आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराजन्मत: दृष्टिहीन भावेश भाटिया अत्यंत सुबक आणि कलात्मक मेणबत्त्या तयार करायचा. ‘तू जगाला नाही पाहू शकत; पण असे काही वेगळे कर की जगाने तुझ्याकडे पाहिले पाहिजे,’ असे वडील नेहमी म्हणायचे. वडिलांचे हे वाक्य आणि काहीतरी वेगळे करण्याची ऊर्मी भावेश यांना स्वस्थ बसू देत नव्हती. त्यांच्या या कलेला दाद देण्यासाठी व त्यांना मदत करण्यासाठी एका मोठ्या उद्योग समूहाने त्यांना ५१ लाखांचा धनादेश दिला. भावेश यांनी ही आर्थिक मदत नम्रपणे नाकारत “पैसे नको, काम द्या’ म्हणून विनंती केली. त्यानंतर त्या कंपनीने त्यांना ३ लाख दिवाळी गिफ्ट तयार करून देण्याची ऑर्डर दिली.
अवघ्या २८ व्या वर्षी भावेश यांनी सुरू केलेल्या या उद्योगाचा आज वटवृक्ष झाला आहे. २३ वर्षांच्या या प्रवासात आज २ हजार कॉर्पोरेट कंपन्यांशी भावेश जोडले गेले आहेत. १४ राज्यांत मेणबत्ती निर्मितीचे ७१ युनिट्स सुरू आहेत. तिरुपतीपासून ते अंदमानपर्यंत ४५०० रिटेल काउंटरच्या माध्यमातून ९,५०० दृष्टिहीन बांधवांना आज १४ राज्यांत ७१ युनिट, ९,५०० अंधांना काम :रोजगार मिळाला आहे. भावेश मूळचे महाबळेश्वरचे. आनुवंशिक समस्येमुळे त्यांना जन्मत: दृष्टी नव्हती. अशाही परिस्थितीत भावेश यांच्या पालकांनी त्यांना सामान्य शाळेत प्रवेश दिला. लेखनिकाच्या मदतीने परीक्षा देत भावेश यांनी गोंदिया येथून अर्थशास्त्र आणि मानसशास्त्र अशा दोन विषयांत एमए केले.
शिक्षण पूर्ण करून महाबळेश्वर येथे परतल्यानंतर आता पोटापाण्याचे काय, असा प्रश्न त्यांच्यासमोर निर्माण झाला. भावेश यांना नॅशनल असोसिएशन फॉर ब्लाइंड या संस्थेची माहिती मिळाली. ही संस्था अंधांचे पुनर्वसन करते हे कळल्यावर भावेश यांनी मुंबई गाठून आपल्याला मेणबत्ती निर्मितीचे प्रशिक्षण देण्याची विनंती केली. मात्र त्यांनी भावेश यांना मसाजचे प्रशिक्षण देऊन महाबळेश्वरला पाठवले. काही दिवस विविध हॉटेल्समध्ये मसाज करून भावेश यांनी ५ हजार रुपये कमावले. त्या पैशातून मेणबत्तीचा साच्या आणि कच्चा माल आणून त्यांनी पाच दृष्टिहीन बांधवांच्या मदतीने हा उद्योग सुरू केला. पारंपरिक मेणबत्ती तयार न करता त्यात काही कलात्मकता आणण्याचा प्रयत्न भावेश यांनी केला. पुढे एकाहून एक सरस आकाराच्या मेणबत्त्या त्यांनी तयार करण्यास सुरुवात केली. आज ते १०,७०० डिझाइनच्या मेणबत्त्या तयार करीत आहेत.
दिव्यांगांना दिला रोजगार
भावेश यांनी २७ जून १९९४ ला पहिली मेणबत्ती तयार केली. ५ दृष्टिहीन बांधवांना प्रशिक्षण देऊन त्यांनी काम सुरू केले. अवघ्या दोन वर्षांत ही संख्या शंभरावर पोहोचली. आज ९,५०० दृष्टिहीन बांधव यात सहभागी आहेत. ते महिन्याकाठी ४००० रुपयांपासून ४० हजार रुपयांपर्यंत उत्पन्न मिळवत आहेत.
राष्ट्रपतींकडून तीन वेळा झाला सन्मान
२०१४, २०१६ आणि २०२० मध्ये राष्ट्रपतींच्या हस्ते भावेश यांचा गौरव करण्यात आला आहे. २०१६ मध्ये त्यांना एम्प्लॉयर ऑफ द इयर पुरस्कार मिळाला.
२०२० मध्ये राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी रोल मॉडेल ऑफ इंडिया पुरस्काराने त्यांचा
गौरव केला.
दिव्यांगांना शालेय स्तरावरच दिले जावे तांत्रिक शिक्षण
वाट पाहणाऱ्यांच्या हातात तेवढेच पडते जेवढे प्रयत्न करणारे लोक सोडून देतात, असे दिवंगत राष्ट्रपती एपीजे अब्दुल कलाम म्हणायचे. त्यातून प्रेरणा घेत मी प्रयत्न सुरू ठेवले व हे कार्य करू शकलो. दिव्यांगांना शालेय स्तरावरच तांत्रिक शिक्षण देण्याची गरज आहे.'
- भावेश भाटिया, दृष्टिहीन उद्योजक
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.