आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नागालँडमध्ये विरोधी पक्षच नाही:भाजप सरकारमध्ये सर्व पक्ष सामील; राष्ट्रवादी काँग्रेसच्या 7 आमदारांचाही पाठिंबा

आगरतळा17 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • त्रिपुरात भाजपच्या साहा मंत्रिमंडळाचा शपथविधी

७० वर्षीय भाजप नेते माणिक साहा यांनी बुधवारी त्रिपुराचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. साहा यांच्यासोबत रतनलाल नाथ, प्रणजितसिंग रॉय, संताना चकमा, टिंकू रॉय आणि बिकाश देबर्मा यांना राज्यपाल सत्यदेव नारायण आर्य यांनी शपथ दिली. या शपथविधी सोहळ्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा, भाजप अध्यक्ष जे. पी. नड्डा तसेच आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिस्वा सरमा यांची खास उपस्थिती होती.

नागालँडमध्ये विरोधी पक्षच नाही :
ईशान्येकडील त्रिपुरासह नागालँड व मेघालयात भाजपचे सरकार सत्तेत आले आहे. मेघालय-नागालँड सरकारचे मंगळवारी शपथविधी झाले. नागालँडमध्ये नेईफिऊ रिओ यांच्या नेतृत्वाखाली सर्वपक्षीय सरकार सत्तेवर आले. राजधानी कोहिमात मंगळवारी रिअो यांचा शपथविधी झाला. मुख्यमंत्रिपदाची ही त्यांची पाचवी वेळ आहे. रिओ सरकारमध्ये २ उपमुख्यमंत्री असून यात नॅशनॅलिस्ट डेमोक्रॅटिक प्रोग्रेसिव्ह पार्टीचे (एनडीपीपी) टी. आर. झेलियांग व भाजपचे वाय. पट्टन यांचा समावेश आहे. एनडीपीपी व भाजपच्या युती सरकारला नागालँडमधील सर्वच पक्षांनी पाठिंबा दिला असून यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या ७ आमदारांचाही समावेश आहे. याशिवाय रिपाइंचे (आठवले गट) २ व नागा पीपल्स फ्रंट, बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांचा जनता दल युनायटेड आणि अपक्ष आमदारांनीही एनडीपीपी-भाजप सरकारला पाठिंबा दिला आहे.

महाराष्ट्रात राजकीय वैर, नागालँडमध्ये मैत्री :
महाराष्ट्रात विरोधात असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसने नागालँडमध्ये एनडीपीपी-भाजप युती सरकारला पाठिंबा दिल्याने राजकीय निरीक्षकांनी भुवया उंचावल्या आहेत. राष्ट्रवादीप्रमाणेच जदयूचे एकमेव आमदार तथा नागालँडचे प्रदेशाध्यक्ष सेंच्युनो एनएसएन लोथा यांनी नागालँड सरकारला पाठिंबा दिल्याने बिहारमध्ये मुख्यमंत्री नितीशकुमार यांची कोंडी झाली. शिस्तभंगाचा ठपका ठेवत नितीशकुमार यांनी नागालँडची प्रदेश कार्यकारिणी बरखास्त केली आहे.

साहा यांना दुसऱ्यांदा संधी :
साहा यांच्यासोबत आणखी ८ मंत्र्यांचाही शपथविधी झाला. त्यापैकी ५ नवे चेहरे आहेत. मंत्रिमंडळात भाजपचे ८ मंत्री असून एक आयपीएफटी या मित्रपक्षातील आहेत. ६० सदस्यीय विधानसभेत भाजपने ३२ जागा जिंकून निर्विवाद बहुमत मिळवले आहे. आयपीएफटीला एक जागा मिळाली. माणिक साहा यांना दुसऱ्यांदा मुख्यमंत्रिपदाची संधी मिळाली आहे. गतवर्षी २०२२ मध्ये त्रिपुरातील कायदा-सुवव्यवस्था बिघडल्याने देब यांची लोकप्रियता घटल्याचे लक्षात येताच भाजपने मंत्रिमंडळात फेरबदल केले होते. तत्कालीन मुख्यमंत्री बिप्लबकुमार देब यांना हटवून साहा यांची मुख्यमंत्रिपदी वर्णी लागली होती.

पाठिंबा नागालँडच्या मुख्यमंत्र्यांना, भाजपला नव्हे : शरद पवार
राष्ट्रवादी काँग्रेसने नागालँडचे मुख्यमंत्री नेईफिऊ रिओ यांना पाठिंबा दिला असून भाजपला दिलेला नाही, अशी मखलाशी राष्ट्रवादीचे पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी केली आहे. ते म्हणाले की, विधानसभा निवडणुकीच्या काळात त्या ठिकाणच्या मुख्यमंत्र्यांना आमचा पाठिंबा होता. त्यामुळे भाजपसोबत युती केली नाही.

बातम्या आणखी आहेत...