आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सोरेन आमदारांना नेतरहाटला नेणार:काँग्रेस आमदारांतील संभाव्य फूट टाळण्यासाठी दिल्लीहून पाठवण्यात आले प्रभारी

रांची3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

झारखंडमधील 3 दिवसांपासून सुरू असलेल्या सत्ता संघर्षाच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस राज्य प्रभारी अविनाश पांडे शनिवारी रात्री रांचीला पोहोचले. त्यांनी रात्री उशिरा काँग्रेस आमदारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी सर्वच आमदारांना राजधानी रांचीला राहण्याचे निर्देश दिले. आज ते मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांची भेट घेतील. त्यात ते पुढील रणनितींवर चर्चा करतील.

दुसरीकडे, रविवारी सलग दुसऱ्या दिवशी यूपीएचे आमदार हेमंत सोरेन यांच्यासोबत पिकनिक साजरी करण्यासाठी रांचीहून बाहेर जाणार. दिव्य मराठीने यापैकी 3-4 आमदारांशी चर्चा केली असता त्यांनी ऑफ द रेकॉर्ड रांचीहून 160 किमी दूर नेतरहाटला जाण्याची गोष्ट मान्य केली. पण शेवटच्यावेळी यात बदल होण्याची शक्यताही त्यांनी वर्तवली.

आमदारांनी नौकाविहार केला, मटण पार्टीही झाली

शनिवारी दुपारी मुख्यमंत्री निवासस्थानातून सर्वच आमदार खूंटीहून लतरातू डॅमला पोहोचले. तिथे त्यांनी मुख्यमंत्र्यांसोबत डॅममध्ये नौकाविहार केला. त्यानंतर सर्वच आमदार तेथील गेस्ट हाऊसमध्ये थांबले. तिथे त्यांनी मांसाहारावर येथेच्छ ताव मारला. त्यानंतर सर्वजण परत रांचीला परतले.

29 सप्टेबरला वसंत सोरेन यांच्या आमदारकीचा फैसला

शनिवारी मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांची आमदारी रद्द करण्यासंबंधीची अधिसूचना निवडणूक आयोगाने जारी केली नाही. त्यातच आता 29 सप्टेबर रोजी मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांचे छोटे बंधू वसंत सोरेन यांच्या आमदारकीचाही फैसला येणार आहे. त्याची सुनावणी जवळपास पूर्ण झाली आहे. आता दोन्ही भावांच्या सदस्यत्वावर एकत्रच निर्णय येण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.

आमदारांना एकजूट ठेवण्याचा प्रयत्न

सत्ताधारी पक्षाच्या एका मोठ्या नेत्याने नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले की, मुख्यमंत्री हेमंत सोरेन व काँग्रेस प्रदेशाध्यक्षांना काही आमदार फूटण्याची भीती आहे. या स्थितीत ते पक्ष एकजूट ठेवण्याचा प्रयत्न करत आहेत. यामुळे ते आमदारांना पिकनिकला नेऊन सत्ताधारी एकजूट असल्याचा संदेश देण्याचा प्रयत्न करत आहेत.

पांडे म्हणाले - सरकार अस्थिर करण्याचा डाव

काँग्रेस प्रभारी अविनाश पांडे यांनी झारखंडमध्ये राजकीय अस्थिरता निर्माण करण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप केला आहे. ते म्हणाले - हे केवळ झारखंडमध्येच होत नाही. ज्या ज्या राज्यांत बिगर भाजप पक्षांचे सरकार आहे, तेथील विकासकार्य रोखण्याचा प्रयत्न केला जात आहे. यावेळी त्यांनी झारखंडमधील काँग्रेस आमदार एकजूट असल्याचा दावाही केला.

कॅशकांडानंतर काँग्रेस अलर्टवर

30 जुलै रोजी कोलकात्यात काँग्रेसच्या 3 आमदारांना रोख रकमेसह पडकण्यात आले. त्यानंतर झारखंडमध्ये सावधगिरीने पाऊले उचलण्यात येत आहेत. पक्षात कोणत्याही प्रकारची बंडखोरी होणार नाही यासाठी युद्ध पातळीवर प्रयत्न केले जात आहे. यामुळे पक्षाचे प्रदेशाध्यक्षही आपल्या आमदारांसोबत बसमध्ये प्रवास करत आहेत.

भाजपची नाराज आमदारांवर नजर

भाजपने मागील 3 दिवसांपासून वेट अँड वॉचची भूमिका घेतली आहे. त्यांची झामुमो व काँग्रेसमधील नाराज आमदारांवर नजर आहे. भाजपच्या गोटातील सूत्रांच्या माहितीनुसार, पार्टी झामुमो व काँग्रेसमधील कच्चे दुवे शोधूनि राज्यात राष्ट्रपती राजवटीसारखी स्थिती लागू करण्याच्या प्रयत्नांत आहे.

बातम्या आणखी आहेत...