आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

आंबेडकर जयंती 2020:आज भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती, बाबासाहेबांशी संबंधित या 7 गोष्टी जाणून घ्या

नवी दिल्लीएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्वतंत्र भारताचे पहिले कायदेमंत्री होते

भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ.भीमराव रामजी आंबेडकर यांची आज जयंती. भारतासह जगभरात त्यांची जयंती उत्साहात साजरी केली जाते. बाबासाहेब म्हणून प्रसिद्ध असलेले भारतरत्न आंबेडकर यांनी आयुष्यभर समानतेसाठी संघर्ष केला. यामुळे भीम जयंती भारतात 'समानता दिवस' आणि 'ज्ञान दिवस'च्या स्वरुपात साजरी केली जाते. जाणून घ्या त्यांच्याविषयी या सात गोष्टी 

1. डॉ. बाबासाहेब आंबडेकर यांच्या जन्म 14 एप्रिल 1891 रोजी मध्यप्रदेशातील एका छोट्या गावात झाला होता. त्यांचे कुटुंब मराठी होते आणि ते मूळचे महाराष्ट्रातील रत्नागिरी जिल्ह्यातील आंबडवे गावचे होते. त्यांच्या वडिलांचे नाव रामजी मालोजी सकपाळ आणि आईचे नाव भीमाबाई होते. आंबेडकर जातीने महार होते. या जातीच्या लोकांना समाजात अस्पृश्य मानले जात होते आणि त्यांच्यासोबत भेदभाव केला जात असे. बाबासाहेब लहानपणापासूनच हुशार होते पण जातीय अस्पृश्यतेमुळे त्यांना प्राथमिक शिक्षण घेताना अडचणींचा सामना करावा लागला. शाळेत त्यांचे आडनाव त्यांच्या गावच्या नावाच्या आंबेडवेकर यांच्या आधारे लिहिलेले होते. शाळेतील एका शिक्षकाचे बाबासाहेबांवर खूप प्रेम होते आणि त्यांनी त्यांचे उपनाव आंबडवेकरला सोपे करत आंबेडकर केले. 

2. भीमराव आंबेडकर हे मुंबईतील एल्फिन्स्टन रोडवरील शासकीय शाळेचे पहिले अस्पृश्य विद्यार्थी ठरले. 1913 मध्ये भीमराव यांची निवड अमेरिकेच्या कोलंबिया विद्यापीठात शिक्षण घेण्यासाठी झाली होती. तेथे त्यांनी राज्यशास्त्रात पदवी घेतली. 1916 मध्ये एका शोधासाठी पीएचडीने सन्मानित केले गेले. आंबेडकरांना लंडनहून अर्थशास्‍त्रात डॉक्टरेट व्हायचे होते मात्र स्कॉलरशिप संपल्यमुळे त्यांना शिक्षण अर्ध्यातूनच सोडून भारतात परतावे लागले. यानंतर त्यांनी कधी ट्यूटर तर कधी कन्सल्टिंगचे काम सुरू केले. परंतु सामाजिक भेदभावामुळे त्यांना यश मिळाले नाही. त्यानंतर त्यांची मुंबईतील सिडनेम कॉलेजमध्ये प्राध्यापक म्हणून नियुक्ती झाली. 1923 मध्ये त्यांनी 'The Problem of the Rupee' नावाने आपला शोध पूर्ण केला आणि लंडन विद्यापीठाने त्यांना डॉक्टर्स ऑफ सायन्स ही उपाधी दिली. 1927 मध्ये कोलंबिया विद्यापीठाने देखील त्यांना पीएचडी प्रदान केली.  

