याचे बोलले जात आहे. याबाबत संजय राऊत यांनी प्रश्न विचारला असता हे बॅनर कोणी लावले हे आपल्याला माहित नाही, असे उत्तर त्यांनी दिले. मात्र, शिवसेनेचे हिंदुत्व हे असली असल्याचा टोलाही त्यांनी लगावला.

राज ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्याला भाजप खासदार ब्रिजभूषण सिंग यांनी विरोध केला आहे. त्यावर तो त्यांचा प्रश्न आहे. प्रत्येकाचे काही ना काही राजकारण असते, असे उत्तर संजय राऊत यांनी दिले.

आता क्रूरतेची व्याख्या बदलावी लागेल!
नवनीत राणा यांना तुरुंगात हिन वागणूक दिली गेली. ठाकरे सरकार नवनीत राणांशी क्रोर्याने वागले, असा आरोप विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. त्यालाही संजय राऊत यांनी प्रत्युत्तर दिले. आता क्रोर्याची व्याख्याच बदलावी लागेल. देशात मोदी सरकारच्या काळात 7 वर्षे कित्येकांना तुरुंगात डांबले गेले, सुनावणीअभावी कित्येकजण तुरुंगात खितपत पडले आहेत, ही क्रुरता नाही का, असा सवाल संजय राऊत यांनी केला.

बातम्या आणखी आहेत...