आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराजम्मू-काश्मीर प्रशासनाने जूनच्या अखेरीस सुरू होणारी अमरनाथ यात्रा भाविकांसाठी अधिक सुरक्षित करण्यासाठी नियाेजन सुरू केले आहे. १४ ते १८ किलोमीटरच्या यात्रेच्या पदयात्रा मार्गावर या वेळी सुमारे १५ ‘नो स्टे झोन’ करण्यात येणार आहेत. भूस्खलनप्रवण म्हणून ओळखल्या गेलेल्या या क्षेत्रामध्ये तंबू, दुकाने आणि लंगर उभारण्यास परवानगी दिली जाणार नाही. सुमारे दोन महिने चालणाऱ्या या प्रवासाच्या मार्गातील परिस्थितीनुसार ‘नो स्टे झोन’ची संख्या वाढवता येईल. गेल्या वर्षी अमरनाथ यात्रेसाठी ३.६५ लाख भाविक आले होते. गेल्या सहा वर्षांतील ही विक्रमी संख्या होती. या वेळीही विक्रमी संख्येने प्रवासी येतील, असा अंदाज आहे. गेल्या वर्षी जुलैमध्ये अमरनाथ गुहेजवळील छावणीत भूस्खलनामुळे १७ यात्रेकरू ढिगाऱ्याखाली गाडले गेले होते. भूस्खलन आणि अचानक पूर या धाेक्यांना सामाेरे जाण्यासाठी खबरदारी न घेतल्याबद्दल आणि मोठ्या प्रमाणात दुकाने आणि तंबू उभारण्यास परवानगी दिल्याबद्दल टीका झाली हाेती.
पादचारी पूल उभारणार; कुंपण, मार्ग उतारांचीही दुरुस्ती हाेणार
अमरनाथ यात्रेच्या मार्गावर या वेळी आणखी पादचारी पूल बांधण्यात येणार आहेत. कुंपण दुरुस्त करण्यात येत आहे. जोखमीचा मार्ग मानला जाणारा उतार मजबूत केला जात आहे. जम्मू-काश्मीरचे मुख्य सचिव अरुणकुमार मेहता यांनी दिलेल्या माहितीनुसार, सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशांनुसार व्यवस्था करण्यात येत आहे.
सुरक्षित यात्रेसाठी या उपाययाेजना....
{अमरनाथ यात्रेच्या मार्गावरील बर्फ हटवण्याचे काम १५ मार्चपासून सुरू होणार आहे. एप्रिलअखेर संपूर्ण यात्रा मार्गावरील बर्फ हटवला जाईल.
{सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून प्रत्येक प्रवासी आणि वाहनांचे रेडिओ फ्रिक्वेन्सी टॅगिंग केले जाईल. याद्वारे त्यांचे अचूक लोकेशन ट्रॅक करता येते.
{कोणत्याही दहशतवादी हल्ल्याची शक्यता पाहता यात्रेकरूंच्या प्रत्येक तुकडीसोबत पोलिस, केंद्रीय राखीव पाेलिस दल आणि इतर सुरक्षा दलांची पथके तैनात करण्यात येतील.
सल्ला : प्राणायामाचा करा सराव
यात्रा बोर्डाच्या सल्ल्यानुसार, प्रवाशांनी यात्रा सुरू होण्याच्या एक महिना आधी प्राणायामाचा सराव सुरू करावा. १५,००० फूट उंचीवर प्रवास करण्यासाठी तंदुरुस्ती आवश्यक आहे. दररोज सकाळी आणि संध्याकाळी पाच ते सहा किलोमीटर चालले पाहिजे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.