आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Amritpal Singh Vs Punjab Police; Punjab Police Action Against Khalistani Supporter | Amritsar News | Khalistani | Amritpal Singh

पंजाब पोलिसांची मोठी कारवाई:पंजाबमध्ये 78 खलिस्तानी समर्थकांना अटक; पोलिस म्हणाले- अमृतपालचा शोध अजूनही सुरू; दुपारी आली होती अटकेची ​​​​​​​बातमी

4 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • :

पंजाब पोलिसांनी शनिवारी राज्यभरात खलिस्तान समर्थक 'वारीस पंजाब दे'शी संबंधित लोकांवर मोठी कारवाई सुरू केली. आतापर्यंत 78 जणांना अटक करण्यात आली आहे. इतर अनेकांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले आहे.

वारिस पंजाब दे प्रमुख अमृतपाल याचा शोध सुरू आहे. दुपारी अमृतपालला अटक झाल्याच्या बातम्या वेगवेगळ्या माध्यमांतून येत राहिल्या, पण संध्याकाळी पोलिसांनी प्रसिद्धीपत्रक जारी करून अमृतपालचा शोध सुरू असल्याचे सांगितले.

दरम्यान, परिस्थिती आणखी बिघडण्याच्या भीतीने पंजाबमध्ये 24 तास मोबाइल इंटरनेट सेवा बंद ठेवण्यात आली होती. राज्यात रविवारी दुपारी 12 वाजेपर्यंत मोबाईल इंटरनेट आणि बल्क एसएमएस सेवा बंद राहणार आहे. संपूर्ण पंजाबमध्ये पोलीस-प्रशासन अलर्टवर आहे.

अमृतसर, फाजिल्का, मोगा आणि मुक्तसरसह अनेक जिल्ह्यांमध्ये कलम 144 लागू करण्यात आले आहे. मात्र, 19 आणि 20 मार्च रोजी अमृतसर येथे होणारी जी-20 देशांची परिषद हे त्याचे कारण असल्याचे सांगितले जात आहे.

अमृतपालच्या सुटकेसाठी मोहालीत निहंग हातात तलवारी व लाठ्याकाठ्या घेऊन रस्त्यावर उतरले. ते चंदीगडच्या दिशेने जात आहेत.
अमृतपालच्या सुटकेसाठी मोहालीत निहंग हातात तलवारी व लाठ्याकाठ्या घेऊन रस्त्यावर उतरले. ते चंदीगडच्या दिशेने जात आहेत.

मोहालीत निहंगांकडून एअरपोर्ट रोड जाम

दुसरीकडे, अमृतपालच्या अटकेविरोधात मोहालीत निदर्शने सुरू झाली आहेत. येथील चंदीगड-मोहाली सीमेवरील इंसाफ मोर्चात तब्बल 150 निहंग हातात तलवारी व काठ्या घेऊन रस्त्यावर उतरले. हे सर्वजण अमृतपालच्या सुटकेसाठी नारे देत चंदीगडच्या दिशेने जात होते. त्यांना रोखण्यात आल्यानंतर त्यांनी विमानतळ मार्ग अडवून धरला. पंजाब पोलिसांच्या जवानांनी त्यांना घेरले आहे.

8 फेब्रुवारी 2023 रोजी चंदीगड-मोहाली सीमेवरील या इंसाफ मोर्चात सहभागी झालेल्या निहंगांची पोलिसांशी हिंसक चकमक झाली होती. त्यात अनेकजण जखमी झाले होते.

पंजाब पोलिसांनी घेरल्यानंतर अमृतपाल सिंग अशा प्रकारे मर्सिडीजमधून फरार झाला. त्याचा यासंबंधीचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे.
पंजाब पोलिसांनी घेरल्यानंतर अमृतपाल सिंग अशा प्रकारे मर्सिडीजमधून फरार झाला. त्याचा यासंबंधीचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे.

'वारिस पंजाब दे' नामक खलिस्तान समर्थक संघटनेचा प्रमुख अमृतपालवर 3 गुन्हे दाखल आहेत. त्यापैकी 2 गुन्हे अमृतसर जिल्ह्यातील अजनाला पोलिस ठाण्यात दाखल आहेत. आपल्या एका विश्वासू मित्राच्या अटकेमुळे संतप्त झालेल्या अमृतपालने त्याच्या समर्थकांसह 23 फेब्रुवारी रोजी अजनाला पोलिस स्टेशनवर हल्ला केला होता. याप्रकरणी सपशेल नांगी टाकल्यामुळे पंजाब पोलिसांना चौफेर टीकेचा सामना करावा लागला होता.

