आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराचार वर्षांनंतर एखाद्या राज्यात सरकार स्थापन करत असलेल्या काँग्रेसमध्ये दोन दिवसांच्या खलबतांनंतर अखेर मुख्यमंत्रिपदाचे नाव निश्चित झाले. शनिवारी सायंकाळी सिमल्यात झालेल्या बैठकीत सुखविंदरसिंह सुखू यांची विधिमंडळ पक्षनेतेपदी निवड झाली. ते हिमाचल प्रदेशचे सातवे मुख्यमंत्री असतील. प्रदेशाध्यक्ष व खासदार प्रतिभा सिंह यांचे निकटवर्तीय मुकेश अग्निहोत्री यांच्यावर उपमुख्यमंत्रिपदाची जबाबदारी असेल. ५८ वर्षीय सुखू यांनी राजकीय जीवनाची सुरुवात विद्यार्थी नेता म्हणून केली आणि ते तीन वेळा प्रदेशाध्यक्ष राहिले. बैठकीनंतर काँग्रेसचे प्रभारी राजीव शुक्ला, पर्यवेक्षक व छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल म्हणाले, शपथविधी समारंभ रविवारी सकाळी होईल.
गुजरात : भूपेंद्र पटेल विधिमंडळ पक्षाचे नेते, १२ जणांना शपथ गुजरातमध्ये ऐतिहासिक विजयानंतर भाजप विधिमंडळ पक्षाने शनिवारी भूपेंद्र पटेल यांची पुन्हा मुख्यमंत्रिपदी निवड केली. संरक्षणमंत्री राजनाथ सिंह, कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री बी. एस. येदियुरप्पा व अर्जुन मुंडा यांच्या उपस्थितीत भाजप प्रदेश मुख्यालयात विधिमंडळ पक्षाची बैठक झाली.सोमवारी त्यांच्यासह १२ जणांचा शपथविधी होईल.
नाराज प्रतिभा समर्थकांची घोषणाबाजी सूत्रांच्या म्हणण्यानुसार शर्यतीतून बाहेर झाल्यानंतर प्रतिभा यांच्या गटाने सुखू यांच्या निवडीवर असहमती दर्शवित समर्थकांनी धरणे देत हायकमांडच्या विरोधात घोषणा दिल्या.
प्रतिभा सिंह मंडी लोकसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करतात. काँग्रेसला मंडी जिल्ह्यात विधानसभेला १० पैकी केवळ एका जागी विजय मिळवता आला. प्रतिभा सिंह मुख्यमंत्री झाल्या असत्या तर त्यांना सहा महिन्यांत आमदारकीची निवडणूक लढवावी लागली असती. ते काँग्रेसने टाळले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.