3. डॉ. भीमराव आंबेडकर यांनी समाजातील दलित समुदायाला समानता देण्यासाठी आयुष्यभर संघर्ष केला. त्यांनी दलित समुदायासाठी एका वेगळ्या राजकीय ओळखीची वकिली केली ज्यामध्ये काँग्रेस आणि ब्रिटिश दोघांचाही हस्तक्षेप नसावा. 1932 मध्ये ब्रिटिश सरकारने आंबेडकरांच्या स्वतंत्र मतदारांच्या प्रस्तावाला मंजुरी दिली होती. मात्र महात्‍मा गांधींनी याविरोधात आमरण उपोषण सुरु केले होते. यानंतर आंबेडकरांनी आपली मागणी परत घेतली. त्या बदल्यात, दलित समाजाला जागांमध्ये आरक्षण आणि मंदिरात प्रवेश करण्याच्या अधिकारासह अस्पृश्यता रद्द करण्याची बाब मान्य केली. 

4. आंबेडकरांनी 1936 मध्ये स्वतंत्र कामगार पक्षाची स्थापना केली.  या पक्षाने 1937 च्या केंद्रीय विधानसभा निवडणुकीत 15 जागांवर विजय मिळवला होता. महात्मा गांधींनी दलित समाजाला हरिजन म्हणून संबोधत असत. मात्र आंबेडकरांनी यावर कडक टीका केली. 1941 आणि 1945 दरम्यान त्यांनी अनेक विवादीत पुस्तके लिहिली. ज्यामध्ये 'थॉट्स ऑन पाकिस्तान' आणि 'व्हॉट काँग्रेस अॅण्ड गांधी हॅव डन टू द अनटचेबल्‍स' पुस्तकांचा समावेश आहे. 

5. डॉ भीमराव आंबेडकर हे प्रचंड विद्वान होते. त्यामुळे आपले विवादास्‍पद विचार आणि काँग्रेस व महात्मा गांधींवर टीका केल्यानंतरही त्यांची स्वतंत्र भारताचे पहिले कायदेमंत्री म्हणून निवड केली होती. इतकेच नव्हे तर 2 ऑगस्ट 1947 रोजी आंबेडकरांना भारतीय संविधान मसुदा समितीचे अध्यक्ष म्हणून नियुक्त केले गेले. बाबासाहेब आंबेडकरांनी 1952 मध्ये अपक्ष म्हणून लोकसभा निवडणूक लढवली होती. मात्र त्यात त्यांचा पराभव झाला. मार्च1952 मध्ये त्यांची राज्यसभेवर नियुक्ती झाली आणि नंतर ते मृत्यूपर्यंत या सभागृहाचे सदस्य राहिले.

6. डॉ.भीमराव आंबेडकर यांनी 14 ऑक्टोबर 1956 रोजी नागपुरमध्ये एका औपचारिक सार्वजनिक कार्यक्रमाचे आयोजन केले. या कार्यक्रमात त्यांनी श्रीलंकेचे महान बौद्ध भिक्षु महत्थवीर चंद्रमणी यांच्याकडून पारंपरिक पद्धतीने त्रिरत्न आणि पंचशील स्वीकारून बौद्ध धर्म स्वीकारला. आंबेडकरांनी 1956 मध्ये बौद्ध धर्मावर आपले शेवटचे पुस्तक लिहिले होते. त्याचे नाव होते 'द बुद्ध अॅण्ड हिज धम्म.' त्यांच्या मृत्यूनंतर हे पुस्तक 1957 मध्ये प्रकाशित झाले होते.

7. डॉ. आंबेडकरांना मधुमेहाचा त्रास होता. 'बुद्ध अँड हिज धम्म' हे त्यांचे शेवटचे पुस्तक संपल्यानंतर तीन दिवसांनी 6 डिसेंबर 1956 रोजी दिल्लीत त्यांचे निधन झाले. मुंबईत बौद्ध रीति-रिवाजानुसार त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या अंत्यसंस्काराच्या वेळी त्यांना साक्षी मानत सुमारे 10 लाख समर्थकांनी बौद्ध धर्माची दीक्षा घेतली होती. 

बातम्या आणखी आहेत...