जालंधरच्या शाहकोटमध्ये मोठ्या प्रमाणात पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
जालंधरच्या शाहकोटमध्ये मोठ्या प्रमाणात पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

जालंधर-मोगा पोलिसांची संयुक्त कारवाई

अमृतपालने शनिवारी जालंधर-मोगा नॅशनल हायवेवरील शाहकोट-मसलिंया भागासह भटिंड जिल्ह्यातील रामपुरा फूल येथे कार्यक्रमांचे आयोजन केले होते. शाहकोट-मसलिया येथील कार्यक्रमासाठी त्याचे शेकडो समर्थक सकाळपासूनच गर्दी करत होते. या कार्यक्रमापूर्वी जालंधर व मोगा पोलिसांनी एका संयुक्त मोहिमेंतर्गत अमृतपालला अटक करण्याची रणनीती आखली होती. यासाठी आसपासच्या अनेक जिल्ह्यांतून रातोरात पोलिसांचा फौजफाटा मागवण्यात आला. जालंधर-मोगा राष्ट्रीय महामार्गावरही सकाळपासूनच नाकेबंदी करण्यात आली होती.

शनिवारी दुपारी 1 च्या सुमारास अमृतपालचा ताफा जालंधरच्या मैहतपूर गावालगत पोहोचला. तिथे पोलिसांनी त्याला घेराव घेतला. त्यांनी ताफ्यातील पहिल्या 2 कारमधील 6 जणांना अटक केली. अमृतपाल तिसऱ्या क्रमांकाच्या मर्सिडीज कारमध्ये बसला होता. पोलिसांना पाहताच त्याने चालकाला गाडी लिंक रोडकडे वळवण्याची सूचना केली. त्यानंतर लगेचच जालंधर व मोगा पोलिसांनी त्याचा पाठलाग सुरू केला.

याच कारमधून फरार झाला होता अमृतपाल.
याच कारमधून फरार झाला होता अमृतपाल.

अमृतपालचे समर्थकांना गोळा होण्याचे आवाहन

अटक करण्यात आलेल्या अमृतपालच्या 6 समर्थकांकडून पोलिसांनी अनेक शस्त्रे जप्त केली आहेत. जालंधरच्या मैहतपूर पोलिसांनी त्यांना अटक केली. अमृतपाल कारमध्ये बसून पळून जात असल्याचा व्हिडिओही समोर आला आहे. या व्हिडिओमध्ये अमृतपाल कारच्या समोरील सीटवर बसलेला दिसत आहे. त्यात तो आपल्या समर्थकांना गोळा होण्याचे आवाहन करत आहे. कारमध्ये उपस्थित अमृतपालचे समर्थक पोलिस त्यांच्या मागावर असल्याचे सांगतांना दिसून येत आहेत.

पोलिस सूत्रांच्या माहितीनुसार, जवळपास दीड तास पाठलाग केल्यानंतर अमृतपालला नकोदर भागात अटक करण्यात आली. पण पोलिसांनी अद्याप त्याची पुष्टी केली नाही.

सोशल मीडियावर अवतरला अमृतपालचा निकटवर्तीय

अमृतपालचा जवळचा सहकारी भगवंत सिंग उर्फ ​​बाजेके यालाही पोलिसांनी अटक केली आहे. मोगा येथील रहिवासी असलेल्या भगवंत सिंगला त्याच्या शेतातून अटक करण्यात आली. त्यावेळी तो आपल्या गुरांसाठी चारा कापत होता. 5 वाहनांतून आलेल्या पोलिसांनी शेतात नाकाबंदी करून त्याला जेरबंद केले. पोलिसांना पाहताच भगवंत सोशल मीडियावर लाइव्ह आला. त्याने पोलिस आपल्या दिशेने येत असल्याचे दाखवले.

सोशल मीडियावर शस्त्रांसह फोटो पोस्ट केल्याप्रकरणी भगवंत सिंग विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तो गत काही दिवसांपासून पंजाब सरकारच्या विरोधात व अमृतपालच्या समर्थनार्थ सोशल मीडियावर व्हिडिओ पोस्ट करत होता.

पंजाब पोलिसांनी केलेली नाकाबंदी.
पंजाब पोलिसांनी केलेली नाकाबंदी.

अजनाला ठाण्यावर केला होता हल्ला

खलिस्तान समर्थक संघटना 'वारिस पंजाब दे'शी संबंधित हजारो कार्यकर्त्यांनी गत 23 फेब्रुवारी रोजी अमृतसरच्या अजनाला पोलिस ठाण्यावर हल्ला केला होता. त्यांच्या हातात बंदुका व तलवारी होत्या. हे लोक संघटनेचा म्होरक्या अमृतपाल सिंग याचा निकटवर्तीय लवप्रितसिंग तुफान याच्या अटकेला विरोध करत होते. या हल्ल्यामुळे दबावात आलेल्या पंजाब पोलिसांनी आरोपीची सुटका करण्याची घोषणा केली होती.

कोण आहे अमृतपाल सिंग

अमृतपाल सिंग अमृतसर जिल्ह्यातील जल्लूपूर खेडा गावचा आहे. 2012 मध्ये तो कामासाठी दुबईला गेला. तेथून तो गतवर्षी सप्टेंबर महिन्यात भारतात परतला. सप्टेंबर महिन्यातच त्याची खलिस्तान समर्थक दीप सिद्धूच्या 'वारिस पंजाब दे' संघटनेच्या प्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली होती.

