आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराभाजप नेते किरीट सोमय्या यांनी २०१४ साली विक्रांत युद्धनौका वाचवण्यासाठी पैसे गोळा करण्याची मोहीम सुरू केली होती. या मोहिमेत ५७ कोटी रुपयांची रक्कम जमा झाली. ही रक्कम किरीट सोमय्या यांनी लाटली. हा पैसा त्यांनी २०१४ ची निवडणूक लढवण्यासाठी आणि त्यांच्या निकॉन इन्फ्रा कंपनीत वळवला. हा घोटाळा करून सोमय्या यांनी देशाच्या संरक्षणव्यवस्थेशी, राष्ट्रीय भावनेशी प्रतारणा केली आहे. त्यामुळे किरीट सोमय्या यांच्यावर राष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल करून त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे, अशी मागणी संजय राऊत यांनी केली. ते बुधवारी (६ एप्रिल) दिल्लीत आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.
या वेळी संजय राऊत यांनी आयएनएस विक्रांत युद्धनौकेच्या मुद्द्यावरून किरीट सोमय्यांवर गंभीर आरोप केले. विक्रांत युद्धनौका भंगारात काढण्याचा निर्णय झाला तेव्हा किरीट सोमय्या यांनी राज्य सरकारवर टीका केली होती. महाराष्ट्र सरकारला राष्ट्रीय भावना नाही, असे टीकास्त्र त्यांनी सोडले होते. राज्य सरकारला विक्रांत युद्धनौका वाचवता येत नसेल तर आम्ही त्यासाठी पैसा जमा करू, असे किरीट सोमय्या यांनी म्हटले होते. त्यानंतर किरीट सोमय्या यांच्या नेतृत्वाखाली ‘सेव्ह विक्रांत’ या उपक्रमांतर्गत पैसे जमवण्यास सुरुवात झाली. चर्चगेटपासून अंबरनाथपर्यंतच्या रेल्वेस्थानकांवर किरीट सोमय्या यांच्या लोकांनी डबे फिरवून पैसे गोळा केले. या माध्यमातून ५७ कोटी रुपयांचा निधी जमा झाला होता.
राजभवनात पैसे गेले नाहीत
गोळा केलेली ही रक्कम आपण राजभवनाकडे सुपूर्द करू, असे सोमय्या यांनी सांगितले होते. मात्र, माहिती अधिकारांतर्गत राजभवन कार्यालयाला तशी विचारणा केली तेव्हा आमच्याकडे असे कोणतेही पैसे जमा झाले नसल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे हे पैसे कुणाच्या घशात आणि खिशात गेले, असा सवाल संजय राऊत यांनी उपस्थित केला. सोमय्या हे सीए असल्यामुळे असा पैसा कसा पचवायचा याची त्यांनी माहिती असल्याचेही राऊत यांनी स्पष्ट केले आहे.
संजय राऊत यांनी पुरावा म्हणून क्लिप दिलीय : वळसे पाटील
आयएनएस विक्रांत या मोडीत निघालेल्या युद्धनौकेबद्दल राऊतांनी केलेल्या आरोपाची राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनीही दखल घेतली. माध्यमांशी बोलताना दिलीप वळसे-पाटील म्हणाले, “संजय राऊत यांनी एक क्लिप आणि एक स्टेटमेंट प्रसिद्ध केले आहे. आयएनएस विक्रांतसाठी सोमय्या यांनी निधी गोळा केला होता. तो सरकारपर्यंत पोहोचला नाही. ही रक्कम ५२ कोटींच्या आसपास आहे. या प्रकरणात पोलिस विभाग चौकशी करेल,” अशी माहिती त्यांनी दिली.
एसआयटी स्थापन करा, मी चाैकशीला तयार : सोमय्या
किरीट सोमय्या यांनी आरोप फेटाळले आहेत. या आरोपांची चौकशी करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी एसआयटी स्थापन करावी, आपण त्या चौकशीला सामोरे जाऊ, असे ते म्हणाले. तसेच विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सोमय्या यांची पाठराखण केली. राऊत यांनी याप्रकरणी पुरावे द्यावेत, असे फडणवीस म्हणाले.गृहमंत्री वळसे पाटील म्हणाले, पोलिस सखाेल चौकशी करतील
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.