आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामाजी केंद्रीय मंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पंडीत सुखराम यांचे निधन झाले आहे. वयाच्या 95 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. नातू आश्रय शर्मा यांनी मंगळवारी रात्री सोशल मीडियावरुन पंडित सुखराम यांच्या निधनाची माहिती दिली. गेल्या काही दिवसांपासून ते आजारी असल्याने त्यांना नवी दिल्ली येथील ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस (एम्स) मध्ये दाखल करण्यात आले होते. रुग्णालयात त्यांच्यावर ब्रेन स्ट्रोकचा उपचार सुरू होता. गुरुवारी त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केले जाणार आहे. पंडीत सुखराम यांचे पार्थिव गुरुवारी सकाळी 11 वाजता मंडी शहरातील ऐतिहासिक सेरी मंचावर अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. त्यानंतर त्यांच्या पार्थिवावर हनुमानघाट येथील स्मशानभूमीत शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
सुखराम यांचे नातू आश्रय शर्मा यांनी बुधवारी सकाळी त्यांच्या सोशल मीडियावरून सुखराम यांच्या मृत्यूची माहिती दिली, “एक युगाचा अंत. अलविदा दादा जी अबी नही बजेगी फोन की घंटा" अशी पोस्ट आश्रय शर्मा यांनी केली आहे.
सुखराम यांचा जन्म 27 जुलै 1927 रोजी मंडी जिल्ह्यातील कोटली गावात झाला. 1962 मध्ये ते हिमाचल प्रदेशमधील प्रादेशिक परिषदेचे सदस्य बनले. त्यांनी 1993 ते 1996 या काळात केंद्रीय दळणवळण आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री म्हणून काम केले होते. ते हिमाचल प्रदेशातील मंडी मतदारसंघातून लोकसभेचे सदस्य होते. त्यांनी पाच वेळा विधानसभा आणि तीन वेळा लोकसभा निवडणूक जिंकली होती. 2011 मध्ये आणि 1996 मध्ये दळणवळण मंत्री असताना त्यांना भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली पाच वर्षांची शिक्षा झाली होती.
सुखराम यांनी 1963 ते 1996 या काळात मंडी विधानसभेचे प्रतिनिधित्व केले होते. ते 1984 मध्ये लोकसभेवर निवडून आले आणि राजीव गांधी सरकारमध्ये त्यांनी कनिष्ठ मंत्री म्हणून काम केले. त्यांनी संरक्षण उत्पादन आणि पुरवठा, नियोजन आणि अन्न व नागरी पुरवठा राज्यमंत्री म्हणून काम पाहिले होते. 1993 ते 1996 या काळात ते केंद्रीय राज्यमंत्री होते.
सुखराम यांनी 1996 मध्ये मंडी लोकसभेची जागा जिंकली, परंतु 1996 मध्ये दूरसंचार घोटाळ्यानंतर त्यांना त्यांचा मुलगा अनिल शर्मा यांच्यासह काँग्रेसमधून काढून टाकण्यात आले. 1998 मध्ये त्यांनी हिमाचल विकास काँग्रेसची स्थापना केली आणि भाजपसोबत निवडणूकोत्तर युती केली. हिमाचल विधानसभा निवडणुकीनंतर ते सरकारमध्ये सहभागी झाले.
1998 मध्ये त्यांनी मंडी सदरमधून विधानसभा निवडणूक लढवली होती आणि मोठ्या मताधिक्याने विजयी झाले होते. त्यांचा मुलगा अनिल शर्मा 1998 मध्ये राज्यसभेवर निवडून आला. 2003 च्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी मंडी विधानसभेची जागा राखली पण 2004 च्या लोकसभा निवडणुकीच्या रनअपमध्ये त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.