पंजाबमध्ये इंटरनेट व बल्क SMS सेवा बंद

अमृतपालच्या अटकेनंतर पंजाब सरकारने इंटरनेट सेवा बंद करण्यासंबंधी जारी केलेला आदेश.
अमृतपालच्या अटकेनंतर पंजाब सरकारने इंटरनेट सेवा बंद करण्यासंबंधी जारी केलेला आदेश.

अमृतपालच्या अटकेनंतर पंजाबमध्ये मोबाईल इंटरनेट व बल्क एसएमएस सेवा बंद करण्यात आली आहे. पंजाबच्या अतिरिक्त मुख्य सचिवांनी यासंबंधीचे आदेश जारी केलेत. पंजाबच्या डीजीपीनी दिलेल्या माहितीनुसार, सोशल मीडिया व बल्क एसएमएसद्वारे राज्यातील लोकांना चिथावण्याचा प्रयत्न केला जाऊ शकतो. यामुळे राज्यातील मोबाईल इंटरनेट व बल्क एसएमएस सेवा शनिवारी दुपारी 12 ते रविवारी दुपारी 12 वाजेपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. बँकिंग व मोबाईल रिचार्ज वगळता अन्य सर्व एसएमएस सेवा बंद राहतील, असे या आदेशात नमूद करण्यात आले आहे.

अमृतपालच्या गावाला घेराव, सेंट्रल फोर्स तैनात

अमृतपाल सिंगच्या अटकेनंतर पंजाब पोलिसांनी अमृतसर जिल्ह्यातील रईयालगतच्या जल्लूपूर खेडा गावाला घेराव घातला आहे. हे अमृतपालचे गाव आहे. गावात येणाऱ्या-जाणाऱ्या सर्वांची चौकशी करून वाहनांची झडती घेतली जात आहे. पंजाब पोलिसांव्यतिरिक्त केंद्रीय दलाचे जवानही जल्लूपूर खेडाभोवती तैनात करण्यात आलेत.

मोहालीत खलिस्तान समर्थक अमृतपाल सिंगच्या अटकेविरोधात तलवारी व काठ्या घेऊन निहंग रस्त्यावर उतरलेत.
मोहालीत खलिस्तान समर्थक अमृतपाल सिंगच्या अटकेविरोधात तलवारी व काठ्या घेऊन निहंग रस्त्यावर उतरलेत.

अमृतपाल सिंग संबंधीची खालील बातमी वाचा...

अमृतसरमध्ये अजनाला ठाण्यावर चढाई:पंजाबात खलिस्तान समर्थकांचा हल्ला, 8 जिल्ह्यांतील 800 पोलिसांना पिटाळले

पंजाबमध्ये गुरुवारी खलिस्तान समर्थक संघटना ‘वारिस पंजाब दे’ शी संबंधित हजारो लोकांनी बंदुका,तलवारी घेऊन अमृतसरच्या अजनाला ठाण्यावर हल्ला चढवला. संघटनेचा प्रमुख अमृतपालसिंहचा निकटवर्तीय लवप्रीतसिंह तुफानच्या अटकेचा विरोध करीत होते. हल्ल्यानंतर पंजाब पोलिसांनी तुफानची सुटका करीत असल्याचे जाहीर केले. ६ पोलिस जखमी झाले. अमृतपालविरोधात एका तरुणाने सोशल मीडियावर पोस्ट केली होती. त्याचे अपहरण करून त्याला बेदम मारहाण केल्याप्रकरणी अजनाला ठाण्यात तुफानसह एकूण ३० जणांविरुद्ध गुन्हा दाखल आहे. येथे वाचा संपूर्ण बातमी...

भिंद्रानवाले पार्ट-2 संबोधला जाणारा अमृतपाल कोण आहे?:ठाण्यावर हल्ला करत सहकाऱ्याला सोडवले, अमित शहांनाही धमकी दिली

'500 वर्षांपासून आमच्या पूर्वजांनी या मातीवर आपले रक्त सांडले आहे. हाताच्या बोटावर मोजता येणार नाही इतके त्याग करणारे लोक आहेत. आम्ही या धरणीचे दावेदार आहोत. या दाव्यापासून काहीही आम्हाला मागे हटवू शकत नाही. ना इंदिराजी काढू शकल्या ना मोदी किंवा अमित शहा काढू शकतात. जगाच्या कानाकोपऱ्यातून सैन्य येऊ दे, आम्ही मरताना मरू, पण हक्क सोडणार नाही.'

हे विधान 'वारीस पंजाब दे' या खलिस्तान समर्थक संघटनेचे प्रमुख अमृतपाल सिंग याचे आहे. वारिस पंजाब देशी संबंधित हजारो लोकांनी गुरुवारी अमृतसरमधील अजनाला पोलिस स्टेशनवर हल्ला केला. त्यांच्या हातात बंदुका, तलवारी आणि भाले होते. हे लोक संघटनेचे प्रमुख अमृतपाल सिंग यांच्या निकटवर्तीय लवप्रीत सिंग तुफानच्या अटकेविरोधात आंदोलन करत होते. त्यांच्या हल्ल्यानंतर दबावाखाली आलेल्या पंजाब पोलिसांनी आरोपींना सोडण्याची घोषणा केली. येथे वाचा संपूर्ण बातमी...

बातम्या आणखी आहेत...