आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • Ahmednagar Parner Shiv Sena Workers Write To CM Uddhav Thackeray Demand Expulsion Of Ex MLA Vijay Auti

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

पारनेरचे नाराजी नाट्य:राष्ट्रवादीतून पुन्हा शिवसेनेते परतलेले नगरसेवक अजुनही नाराज; मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून माजी आमदाराच्या हकालपट्टीची मागणी

अहमदनगर10 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
फाइल फोटो - Divya Marathi
फाइल फोटो
  • विजय औटींची हकालपट्टी करा, निष्ठावान शिवसैनिकांकडे धुरा सोपवा; पत्रातून मागणी

राज्यभर गाजलेल्या पारनेरच्या नगरसेवकांचे प्रकरण अजुनही मिटलेले नाही. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवारांनी शिवसेनेचे नगरसेवक फोडून त्यांना राष्ट्रवादीत सामिल करून घेतले. प्रकरण मुख्यमंत्री व शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरेंपर्यंत गेले. राष्ट्रवादी अध्यक्ष शरद पवार आणि ठाकरेंमध्ये चर्चा झाल्यानंतर या नगरसेवकांची पुन्हा शिवसेनेत घरवापसी देखील झाली. परंतु, या नगरसेवकांनी आता थेट मुख्यमंत्र्यांना एक पत्र लिहून आपली व्यथा मांडली. तसेच शिवसेनेत केवळ निष्ठावान लोकांना धुरा सोपवून बाकीच्या लोकांची हकालपट्टी करा अशी मागणी केली आहे.

शिवसेनेचे माजी आमदार विजय औटी यांची पक्षातून हकालपट्टी करावी, अशी थेट मागणी या पत्रातून करण्यात आली आहे. “माजी आमदार विजय औटी यांच्यामुळे पक्ष संपण्याची चिन्हं आहेत. त्यांची पक्षातून हकालपट्टी करुन निष्ठावान शिवसैनिकाकडे धुरा सोपवावी, अन्यथा तालुक्यात एकही शिवसैनिक शिल्लक राहणार नाही.” असे या नगरसेवकांनी मांडले आहे.
औटी यांच्यावर रोष

विधानसभेची निवडणूक झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे नीलेश लंके हे आमदार म्हणून विजयी झाले. शिवसेनेचे उमेदवार विजय औटी यांचा 60 हजार मतांनी पराभव झाला. नगरपंचायतीच्या कारभाराबाबत औटी यांनी नेहमीच स्वयंकेंद्रीत राजकारण केल्यामुळे गेल्या साडेचार वर्षात शहरात काहीही विकास होऊ शकला नाही. नगर पंचायत स्थापन झाल्यानंतर अडीच वर्षे शिवसेनेच्या ताब्यात सत्त्ता होती. नगरविकास खात्याकडे मोठा निधी असूनही औटी यांनी नगरपंचायतीस जाणीवपूर्वक निधी उपलब्ध करुन दिला नाही. अडीच वर्षांनंतर नगराध्यक्ष निवडीच्या वेळी काही नगरसेवक नाराज होते. त्याची कल्पना आ. औटी यांना होती. तरीही औटी यांनी त्या नगरसेवकांना रोखले नाही. परिणामी नगरपंचायतीची सत्ता शिवसेनेच्या हातून गेली. पारनेरचे पहिले आमदार कम्युनिस्ट पक्षाचे भास्कराव औटी यांचे विजय औटी हे चिरंजीव आहेत. त्यामुळे त्यांची विचारसरणीही आजही डावीच आहे. 1985 मध्ये औटी यांनी समाजवादी काँग्रेसकडून निवडणूक लढवली, त्यात ते पराभूत झाले. पुढे काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून राजकरण करताना त्यांनी नेहमीच शिवसैनिकांना शिव्यांच्या लाखोल्या वाहिल्या.
काँग्रेसकडून विधानसभेची उमेदवारी मिळणे दुरापास्त असल्याने औटी यांनी स्वतःच्या स्वार्थासाठी 2004 मध्ये शिवसेनेत प्रवेश केला. शिवसैनिकांच्या जीवावर औटी विजयी झाले व त्यानंतर त्यांनी शिवसैनिकांना पुन्हा विचारलेच नाही. काही काम घेऊन गेलेल्या शिवसैनिकांना त्यांनी नेहमीच अपमानित केले. त्याउलट खुशमस्करी करणाऱ्या, शिवसेनेशी निष्ठा नसणाऱ्याना त्यांनी नेहमीच सन्मान दिला, पदे दिली. कम्युनिष्ट, काँग्रेस विचारसरणीला पाठबळ दिले. जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणूकीत कम्युनिष्ट, काँग्रेस उमेदवारांना उमेदवाऱ्या दिल्या. शिवसैनिकांना वाऱ्यावर सोडून दिले. 2004 मध्ये शिवसेनेचा आमदार झाला. तेव्हापासून आजपर्यंत औटी यांनी शिवसेनेची एकही शाखा उघडू दिली नाही. तालुकाप्रमुख नीलेश लंके यांनी शाखा सुरु करण्याची भूमिका घेतल्यावर त्यांनाही अपमानित करण्यात आले. शिवसेना पक्ष वाढवण्याऐवजी स्वतःच्या नातेवाईकांना बळ देण्यासाठी इतर पक्ष जिवंत कसे राहतील याची त्यांनी जाणीवपूर्वक काळजी घेतली.
लंकेंचे केले तोंडभर कौतुक

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या अस्थी तालुक्यात आल्या असता विजय औटी हे दर्शनालाही आले नाहीत. शिवसैनिकांचे श्रद्धास्थान शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त त्यांनी कधीही उपक्रम राबवले नाहीत. औटी हे संघटना स्वतःच्या आखत्यारित राहण्यासाठी नेहमीच प्रयत्नशील होते. शाखा सुरु करण्यास औटी हे विरोध करत असल्याने तालुकाप्रमुख नीलेश लंके यांनी मात्र तालुक्यात शिवसैनिकांचे संघटन टिकवून ठेवले. औटी हे शिवसैनिकांना झिडकारत असताना नीलेश लंके यांनी शिवसैनिकांच्या प्रत्येक अडचणीस धावून जात मदत केली असे म्हणत नगरसेवकांनी लंके यांचे तोंडभर कौतुक केले. पत्र लिहिणाऱ्यांमध्ये उमाताई नरहरी बोरुडे, डॉ. मुदस्सिर रफीक सय्यद, नंदकुमार गणपतराव देशमुख, किसन भिमाजी गंधाडे, वैशाली आनंदा औटी आणि नंदा साहेबराव देशमाने यांचा समावेश आहे.

बातम्या आणखी आहेत...