आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराअरुणाचलच्या तवांग क्षेत्रात घुसखोरीच्या प्रयत्नामध्ये तोंडावर आपटल्यानंतरही चीन शांत बसलेला नाही. प्रत्यक्ष नियंत्रण रेषेपासून (एलएसी) केवळ १५५ किमी दूर चीनने आपल्या ताब्यातील तिबेटच्या शिगात्से हवाई तळावर लढाऊ विमाने व ड्रोनची जमवाजमव केली आहे. एलएसीजवळ चीन सातत्याने लष्करी संरचनेत वाढ करत असल्याचा गाैप्यस्फाेट अमेरिकन संरक्षण मंत्रालय पेंटागॉनचे प्रेस सचिव पॅट्रिक रायडर यांनी केला. रायडर म्हणाले, चीन शेजारी देशाच्या सीमेवर आक्रमक हालचाली वाढवत आहे. अमेरिकेने आपल्या धोरणात्मक सहकाऱ्याच्या (भारत) सुरक्षेच्या मुद्द्याला नेहमीच साथ दिली आहे.
व्हाइट हाऊस प्रवक्ते कॅरीन ज्यां पेयरे प्रेस ब्रीफिंगमध्ये म्हणाले, भारत व चीन यांच्यातील एलएसीच्या मुद्द्यावरील संघर्षावर आमची नजर आहे. भारताकडून शांततेसाठी झालेले प्रयत्न कौतुकास्पद आहेत.
काँग्रेस-टीएमसीचा सभात्याग
एलएसीवरील चीनसोबतच्या संघर्षाच्या मुद्द्यावर चर्चेच्या मागणीवरून काँग्रेस-टीएमसीने बुधवारी लोकसभेतून सभात्याग केला. याच मुद्द्यावर राज्यसभेतही १७ विरोधी पक्षांनी सभात्याग केला.
शिगात्सेत दुहेरी वापराचा एअरबेस, अर्ली वाॅर्निंग सिस्टिमही
चीनने तिबेटच्या शिगात्सेमध्ये दुहेरी वापराचा एअरबेस बनवला आहे. इथे नागरी विमाने व लढाऊ विमानांची सुविधा आहे. एअरबोर्न अर्ली वाॅर्निंग सिस्टिम असलेली लढाऊ विमाने व ड्रोन येथून उड्डाण करू शकतात. शिगात्से एअरबेस अरुणाचलच्या उत्तरेत आहे. संरक्षण तज्ज्ञांनुसार, जियोलोकेशननुसार हे भारताला समोर ठेवून तयार करण्यात आले आहे.
भारताचा आजपासून पूर्व भागामध्ये सराव, लढाऊ विमानांचा समावेश
पूर्व भागांत भारतीय वायुदल (आयएएफ) १५ आणि १६ डिसेंबरला हवाई सराव करेल. यामध्ये भारतीय लढाऊ विमाने, वाहतूक विमाने, हेलिकॉप्टर व ड्रोनचा समावेश आहे. वायुदलानुसार, हा सराव पूर्वनिर्धारित कार्यक्रमानुसार केला जात आहे.
त्सेचूचे लोक चिनी सैन्यावर नाराज, पवित्र क्षेत्रात घुसखोरी अमान्य
घुसखोरी झालेल्या यांगत्से क्षेत्रातील त्सेचू गावचे लोक चिनी सैन्यावर नाराज आहेत. चिनी सैनिकांची घुसखोरी अमान्य असल्याचा त्यांचा आरोप आहे. ग्रामस्थ म्हणतात, येथील १०८ छोटे-मोठे धबधबे असलेल्या पवित्र क्षेत्राचा भारतीय लष्कर आदर करते.
सायबर दहशतवादही... एम्स सर्व्हर हॅकिंगमध्येही चीनचा हात
नवी दिल्ली एम्स सर्व्हर्सच्या हॅकिंगच्या मागेही चीनच्या हॅकर्सचा हात होता. एम्सच्या ४० फिजिकल व ६० व्हर्चुअल सर्व्हरपैकी ५मध्ये चीनच्या हॅकर्सने घुसखोरी केली. या हॅकर्सचे लोकेशन चीनच्या शिनान आणि हाँगकाँगमध्ये होते. हॅकर्स व्हीपीएन वापरत करत होते. भारतीय संस्थांनी हॅकिंग क्रॅक करत जवळपास ४ कोटी रुग्णांचा डेटा सुरक्षित ठेवण्यात यश मिळवले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.